भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे. आपण घाण करायची आणि दुसर्याला ती घाण साफ करायला लावायची. त्यातही जो ती घाण साफ करतो त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी नसते आणि सहानुभूतीही नसते. मनातील घाण साफ करून स्वतःचे मन आणि शरीर सुदृढ ठेवणार्या बुवाबाजांना आपण भरभरून दान देऊन पुण्य विकत घेण्याचा भ्रष्टाचार तर करतोच, पण त्या बुवाबाजांच्या पायावर डोकेही ठेवतो. परंतु जे आपली घरं, आपले संडास, आपले रस्ते साफ ठेवून आपल्याला प्रदुषणापासून, रोगराईपासून वाचवितात त्यांच्याकडे आपले लक्षही नसते. काल आपल्या ‘लाडक्या बाप्पाला’ आपण मिरवणुकीने विसर्जनासाठी नेले आणि जाताना रस्त्यांवर उकिरड्याचे अक्षरशः ढीग करून ठेवले. रस्त्यांवर खड्डे इतके की चालता येत नाही हे वाक्य सर्वांच्या मुखी असते. गणेशविसर्जनाच्या दुसर्या दिवशी समुद्रकिनारी मूर्तींची जी अवस्था दिसते ती पाहवत नाही हे वाक्यही दरवर्षी ऐकू येते. पण रस्त्यांवर आपण विसर्जनाच्या दिवशी किती प्रचंड कचरा करून ठेवला आहे हे वाक्य कुणी बोलतच नाही. कारण आपण घाण करायची आणि दुसर्याने साफ करायची ही आपली सवय आहे.
हिंदू संस्कृतीबद्दल अलीकडे खूप जास्त चर्चा सुरू आहे. मग कचरा करणे, घाण फेकणे, थुंकणे ही आपली संस्कृती आहे का? विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत नाचायचे, पुढल्या वर्षी लवकर या म्हणायचे ही आपली संस्कृती आहे असे म्हणतात. मग हे सर्व करताना आपण प्लास्टिकच्या ग्लासातून पाणी प्यायलो आणि ग्लास रस्त्यावर फेकून दिले, कागदी कपातून चहा प्यायलो आणि कप रस्त्यावर फेकून दिले, लेज खाऊन पाकिटे रस्त्यावर, चिवडा खाल्ला पाकिटे रस्त्यावर, आईस्क्रिमचे कप रस्त्यावर, इडली चटणी ज्या कागदी प्लेटमध्ये खाल्ली ती न गुंडाळता तशीच रस्त्यावर फेकून दिली. ज्या रस्त्यांनी मिरवणुका गेल्या त्या रस्त्यांवर अक्षरशः हा कचरा भरला होता. रस्त्यावरून चालणे शक्य नव्हते. समुद्रकिनारी आलेल्या मूर्ती दुसर्या दिवशी पाहवत नाही तसे हे समुद्रकिनार्याकडे जाणारे रस्ते पाहवत नव्हते.
पीओपीच्या मूर्ती आणू नका, कारण त्या विरघळत नाहीत आणि त्या मूर्तींमुळे नदी, विहिरी, समुद्र प्रदूषित होतात हे अनेक वेळा सांगून झाले. तरी शाडुची मूर्ती आणत नाहीत कारण ती महाग असते. थोडी सजावट कमी करा, थोडी मिठाई कमी करा म्हणजे परवडेल असे सांगितले तर आपल्यालाच दूषणे देतात. मूर्तीची नंतर काय अवस्था होते हे माहीत असूनही सजावट, मिठाई, बँड यासाठी पैसे वाचवायला पीओपीचीच मूर्ती आणतात. आता तर कृत्रिम तलावांचे थोतांड निघाले आहे. आम्ही प्रदूषण करीत नाही तर कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतो असे नाक वर करून म्हणतात. पण या कृत्रिम तलावात रसायन टाकून मूर्ती विरघळवतात आणि ते पाणी पुन्हा नदीत आणि समुद्रातच फेकतात. मग प्रदूषण कमी कसे झाले? परंतु दृष्टीआड काहीही चालले तर आपला त्याच्याशी संबंध नसतो.
कचर्याचेही तसेच आहे. सफाई कामगार दुसर्या दिवशी कष्ट करून रस्ते चार-चार वेळा साफ करतात आणि आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून रस्त्यावर पाऊल ठेवतो तोपर्यंत रस्ते स्वच्छ केलेले असतात. त्यामुळे आपण कचरा करतो आहोत याचे आपल्याला काहीच वाटत नाही, आपले घर फक्त आपले ही आपली मानसिकता आहे. त्यामुळे घरात आपण फरशीवर कचरा टाकत नाही. घरातल्या फरशीवर थुंकतही नाही. पण घराबाहेर पडलो की आपले काहीच नसते. तेव्हा आपण जे वागतो त्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, घराबाहेरचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर शेवटी परिणाम होतोच. घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण खिशातले पैसे खर्च करतो त्याचप्रमाणे रस्ते बांधायला, रस्त्यावरील खड्डे बुजवायला, रस्त्यावरील कचरा साफ करायला आपणच खिशातले पैसे खर्च करतो. आपण कर भरतो त्यातून हा खर्च होतो. मग आपण घर आपले मानतो तसा रस्ता आपला का मानत नाही?
गंमत म्हणजे आपण आपल्या देशात अगदी बेफिकिरीने उकिरडा करतो, पण दुसर्यांच्या देशात जातो तेव्हा त्यांचे रस्ते मात्र साफ ठेवतो. परदेशातून कुणीही परतले की एक वाक्य ठरलेले असते. इतकी स्वच्छता होती आणि रस्त्यांवर एक खड्डाही नव्हता हे कौतुक प्रत्येक जण करतो. पण परदेशात आणि आपल्या देशात काय फरक आहे हा विचार कुणी करीत नाही. परदेशातील नागरिक आकाशातून धरणीवर आलेले नाहीत. ती आपल्यासारखी माणसे आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त विचारांचा फरक आहे. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालये, उद्याने, पार्किंग अशा सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण त्याची निगा राखली पाहिजे ही शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवली आहे. त्यामुळे परदेशी लोक कायदे कडकपणे पाळतात. आपल्याकडे कायदे मोडेल तो हिरो अशी मानसिकता असल्याने प्रत्येक कायदा मोडण्याकडे कल असतो. ही आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ती कोणत्याही वयात बदलता येते. आपण परदेशात गेलो की, रस्त्यावर कचरा टाकत नाही. कचराकुंडी शोधतो किंवा एका पिशवीत कचरा गोळा करून जिथे कचराकुंडी दिसते तिथे नेऊन टाकतो. हे करायला फार कष्ट पडत नाही. पण आपण जो एकत्रितपणे सार्वजनिक उकिरडा करून ठेवतो तो साफ करायला फार कष्ट पडतात.
आपण हा बदल घडविला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपुरता बदल केला तरी मार्ग स्वच्छ होईल. मनातील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला तर अवतीभोवतीही ऊर्जा निर्माण होते. हिंदू संस्कृती ही इतकी वर्षे टिकली कारण काळानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे. या संस्कृतीनुसार जे सण आपण पाळतो तेही आदर्श ठरावेत ही
तळमळ ठेवू या.
No comments:
Post a Comment