शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आजपासून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत तर एका महत्त्वपूर्ण पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे यश/अपयश हे त्यांच्या सरकारचेच राहणार नसून शिवसेनेवर त्यांचा मोठा परिणाम होणार आहे. परिणामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी आहे. एखादा मुख्यमंत्री अपयशी ठरला तर ती व्यक्ती बदलता येते. पण उद्धवजींच्या बाबतीत हा पर्यायच असू शकत नाही. कारण ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही आहेत.
उद्धव ठाकरे यांना पूर्वी राजकारणात रस नव्हता. छायाचित्रीकरण हा त्यांचा आवडता विषय होता. यात त्यांचे कौशल्य आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. ‘साहेब, बॅडमिंटन खेळत आहेत.’ हेही वाक्य त्यांना फोन करणार्यांनी कधी न कधी ऐकवलेच असणार आहे. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती जबाबदारी पेलली. अत्यंत टोकाची टीका सहन केली. आपले व्यक्तिमत्त्व आक्रमक नाही हे ओळखून हळूहळू शिवसेनेत बदल केला आणि त्यात धूर्तपणा आणला. एकेक चाल खेळत ते इथपर्यंत येऊन पोहचले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ इतर कुणाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत हे जाणून त्यांनी केवळ नाईलाजाने हे मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते अपयशी ठरले तर शिवसेनेचा शेवट होईल हा धोका त्यांना पत्करावा लागला आहे.
शिवसेनेने आजवर रांगडे राजकारण केले, भावनिक राजकारण केले, जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला साद घालून पक्षाची एकजूट आणि उत्साह कायम ठेवला. पण सरकारमध्ये बसल्यावर भावनेला साद घालून उपयोग नसतो. जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. कधी कधी या अपेक्षा अतिशय वाढतात. त्याला तारतम्यही राहत नाही. अशा वेळी निर्णय घ्यायचे आणि जनतेला ते समजावून सांगायचे हे अग्निदिव्य असते. रस्त्यावर उभे राहून घोषणा देणे वेगळे, जाहीरनाम्यात आश्वासने देणे वेगळे आणि प्रत्यक्ष आर्थिक आकडेवारी मांडून निर्णय घेणे हे वेगळेच असते. त्यातच देवेंद्र फडणवीसांसारखा दुखावलेला विरोधी पक्ष नेता आणि सणसणीत चपराक खाल्ल्याने संतप्त असलेला भाजपा यांनाही रोज तोंड द्यायचे आहे. शरद पवार आणि सोनियाजींचे हट्ट पुरवायचे, विरोधकांना झेलायचे, जनतेचे समाधान करायचे आणि त्याबरोबर शिवसेना वाढवून पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीला सामोरे जायचे हा प्रवास धगधगत्या निखार्यावर चालण्यासारखा आहे. मनात जर विश्वास आणि आस्था असेल तर त्यावरून चालताना पाय पोळत नाहीत. नाहीतर प्रत्येक पावलाला चटका बसतो. आजवर उद्धवजींनी अनेकदा टोकाच्या भूमिका घेतल्या आणि नंतर त्या हव्या तशा वाकवल्या किंवा तोडूनही टाकल्या. आता असे चालणार नाही. कारण केवळ भूमिका घ्यायची नसून निर्णयही घ्यायचा आहे आणि या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पक्षावरही होणार आहे. ही तारेवरची कसरत ते कशी पार पाडतात याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे.