पेमा खंडू यांनी 2016च्या जुलै महिन्यात अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा ते 37 वर्षांचे होते. या तरुण वयात ते मुख्यमंत्री झाले त्याचबरोबर सर्वात कमी काळात सर्वाधिक वेळा पक्ष बदलण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर असावा. सध्या ते भाजपात आहेत, पण त्यांचा इतिहास पाहता पुढे काय होईल सांगता येणार नाही.
अरुणाचल प्रदेशातील भाजपाच्या 67 उमेदवारांपैकी 60 उमेदवार करोडपती होते तर काँग्रेसच्या 46 उमेदवारांपैकी 30 उमेदवार करोडपती होते. पेमा खंडू यांची 163 कोटींची संपत्ती आहे, त्यांच्या नंतर काँग्रेसचे लोंबो ताएंग हे 148 कोटींचे मालक आहेत तर तिसर्या क्रमांकावर 109 कोटीची संपत्ती असणारे भाजपाचे त्सेरींग ताशी (तवांग) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे अरुणाचलची श्रीमंती ही थक्क करणारीच आहे.
पेमा खंडू यांचे वडील दोरजी खंडू हे अरुणाचल प्रदेशात लोकप्रिय होते. त्यांचा कामाचा धडाका मोठा होता. लष्करात सात वर्षे सेवा देऊन ते राजकारणात आले. सहकारी सोसायटीचे चेअरमन ते 2007 साली अरुणाचलचे काँग्रेसचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास होता. 2009 ला ते दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. दुर्दैवाने 30 एप्रिल 2011 या दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना चार पत्नी, पाच पुत्र आणि दोन कन्या आहेत. पेमा खंडू हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
दोरजी खंडू यांच्या निधनानंतर पेमा खंडू यांना राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपद दिले. त्याआधीपासून ते काँग्रेस पक्षात सक्रीय होते. 2010 साली तवांग जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर वडिलांच्या मतदारसंघात ते सतत विजयी राहिले. 17 जुलै 2016 या दिवशी काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तेव्हा राज्यातील राजकीय वातावरण स्फोटक होते. 17 जुलै 2016 या दिवशी काँग्रेस पक्षात असलेले पेमा खंडू यांनी दोन महिन्यात काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि 43 आमदारांसह त्यांनी ‘पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’ या पक्षात प्रवेश केला. भाजपाच्या पाठिंब्याने हा पक्ष सत्तेवर आला आणि पेमा खंडू हेच मुख्यमंत्री राहिले. पण तीन महिन्यांत (डिसेंबरमध्ये) त्यांनाच पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमधून निलंबित केले. तकाम पारीओ नवे मुख्यमंत्री बनणार होते. पेमा खंडू यांनी प्रचंड राजकारण करून पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्षही फोडला आणि या पक्षाच्या 43 पैकी 33 आमदारांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या पेमा खंडू हे भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आहेत.
आतापर्यंतच्या 39 वर्षांच्या काळात ते इतके राजकारण खेळले. त्याचवेळी त्यांचा विवाह होऊन दोन मुलगे आणि एक कन्या अशी त्यांना तीन अपत्यही आहेत. ते बौद्ध आहेत. दिल्ली विद्यापीठाचे ग्रॅज्युएट आहेत.
No comments:
Post a Comment