Monday, 6 July 2020

चीनशी होणारा करार रद्द केला, ‘हिरो सायकल’ हिरो झाली?


डोकलाम, लडाख, सिक्कीम, गलवान या सर्व परिसरात चीनने केलेल्या हल्ल्यांमुळे भारतीय संतप्त आहेत. चीनवर बहिष्कार टाका अशी भारतीयांची मन:स्थिती आहे. पण ही भावना सामान्य माणसांपर्तंयतच मर्यादित आहे. जिथे अब्जावधींचा खेळ चालतो तिथे चीनवर बहिष्काराचे निर्णय झालेले नाहीत. भारत सरकारने आरोळ्या ठोकून ठोकून फक्त सामान्य माणसाच्या करमणुकीचे टिकटॉक बंद केले. पण केंद्र सरकारने दिल्ली जवळच्या बांधकामाचा करार रद्द केला नाही. महाराष्ट्र सरकारने करार रद्द केले नाही आणि अदानीनेही करार रद्द केलेला नाही.

आज ‘हिरो सायकल’चे संचालक पंकज मुंजाळ यांनी जाहीर केले की,  चीनशी भविष्यात आम्ही जो 900 कोटी रुपयांचा करार करणार होतो तो करार करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत. ‘चीनशी होणारा करार रद्द करणार’ हे शब्द कानावर पडले आणि लगेच भारतीयांनी पंकज मुंजाळ आणि हिरो सायकल कंपनीला ‘भारताचे खरे हिरो’ म्हणून घोषित केले. हिरो सायकल ब्रॅण्ड हा देशभक्त बॅ्रण्ड झाला. पण हा करार नेमका का रद्द झाला याची माहिती घेण्याचे कष्ट अनेकांनी घेतले नाहीत. ही माहिती घेतली असती तर हिरो सायकलला ‘हिरो’ ठरविण्याची घाई केली नसती. आमचा ‘हिरो’ सायकलला कसलाच विरोध नाही. किंबहुना त्यांच्या सायकल उत्तमच असतात. आमचे म्हणणे इतकेच आहे की, कुणाला देशभक्त आणि हिरो ठरविण्याची घाई करू नका. अब्जावधींचा खेळ करणारे भावनेवर आधारित करार करीत नाही आणि भावनांच्या आहारी जाऊन कधीही करार मोडत नाहीत. त्यामुळे हिरो सायकल कंपनीने चीनशी करार केवळ व्यवहारी दृष्टीकोनातून रद्द केला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हिरो सायकल कंपनीला युरोपात विस्तार करायचा आहे. त्यासाठी त्यांनी 2015 सालापासून तयारी सुरू केली आहे. युरोपीय बाजारात इ सायकलला मोठी मागणी आहे. इ-सायकलच्या एकूण जागतिक उलाढालीतील 5 टक्के हिस्सा आपल्या ताब्यात असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला भारतातील फायरफॉक्स सायकल कंपनी ताब्यात घेतली. अ‍ॅटलास सायकल कंपनीही विकत घेण्याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. सायकलच्या भागांचे स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांनी पंजाबच्या लुधियाना शहरात 100 एकरवर होणार्‍या ‘सायकल व्हॅली’ येथे भव्य कारखाना उभारण्याची तयारी केली आहे.

देशात त्यांची ही तयारी सुरू असताना त्यांना चीनकडून संपूर्ण इ-सायकल किंवा त्याचे भाग आयात करावे लागत होते. ही इ-सायकल 15 हजार ते एक लाख रुपयाला असते. ती महाग असल्याने भारतात जेमतेम अडीच हजार सायकल खपतात. पण युरोप मार्केटमध्ये त्याला मोठी मागणी आहे. यासाठी ते चीनशी 900 कोटींचा करार करणार होते. पण दरम्यानच्या काळात त्यांनी जर्मनीतील इ-सायकल बनविणारी एचएनएफ निकोलाय ही कंपनी हेरली आणि त्या कंपनीत याच वर्षी जानेवारी 2020 मध्ये 48 टक्के गुंतवणूक केली. या कंपनीचा मोठा कारखाना आहे, संशोधन केंद्र आहे. भारतात स्वस्तात उत्पादन होत असल्याने इ-सायकलचे सुटे भाग भारतात बनवायचे (लुधियानाच्या सायकल व्हॅलीतील कारखाना उभा राहिला की आणखी सोय होईल) आणि जर्मनीतील कंपनीच्या कारखान्यात ते एकत्र करून तिथूनच युरोपच्या पूर्ण मार्केटमध्ये या इ-सायकल विकायच्या हा करार झाला. या विक्रीसाठी इंग्लंडच्या अ‍ॅव्होसेट स्पोर्ट लि कंपनीतही हिरो सायकलने गुंतवणूक केली आहे.

इ-सायकल बनविणार्‍या बड्या जर्मन कंपनीशी करार झाल्याने यापुढे चीनहून इ-सायकल घेण्याची गरज नाही आणि सुटे भाग घेण्याची गरज नाही. चीनची गरज संपल्याने चीनशी करार करण्याचा निर्णय रद्द केला. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. हिरो सायकल भरारी घेते आहे त्याचे कौतुक व्हावे, पण उगाच त्याला देशभक्तीचा टिळा लावू नका.

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...