मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले, अशी ओरड ठोकत काँगे्रसचे आमदार (नारायण राणे पुत्र) नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकरना फरफटत गडनदीच्या पुलावर नेले. तिथे त्यांना खांबाला बांधले आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली! नितेश राणेंनी दोन महिन्यांनी येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी फडफड सुरू केली आहे. त्यासाठी मोठे नाट्य उभे करीत त्यांनी शासकीय अधिकार्याला अत्यंत हीन प्रकारची वागणूक दिली. अधिकारी चुकत असतील, पण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. इथे चढ्या आवाजात जाब विचारण्याची मर्यादा पाळतात. एखाद्या असहाय अधिकार्याला अशा तर्हेने मस्ती दाखवत, दादागिरी करीत वागवणे महाराष्ट्रात शोभत नाही आणि महाराष्ट्रात स्वीकारलेही जाणार नाही. आमदार नितेश राणेंनी, असहाय
अधिकार्यापुढे ताकद दाखविली. पण केेंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींपुढे नितेश राणेंच्या मुखातून शब्द निघणार नाही. या चिखलफेकीनंतर रात्री आमदार नितेश राणे यांना गुंडा गर्दी आणि मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. कणकवली पोलिसांनी ही अटक केली.
आज सकाळी 11 वाजता हे चिखलकांड घडले. यामध्ये आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आघाडीवर होते. आज सकाळी रस्त्यातील खड्डे आणि चिखल दाखविण्याच्या बहाण्याने उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांनी कणकवलीला बोलविले. त्यानंतर त्यांना खड्डे दाखवत चालत चालत जानवलीच्या गडनदीवरील पुलावर नेण्यात आले.
यावेळी नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे व 50 ते 60 स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही होते. हे कार्यकर्ते उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्कीही करत होते. गडनदीच्या पुलावर येताच आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेर्यासमोरच प्रकाश शेडेकर यांना खडसावयाला सुरुवात केली. सामान्य जनता दर दिवशी जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण अनुभवा, असे नितेश राणे यांनी शब्द उच्चारताच चिखलाची बादली भरून तयार असलेल्या कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावरून अंगावर चिखल ओतला. त्यानंतर अगोदरच दोर घेऊन तयार असलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधले आणि त्यांच्या अंगावर लागोपाठ चिखलाच्या बादल्या ओतून त्यांना चिखलाने आंघोळ घातली. गेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे असे शेडेकर गयावया करून सांगत होते, तरीही त्यांच्यावर
हल्ले सुरू राहिले. नितेश राणे यांच्या या दादागिरीमुळे बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी भेदरले आहेत. यापूर्वीही नितेश राणे यांनी अनेक अधिकार्यांना असेच धमकावले आहे. पोलीस अधिकार्यांनाही दम भरला आहे. या सर्व घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्या प्रशासनातील अधिकार्यांमध्ये व कामगारांमध्ये राणे यांच्याबद्दल संताप आहे, पण सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याने अधिकारी तक्रार करीत नाहीत. मात्र उप अभियंता प्रकाश शेडेकर यांनी चिखल फेकीनंतर केलेली याचना आणि गयावया पाहता आपल्याला कोणी वाली नाही, हेच त्यांना कळून चुकले आहे, असे स्पष्ट दिसत होते.
दरमान, अभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक- मारहाणप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर सहा जणांची नावे शेडेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर नितेश राणे हे कणकवली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेदरम्यान पोलीस ठाण्यासमोर राणे समर्थकांनी गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी नितेश राणेंना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कणकवली महामार्गावर आज दुपारी शेडेकर यांना झालेल्या मारहाणीनंतर ते पोलीस बंदोबस्तात कुडाळ येथे आपल्या निवासस्थानी आले. तेथून कपडे बदलल्यावर कुडाळ पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत कुडाळ पोलिसात प्रकाश शेडेकर ( 52) यांनी फिर्याद दिली की, त्यांनी मला गडनदीच्या पुलावर थांबायला सांगितले होते.त्याप्रमाणे ते थांबले असताना 10: 40 वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवलीच्या दिशेकडून पुलावर चालत आले. त्यावेळी त्यांचे सोबत पत्रकार, नागरिक, कार्यकर्ते असे 40 ते 50 लोक होते. यावेळी त्यांनी त्यांना काहीही बोलायला न देता तु पीलर बांधायची घाई का केली? गटार कोण बांधणार तु का मी, तु का एवढा निगर गठ्ठ झालेला आहेस का? तुला दाखवू काय कसे असत चिखलातून जाणे, तुला चिखलातच लोळवतो, सर्व्हीस रोड अजुन का नाही बांधलास? गोव्यात कसा बांधलास, माती कशी उडते अंगावर दाखवू का तुला असे राणे हे बोलू लागले आणि यावेळी माझ्या मागून दोन व्यक्ती येत त्यांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या चिखल बादल्या घेवून बादल्यातून आपल्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. तसेच त्यावेळी मी पळून जावू नये म्हणून राणे यांनी माझा हात पकडून ठेवला. यावेळी चिखल ओतणार्या दोघापैकी मिलिंद मेस्त्री (रा. कलमठ) यांना त्यांनी ओळखले. त्यानंतर आम. राणे यांनी आपल्याला ढकलुन पुलाच्या कडेस नेले व त्यांच्या कार्यकर्त्यांना याला बांधा रे असे म्हणून मला बांधून ठेवण्याची चिथावणी दिली. तसेच तुला चिखलात नेवून टाकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत यांनी महामार्गावर बांधलेली पांढरी पट्टी तोडून काढत त्या पट्टीने मला बांधून ठेवले आणि त्यानंतर हाताला धरून ढकलत चालत नेले आणि अॅड. उमेश सावंत यांच्या घरासमोरील साचलेल्या पाण्यातुन चालत नेले. यावेळी तेथे उभे असताना नगरसेविका मेघा गांगण यांनी पाठीवर हाताच्या थापटाने धक्काबुक्की केली. यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी गर्दीतून आपल्याला बाजूला नेले. झालेल्या मानहानीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून आपण कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती फिर्यादीत शेडेकर यांनी दिली. दरम्यान, अटकेनंतर नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
नारायण राणेंचा माफीनामा
पण मुलाला वाचविण्याचा प्रयत्न
कणकवलीच्या गडनदीच्या पुलाला बांधून उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेकीबद्दल त्यांचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र त्यांनी नितेश राणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, अभियंत्यांवर चिखलफेक नितेश राणेंनी नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी केली.
No comments:
Post a Comment