आज भारतातून सूर्यग्रहण पाहण्याचा अभूतपूर्व असा वैज्ञानिक योग आला. अनेकांनी या संधीचा फायदा घेतला, पण दुर्दैवाने बहुसंख्य भारतीय अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू शकले नाहीत. सकाळी सूर्यग्रहणाच्या काळात एखादा परदेशी पाहुणा पत्रकार भारतात असता तर त्याने वैज्ञानिकरीत्या सूर्यग्रहण पाहणार्या एक टक्का डोळस भारतीयांवर लिहिले असते की, अंधश्रद्धा पाळणार्या बहुसंख्य भारतीयांबद्दल लिहिताना ‘देव झाकणारा देश...’ असे शीर्षक दिले असते, असा प्रश्न निर्माण झाला.
माणूस हा मुळात घाबरट, चंचल मनाचा, अस्थिर प्राणी आहे. त्यामुळे त्याने सर्व विश्व व्यापून टाकणार्या दैवी शक्तीच्या मूर्त स्वरुपाची निर्मिती केली आणि आपल्या आयुष्यातील सर्व बर्यावाईट घटना या त्या दैवी शक्तीमुळे घडतात, असे सांगून नामानिराळा झाला. आश्चर्य म्हणजे या चराचर व्यापून टाकणार्या दैवीशक्तीवरही माणसाने अमावास्या आणि ग्रहणाच्या काळात अविश्वास व्यक्त केला. या दैवीशक्तीची शक्ती अपार आहे हेही मान्य करण्यास माणूस तयार नाही. म्हणूनच ग्रह-तारे फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर त्याचा दैवीशक्तींवरही वाईट परिणाम होईल, असे मानून भारतीयांनी अमावास्या आणि ग्रहण आहे, असे सांगत मंदिराची कवाडेच बंद केली. देवांनाच झाकून टाकले. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना ज्याच्या इशार्यावर चालतात असे मानले जाते, त्या देवाला अमावास्या आणि ग्रहणापासून धोका निर्माण होतो? मग तो देव कसला आणि त्याची शक्ती कसली? देवाला सूतक लागू शकते का? जो आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवेल असे आपण मानतो तोच संकटात सापडू शकतो का? ग्रहणाच्या वेळी सूतक लागते म्हणून देव झाकून ठेवायचे आणि देवाचे दर्शन घ्यायचे नाही याचाच अर्थ आपण देवाची अपरंपार शक्ती मान्य करीत नाही. त्याच्या शक्तीबद्दल शंका घेतो आणि आपणच जर त्या शक्तीचे महात्म्य मानत नसलो तर मग आपण नेमके आस्तिक आहोत की नास्तिक आहोत?
देवाला झाकून ठेवता, गाभारे अंधारात ठेवता, मंदिराची दारे बंद करता, देवाला सूतक लागले म्हणता आणि त्याऊपर स्वतःला त्याचे भक्त म्हणवता? हा जगातील सर्वात उच्च पातळीचा विरोधाभास आहे. मंगळावर यान सोडताना शुभशकुन म्हणून आपण श्रीफळ वाढवितो त्याचाच हा पुढचा प्रकार आहे. त्याहून पुढची हद्द म्हणजे बीसीसीआयनी ट्विट करून रणजी सामने ग्रहणामुळे पुढे ढकलल्याचे जाहीर केले. श्रद्धा, सबुरी आणि विज्ञानाच्या मार्गावर पुढे जायचे आहे की अंधश्रद्धा आणि अशांततेच्या विळख्यात अडकून खितपत पडायचे आहे हे कधीतरी ठरविले पाहिजे.
ग्रहणावेळी इन्फ्रारेड व अल्ट्राव्हायोलेट किरणे प्रखरपणे बाहेर पडतात हे धांदात खोटे आहे, असे दा.कृ.सोमण म्हणतात. ते सांगतात की, सूर्यापुढे चंद्र येण्याला ग्रहण म्हणतात. त्यावेळी सूर्यात काहीच बदल होत नाही. त्याच्या किरणात काहीच बदल होत नाही. त्यामुळे एरवी दुपारच्या उन्हात चालून त्रास होतो, तितकाच त्रास होऊ शकतो. गर्भार महिलांवर काहीही दुष्परिणाम होत नाही, जेवल्याने, अन्न शिजवल्याने कोणताही अपाय होत नाही. आपण ग्रहणात फक्त सूर्याकडे बघताना काळजी घेतो. याचे कारण एरवी सूर्याच्या प्रखरतेमुळे आपण सूर्याकडे थेट बघत नाही. पण ग्रहणावेळी सूर्यावर सावली पडल्याने सूर्याकडे पाहणे सुसहय्य होते. परिणामी सूर्याकडे पाहत राहतात आणि मग डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम होऊ नये इतकीच काळजी ग्रहणात घ्यायची असते. पण आज भारतातल्या अनेक भागात अन्न शिजले नाही, सकाळचे नाश्त्याचे स्टॉल लागले नाहीत, रस्त्यावर नेहमीची गर्दी दिसली नाही. तीन चतुर्थांश भारत जणू ग्रहण संपेपर्यंत स्तब्ध झाला होता. शौचासही जायचे नाही असे मानणारे अनेक आहेत. पाणी प्यायचे नसते असेही सांगतात. म्हणजे आजारीच पडायचे आणि ग्रहणाच्या अशुभ काळामुळे आजारी पडलो असे सांगत फिरायचे. गंमत अशी आहे की, हे सर्व अंधश्रद्धेचे नियम घालणारे कोणतेही आजारपण स्वतःच्या माथी मारून घ्यायला तयार नाहीत. म्हणून हे नियम सांगणारे असेही सांगतात की, ग्रहणातील सुतकात असलेले निर्बंध हे वृद्ध, बालके, रुग्ण, गर्भार महिला यांना लागू नाहीत.
हिंदू धर्म हा बदलत्या काळानुसार नवनवीन संकल्पना स्वीकारणारा धर्म आहे आणि म्हणूनच सतत आक्रमणे होऊनही या धर्माचा पाया कधीही दुभंगला नाही. आपण हा धर्म मानत असू तर त्यातील त्रासदायक ठरणार्या अंधश्रद्धा उखडून फेकल्या पाहिजेत. आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन आहे. ग्रहणातील सूर्याच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन आहे. त्यात राहूने सूर्य खाल्ला आणि मग सूर्य त्याच्या तोंडातून सुटला असे म्हटले आहे. तेव्हा वैज्ञानिक ज्ञान कमी होते म्हणून हा युक्तिवाद झाला, पण आता ग्रह-तार्यांचे इतके ज्ञान वाढल्यावरही तोच पूर्वीचा युक्तिवाद ग्राह्य मानायचा का? उलट आपण अभिमानाने म्हटले पाहिजे की, आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन केले आहे इतका प्राचीन आपला अभ्यास आहे. इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट यांनी ग्रहणाचा अभ्यास करून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण दिसते हे लिहून ठेवले आहे. अशा या महान आर्यभट्टाच्या कुळात आपण जन्माला आलो आहोत. त्यांचा अभ्यास पुढे न्यायचा की ग्रहणात देव झाकायचे? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक सुताचा फरक असतो. या सुतावरून भविष्याचा मार्ग ठरतो.