उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अनेकांना कुतुहल आहे. भगव्या वेषातील योगी असे व्यक्तिमत्त्व असलेला माणूस राजकारणात येतो आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो याचे बहुतेकांना आश्चर्य वाटते. पण योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास बघितला तर तरुण काळापासून मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड राहिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील पंचूर गावी झाला. हे गाव आता उत्तराखंडात समाविष्ट आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा अजय मोहन बिश्त हे त्यांचे नांव होते. त्यांचे वडील फॉरेस्ट रेंजर पदावर सरकारी नोकरीत होते. चार भाऊ आणि तीन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. पण इतके मोठे कुटुंब असूनही अजय बिश्तने उत्तम शिक्षण घेतले. उत्तराखंडात असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा महाविद्यालयातून त्यांनी चक्क गणित विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले. पण नोकरी, कुटुंब या सामान्य जीवनात त्यांना रस वाटत नव्हता. ते जेमतेम 18 वर्षांचे होते. तेव्हा अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आंदोलन सुरू झाले आणि अजय बिश्तने कुटुंबाला रामराम ठोकून आंदोलनात उडी घेतली. हा नवा प्रवास सुरू असतानाच गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. महंत अवैद्यनाथ हेही या शिष्यामुळे प्रभावित झाले. ते अजय बिश्तच्या आईवडिलांना भेटले आणि त्यांच्या मुलाला शिष्य म्हणून घेऊन जाण्याची परवानगी दिली. आईवडिलांनी आनंदाने परवानगी दिली. अजय बिश्त हे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. याच महंत अवैद्यनाथ यांनी अजय बिश्त यांचे नांव योगी आदित्यनाथ ठेवले. तेव्हा योगी 21 वर्षांचे होते.
गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ हे अध्यात्मिक गुरू असले तरी राजकारणात पूर्ण सक्रीय होते. महंत अवैद्यनाथ हे हिंदु महासभेचे नेते होते. 1991 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. ते स्वतः लोकसभेवर निवडून आले होते. पण राजकारणात असूनही हिंदू महासभा आणि भाजपा या दोन प्रवाहात स्वतःला पूर्ण झोकून न देता त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान राखले होते. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा योगी आदित्यनाथ सांभाळत असत.
1994 साली महंत अवैद्यनाथ निवृत्त झाले आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आपले वारस नेमले. त्यानंतर गुरुच्या पावलावर पाऊल टाकत 1998 साली योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणूक लढले आणि निवडून आले. 26 व्या वर्षी ते खासदार झाले होते. ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 अशी प्रत्येक लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली. लोकसभेत त्यांची 77 टक्के उपस्थिती असायची. आज ते उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विषयी रोज नवीन वाद निर्माण होतो. सध्याचे ते सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री आहेत.
No comments:
Post a Comment