Monday 7 October 2019

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या
राष्ट्रवादीने अर्धवट माहितीवर भावना भडकवल्या आणि खा. संभाजीराजेंना धाप लागली


महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि लग्नसमारंभाला फडणवीस सरकारने परवानगी दिली आहे असा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच टाकला आणि या अर्धवट माहितीवर महाराष्ट्रात काही तासांत भावना भडकल्या. फडणवीस सरकारने कोणत्या 25 किल्ल्यांवर या उद्योगांना संमती दिली आहे हे डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तर माहीत नव्हतेच, पण भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनाही माहीत नव्हते. पण सर्वचजण नसा ताणून बोलू लागले आणि किल्ल्यांवरील प्रेमाचा कडेलोट झाला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किल्ल्यांवर हॉटेल आणि लग्न समारंभ आम्ही होऊ देणार नाही. या किल्ल्यांवर सरकारने संग्रहालये बांधावी. परदेशातील किल्ल्यांवर अशी संग्रहालये आपण नेहमी बघतो. पण राज्यात सत्तेवर असताना राष्ट्रवादीने किल्ल्यांकडे बघितलेही नाही. कदाचित किल्ल्यांचा 7/12 होणार नाही हे लक्षात आल्याने किल्ल्यांची हेळसांड झाली असावी. आज मात्र विरोधी पक्षाची भूमिका वठवीत सुप्रिया सुळे सातत्याने बोलत होत्या. त्यात भर म्हणून कोणतीही पूर्व माहिती न घेता माधव भंडारी आले आणि आपल्या फुगलेल्या आवाजात नेहमीच्या बेफिकिरीने म्हणाले की, कोणते किल्ले आहेत ते माहीत नाही, पण जो निर्णय झाला तो खूप आधी व्हायला पाहिजे होता. म्हणजे एक नेता माहिती न घेता बोलतो आणि दुसरा नेता जनतेच्या भावनांना किंमत न देता बोलतो आणि हे सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखविण्यासाठी ही बेताल बडबड करतात. दुर्दैवाने छत्रपतींच्या नखाचीही त्यांना सर नाही. सर्वात वाईट म्हणजे ज्यांनी मालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला असावा असे आपल्याला वाटते ते डॉ. अमोल कोल्हे हे गंगेत न्हाऊन कोरडेच राहिले आहेत हे आज उघड झाले. छत्रपतींप्रमाणे कपडे आणि मिशी ठेवून संयम येत नाही. आपण कोणत्या कारणासाठी तलवार उपसत आहोत, याची माहिती न घेता, शासन निर्णय न वाचता त्यांनी सरळ व्हिडिओ करून भावना भडकवल्या. जनतेला फसवून केलेले राजकारण यशस्वी होत नाही हा धडा त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रवासातून घेतला नाही आणि हा धडा राष्ट्रवादीत राहून त्यांना कधी मिळणारही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आगपाखड, माधव भंडारींची दर्पोक्ती झाल्यावर सदैव बाबासाहेब पुरंदरेंच्या पायाशी बसलेले राज ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे व्हिडिओ निवडणूक प्रचारावेळीच लागतात. एरवी त्यांची तलवार कायम म्यानच असते. काँग्रेसबद्दल फारसे बोलावे असे त्यांच्याच नेत्यांना वाटत नाही. बाळासाहेब थोरातांना फक्त शिर्डी दिसते, त्यांना अख्खा महाराष्ट्र कधी दिसेल असे वाटत नाही. नेत्यांच्या वक्तव्यांनी पाणी गरम होऊन बुडबुडे आले. त्यानंतर काही तासांत सर्व शांतही झाले असते. पण गडकिल्ल्यांचे वृत्त व्हायरल झाल्याने गडकिल्ल्यांवर खरे प्रेम करणारे प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर आग ओकू लागले.
निवडणुकीच्या तोंडावर इतकी मते आपल्या विरुद्ध जातील हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजे खडबडून जागे झाले. त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गदागदा हलविले. सकाळपासून वातावरण पेटत चालले होते तेव्हा खासदार, मंत्री आणि पुरातत्व खाते आपापल्या खुर्चीत पेंगत होते. कुणीही कसलाही खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. चार तासांनी केवळ वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर खुलासा केला की, फडणवीस सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मुनगंटीवारांच्या खुलाशाने वादळ शमले नाही. कारण त्यांनी जेव्हापासून 33 कोटी झाडे लावल्याचा दावा सुरू केला आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावरचा विश्वासच उडाला आहे. मुनगंटीवार दावा करतात की, वाघांची संख्या वाढली आहे तेव्हा जनतेला त्यांच्या फोटो मागचा भुसा भरलेला वाघच अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे मुनगंटीवार ‘ज’ चा ‘मा’ करतात अशी जनतेची ठाम भावना झाली आहे. म्हणजे झाडे आणि वाघ जगविण्याच्या ऐवजी मारली असे प्रत्येक जाहिरातीत वाचले जात आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशाने गडप्रेमींचा संताप थांबत नाही हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजेंना घाम फुटला. त्यांनी शेवटी दुपारनंतर शासन निर्णय वाचला आणि जयकुमार रावलना खुलासा करायला लावला की, ‘वर्ग 1’ श्रेणीतील 51 किल्ल्यांवर हॉटेल वा लग्न समारंभाची कोणतीही परवानगी सरकारने दिलेली नाही. ‘वर्ग 2’ श्रेणीतील असंरक्षित किल्ल्यांचा ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास केला जाणार आहे. हे किल्ले लग्न सोहळा वा इतर समारंभांसाठी दिले जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जयकुमार रावल यांनी सकाळीच हा खुलासा दिला असता तर दिवसभराचा अज्ञानाचा गोंधळ झालाच नसता. जयकुमार रावल यांच्या खुलाशाने मूळ वृत्तच चुकीचे होते हे उघड झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात व्हॉटसअपवर निर्णयाची प्रत फिरू लागली. यात वर्ग2 श्रेणीतील स्थळांवरील मोकळी जागा अथवा विकसित जागा खासगी लोकांना 30 ते 60 वर्षे भाडेकराराने देण्यात येतील असे म्हटले आहे. त्यामुळे जयकुमार रावलांच्या खुलाशाने विषय थांबणार नाही. हे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या लक्षात आले. मग त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी मतांचे महत्त्व ओळखून फोन उचलला आणि कोणत्याही किल्ल्यावर खासगी समारंभ होणार नाही असे जाहीर केले. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ही बाब तातडीने प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केली आणि कपाळावरचा घाम पुसला. पण शेवटचा घामाचा थेंब पुसत असताना जयकुमार रावल म्हणाले की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर यापूर्वीच हेरिटेज हॉटेलचे बांधकाम सुरू झाले आहे. या वाक्याचा खरे तर धमाका व्हायला हवा होता. पण तेव्हा निवडणुका नसल्याने आपण गप्प बसलो होतो हे लक्षात आल्यावर सर्वच पक्षाचे नेते थंड झाले आणि हा विषय संपला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे केवळ नाव घेऊन त्यांचे गुण येत नाहीत हे आजच्या घटनेतून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना दिसले. दिल्लीतील लाल किल्ला केंद्र सरकारने भाडेकराराने एका खासगी कंपनीला दिला ही घटना अनेकांना आठवली. त्यामुळे आपण कुणावर आणि कशासाठी जीव ओवाळून टाकायचा याचा विचार क्षणभर थांबून मावळ्यांनी करायला हवा. ती वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...