दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दोघेही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलनाने वेग पकडला तेव्हा अरविंद केजरीवाल अधिकच झोतात आले. अरविंद केजरीवाल हे प्रथम डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठा विजय मिळवून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 67 जागा जिंकण्यासाठी इतिहास घडविला. पुढील वर्षी पुन्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार कायम वादात राहिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीकडे एका बाजूनी टीका होत असताना त्यांनी सुधारलेल्या पालिका शाळा आणि मोहल्ला क्लिनिक सारख्या योजनांमुळे त्यांचे कौतुकही होत असते.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सिवानी शहरात झाला. वडील गोविंद राम केजरीवाल हे इलेक्ट्रीक इंजिनिअर होते. सोनिपत, गाझियाबाद, हिस्सार, दिल्ली अशा शहार हे कुटुंब फिरत राहिले. अरविंद केजरीवाल अभ्यासात हुशार होते. खडकपूरच्या आयआयटीत प्रवेश घेऊन ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि जमशेदपूरला टाटा स्टील कंपनीत नोकरीलाही लागले. पण तेव्हापासून अस्वस्थपणा हा त्यांच्या स्वभावात होताच. चांगल्या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यात उत्तीर्ण होऊन ते आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्याच काळात त्यांची सुनिताशी भेट झाली. तीही ‘इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस’ उत्तीर्ण होऊन नोकरीला लागली. 1994 साली दोघांचा विवाह झाला. त्यांना हर्षिता आणि पुलकित ही दोन मुलं आहेत. पुढे दोघांनी सरकारी नोकरी सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.
आयकर खात्यात असतानाच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सुंदरनगर भागात ‘परिवर्तन’ चळवळ सुरू केली. आयकर, वीज बिल, रेशनकार्ड, सरकारी योजना यात सामान्यांना येणार्या समस्यांची सोडवणूक ‘परिवर्तन’ च्या माध्यमातून सुरू झाली. पाच वर्षानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी ‘कबीर’ नावाच्या एनजीओची स्थापना केली ज्यामुळे त्यांना निधी मिळू लागला. दरम्यान ‘परिवर्तन’ मार्फत अनेक सरकारी खात्यांत धडाधड आरटीआय टाकून माहिती मिळविण्यास सुरुवात झाली. यातून सरकारी योजनांतील गैरकारभार उघड होऊ लागला. रेशन दुकानांतील भ्रष्टाचार पाण्याच्या खाजगीकरणाचे कारस्थान, खाजगी शाळांची दादागिरी अशा गौप्यस्फोटांमुळे परिवर्तनचे नांव सर्वदूर पोहचले. पण परिवर्तनचे कार्यक्षेत्र सुंदरनगरपर्यंतच सिमित होते. 2006 साली अरविंदकेजरीवालना त्यांच्या समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम हे भागभांडवल म्हणून देत केजरीवाल यांनी ‘पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली.केजरीवाल, मनिष सिसोदिया, अभिनंदन सिक्री, प्रशांत भूषण, किरण बेदी हे त्याचे संस्थापक होते. या संस्थेने परिवर्तन आणि कबीरचे काम आणखी मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॉमनवेल्थ खेळातील नियोजनात झालेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. शेवटी 2011 साली हेच सर्वजण अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपचे सदस्य बनले. पुढे आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
No comments:
Post a Comment