कोरोनाच्या संकटाने मानवजातीला हवालदील केले आहे. परंतु हे संकट गेल्यावर सर्वकाही पूर्वीसारखे होईल अशी खात्री सर्वांनाच आहे. या खात्रीमुळेच मानवातील पशु अद्याप जागा झालेला नाही. पुढे अंध:कार दिसू लागला तर मानव कसा वागू लागेल याची कल्पनाच न केलेली बरी.
कोरोनाचे संकट टळल्यावर पूर्वस्थिती येईल हे खरे आहे. पण ही केवळ बाह्य स्थिती असू नये. माणसातील माणुसकी टिकून राहील का? आणि माणुसकी हाच सर्वात मोठा आदर्श आहे असे आपण मानत राहू का? हे दोन प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्येक देशातील समाजाची पुढील वाटचााल या दोन प्रश्नांच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे.
भारताच्या संस्कृतीत माणुसकीला सर्वोत्तम स्थान दिले आहे. याच विचारातून श्रीमंत, गरीब, सबळ, दुर्बळ सर्वांना समान न्याय, समान संधी हे समाज मनात खोलवर रुजविले गेले आहे. पण कोरोनाच्या संकटाने सुसंस्कृत पणाचे हे मूळ बीज गदागदा हलविले आहे. पैसा आणि ओळख या दोन गोष्टींना या काळात अत्युच्च स्थान प्राप्त झाले आहे. पैसा खुदा नहीं, पर खुदा से कम भी नहीं असे भाजपाचा एक नेता बोलला तेव्हा आपल्याला सांस्कृतिक धक्का बसला होता. परंतु आताच्या काळात ते वाक्य सत्य आहे की काय असा विचार मनात डोकावू लागला आहे आणि हा विचार मनात येणे अत्यंत धोकादायक आहे. किंबहुना कोरोनाचे संकट संपल्यावर हाच विचार सर्वात धोकादायक ठरणार आहे.
कोरोनाच्या या काळात सामान्य माणसाला येत असलेल्या भयंकर अनुभवांमुळेच पैशाचा राक्षस मनात घर करू लागला आहे. आज गरीबाला कुणी वाली राहिलेला नाही. कुणी गरीब किंवा मध्यमवर्गीयाला कोरोना झाला तर त्याला लगेच आयसीयू बेड मिळण्याची शक्यता नाही. ऑक्सीजन बेडही त्याला मिळणार नाही. रेमेडेस्विरसारखी औषधे त्याच्या हाती लागणारच नाहीत. साधा हॉस्पिटलचा बेडही त्याला मिळत नाही. या कोरानाच्या काळात दोनच प्रकारच्या रुग्णांवर उपचार होत आहेत. ज्याच्या राजकीय क्षेत्रातील लोकांशी ओळखी आहेत आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा अशाच रुग्णांवर झटपट उपचार सुरू होतात. बाकी सर्वांना वार्यावर सोडून दिले आहे. चार सहा तास तो रुग्णालय मिळण्याची वाट बघतो आणि मग ऑक्सिजनची वाट बघत शेवटची घटका मोजतो. पुण्याच्या निवृत्त शास्त्रज्ञाचे असेच निधन झाले. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या आप्तांना दुसर्याचेच पार्थिव दिले जाते. या सर्व घटनांना काय म्हणायचे?
गरीबांची ही स्थिती असताना अमिताभ आणि अभिषेक बच्चनला तासाभरात नानावटीत बेड मिळतो. तासाभरापूर्वी नानावटीत बेड नाही असे ज्याने एखाद्या गरीबाला सांगितले असेल त्या माणसाला काय बोलायचे? हिरानंदानी रुग्णालय आठ लाखांसाठी पार्थिव अडवून ठेवते, अनेक रुग्णालयांत राजकीय नेत्यांचे फोन गेल्यावरच बेडची सोय होते याला काय म्हणायचे? ज्या हजारोंना हे क्लेशदायक अनुभव आले असतील त्यांच्या आप्तांनी पुढच्या काळात माणुसकीला श्रेष्ठ मानायचे की पैसा आणि ओळखींना सर्वोच्च स्थान द्यायचे? रोज या गोष्टी घडत आहेत. आपल्या आप्ताच्या अंत्यदर्शनाला जाण्यास मनाई होते कारण जिल्हा पार करायचा नाही, पण दिवंगत ऋषी कपूरची कन्या खास परवानगी घेऊन दिल्लीहून मुंबईला येते.
प्रत्येक पावलावर जर पैसा आणि ओळखीनेच उपचार मिळणार असतील तर यापुढे माणुसकीला खुंटीवर टाकून पैशाच्या मागे हा समाज लागला, प्रतिष्ठेच्या मागे हा समाज लागला तर या समाजाला दुषणे देता येणार नाहीत. कोरोनाच्या या काळात माणुसकी अदृश्य झाली आहे. समान न्यायाचा अनुभवच येत नसेल तर इतकी वर्षे उराशी बाळगलेली ही तत्त्वे हा आदर्श मार्ग समाजाला कुचकामी वाटू लागला तर नवल वाटायला नको. वाल्याचा वाल्मिकी होण्यास वेळ लागतो. पण सततच्या या कटु अनुभवांनी वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे हे कलयुग पाहील. असे घडले तर भविष्य अत्यंत अंध:कारक, कुटील, जटील असणार आहे. कारण माणूस पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे लागला की कोणताही विधीनिषेध पाळत नाही. या मार्गाला गेलास तर तुझा वाईट शेवट होईल असे कितीही सांगितले तरी तो थांबत नाही. मी सर्वात वाईट अनुभव घेतला आहे. याहून माझे वाईट होऊ शकत नाही. पैसा मिळाला तर निदान चार दिवस ऐष करीन हे त्याचे उत्तर येईल. कोरोनाचे संकट तर जीवघेणे आहेच, पण या संकटावेळी येणार्या अनुभवांमुळे माणसातील माणूसपण गेले तर ते संकट अधिक गहरे अधिक व्यापक ठरेल. याच संकटाचे ढग आता दाटू लागले आहेत.
कोरोनाच्या या संकटात सर्वांना समान वागणूक मिळणे महत्त्वाचे आहे. ही समानता राखणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ही जबाबदारी पार पाडली नाही तर पैसा आणि प्रतिष्ठाच सबकुछ मानणारा ब्रम्हराक्षस निर्माण होईल आणि हा राक्षस समाजाची वीणच उद्ध्वस्त करील
No comments:
Post a Comment