मांजर दूध प्यायलं! सर्वांनी पाहिले!
पण या वृक्षतोडीला शिवसेनाच 100 टक्के जबाबदार
प्रदुषणाने घुसमटत चाललेल्या मुंबईला ऑक्सिजन भरभरून देणारे आरे परिसरातील जवळजवळ अडीच हजार वृक्ष मेट्रोच्या कारशेडसाठी कापले जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील भाजपा आणि शिवसेनेने षडयंत्र करून ही कत्तल मंजूर केली. शिवसेना आता वृक्षतज्ज्ञांनी दीड कोटीची लाच घेतल्याचा आरोप करीत असली तरी स्वतः शिवसेनेने किती लाच घेतली या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे शिवसेनेने मांजरीप्रमाणे डोळे बंद करून दूध मटकावले, पण त्यांना जिभल्या चाटताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे.
भाजपाला आरे परिसरातच मेट्रो कारशेडसाठी जागा हवी होती आणि त्यांनी त्यासाठी शिवसेनेला पटविले हे उघड आहे. शिवसेनेचे 6 आणि उपस्थित वृक्षतज्ज्ञ (3) यांनी विरोधात मतदान केले असते तरी आरेतील झाडे वाचली असती. पण त्या दिवशी बैठकीत काय झाले? वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्त पाच वृक्षतज्ज्ञांपैकी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी डॉ. दीपक आपटे आणि मनोहर सावंत हे त्या दिवशी गैरहजर राहिले. हे दोघे का गैरहजर राहिले याची कारणे मुंबईकरांना द्यायला हवी. जे तीन वृक्षतज्ज्ञ बैठकीला उपस्थित होते त्यापैकी 15 वर्षे पॅनलवर असलेले सुभाष पाटणे, भाभा ऑटोमिक सेंटरचे डॉ. चंद्रकांत साळुंखे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तिघांनीही वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. या तिघांनाही याबाबत जाब विचारला पाहिजे आणि जर त्यांचे उत्तर अमान्य झाले तर त्यांना तात्काळ समितीतून काढले पाहिजे.
वृक्षतज्ज्ञ म्हणून नेमलेल्या सुभाष पाटणे, चंद्रकांत साळुंखे आणि शशीरेखा सुरेशकुमार यांनी मेट्रो उभारणार्या ‘सॅम इंडिया’ कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपये लाच घेतली असा आरोप शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. यापैकी शशीरेखा सुरेशकुमार या मिठीबाई कॉलेजात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात की, जेव्हा मतदान झाले तेव्हा प्रचंड गोंधळ सुरू होता. मला वाटले की हा विषय पुढे ढकलण्यासाठी मतदान होत आहे. एका प्रसिद्ध कॉलेजच्या प्राध्यापिकेचा गोंधळ होत असेल तर सर्व गोंधळाचेच काम आहे. यासाठी मुंबईकरांनी या प्रत्येक वृक्षतज्ज्ञाला जाब विचारला पाहिजे.
पण हे वृक्षतज्ज्ञ जितके जबाबदार आहेत. त्याहून कितीतरी अधिकी पटीने आरेच्या वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे. वृक्षप्राधिकरण समितीची बैठक साधारणपणे दर 15 दिवसांनी घेतली जाते. पण यावेळी आरेसाठी अवाजवी घाई केली गेली. 15 दिवसांनी एक बैठक घेण्याऐवजी 15 दिवसांत 3 बैठका घेण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दोन दिवसांत एक हजार पानांचा अहवाल तयार करण्यात आला. वृक्षप्राधिकरण समितीतील वृक्षतज्ज्ञ आणि भाजपावर आरोप करीत शिवसेनेचे यशवंत जाधव यांनीच ही माहिती दिली. मग इतक्या वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना झोपली होती की झोपेचे सोंग घेऊन पहुडली होती. आरेतील वृक्षतोडीला परवानगी देणारा प्रस्ताव मंजूर झालाच नसता कारण भाजपाचे या समितीत फक्त चार नगरसेवक आहेत. त्यांच्या विरोधात 5 वृक्षतज्ज्ञ, राष्ट्रवादीचा (राजकीय विरोधक) 1, काँग्रेसचे (राजकीय विरोधक) 2 आणि शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक आहेत. म्हणजे समितीत भाजपा 4 विरुद्ध विरोधक 14 असे बलाबल आहे. तरीही भाजपाने जबड्यात हात घालून सर्व दात काढले. आता शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात जाण्याची नाटकं करीत आहेत, पण लोक आता फसत नाहीत.
आरे वृक्षतोडीचा विषय निघाला त्या दिवशी 2 वृक्षतज्ज्ञ अनुपस्थित होते. त्यापैकी बीएनएचएसचे दीपक आपटे आहेत. जे सरकारविरोधात कोर्टात जाणार नाहीत कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. जे उपस्थित होते त्यांना तर जायचेच नाही. काँग्रेसवाले सत्तेत राहून शहाणे झाले आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे सभात्याग करून वाट मोकळी करून दिली आणि आता ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत रवी राजा वृक्षप्रेमाचा आव आणत आहेत. राष्ट्रवादीच्या एकाबद्दल बोलायला नको कारण हल्ली त्यांच्या नेत्यांचा संयम ढासळतो आहे.
उरली शिवसेना, त्यांचे सहापैकी सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उमेश माने हे नगरसेवक आरे बाबत मतदान होईपर्यंत बैठकीला आलेच नाहीत. वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर बैठकीत पोहोचले. त्यांची म्हणे मातोश्रीला भेटून झाडाझडती घेणार आहेत. हे अधिकृत पक्षाचे वाक्य आहे. प्रत्यक्षात या चौघांना बहुदा ही टर्म संपल्यावर पुढल्या टर्मलाही वृक्षप्राधिकरण समितीवर घेण्याचे आश्वासन दिले जाईल. उशीर करून किती मोठे काम त्यांनी ‘करून दाखविले’ आहे. एकूण काय तर आरेतील झाडे गेली, ऑक्सिजन गेले. यानंतर नैसर्गिक आपत्ती ओढावणारच आहे. जेव्हा ओढवेल तेव्हा समिती नेमली जाईल. त्या समितीत हीच माणसे असतील. खरे सत्य हे आहे की, या पक्षांना आता जनतेचा धाक राहिला नाही. कारण कुटुंब फक्त स्वतःपुरती जगू लागली आहेत.
No comments:
Post a Comment