मी सायमनचा वाढदिवस मिस केला. मला खूप वाईट वाटलं. २१ जुलैला सायमन ४० वर्षांचा झाला. त्याची माझी भेट कधी झाली नाही आणि होईल अशी अपेक्षाही नाही. पण काही माणसात अशी काही कला असते की ही माणसं आयुष्यभर आपल्यासाठी जिवंतच वाटतात.
सायमन रीव्हने जग पायाखालून घातले आहे. त्याचे ‘बीबीसी’ चे लघुपट बघितले नसतील तर अगदी नक्कीच बघा. पर्यटनावरचे खूप शो आपण पाहत असतो. तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहून आपण अवाक होतो. म्हणजे लगेच आपण ठरवतो की आपल्याला आयुष्यात एकदा तरी तिथे जायचेच आहे. काहीजण तर खाण्यावर इतके प्रेम करतात की वेगवेगळ्य़ा देशातील खाद्यपदार्थ पाहूनच त्यांचे पोट तिथे जाऊन पोहोचते.
सायमनही पर्यटनच करतो. त्याच्या व्हिडिओत ऑस्ट्रेलिया, रशिया, टर्की, ग्रीस, आर्यलंड, कोलंबिया, समुद्र , पवित्र नद्या असं सगळंसगळं आहे आणि या सगळ्याबरोबर आणखी काहीतरी विशेष आहे. सायमन संपूर्ण देशच समजून सांगतो. तिथल्या साजकीय घडामोडी, अर्थशास्त्र, आंदोलनं सर्वकाही आपल्याला तासाभरात समजून जाते. तुम्हाला वाटेल की हे असलं बघायचं म्हणजे बोअर असेल. तर तसं अजिबात नाही. सायमन लेक्चर देत नाही. अर्धा तास सलग बडबड करीत नाही. त्या देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत फिरत आपल्याला तो देश दाखवतो आणि ही मस्ती करतानाच अगदी सहज एक दोन वाक्य अशी टाकतो की त्या देशाच्या सर्व पैलूंची माहिती व्हावी. म्हणून तर मी सायमन रीव्हची फॅन आहे. जड जड शब्द, लांबलचक लेक्चर, नाहीतर अतिसंथ गतीने काही सांगितलं की खूप कंटाळा येतो. आपल्या जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची कला पाहिजे. काहीजणांना सायमन उथळ वाटतो, पण मला वाटतं पत्रकारिता अशी असावी. माहिती सांगावी तर त्याच्यासारखी सांगावी. तरूण तजेलदार चेहरा, अत्यंत बोलके हावभाव, अंगात एक प्रकारचा खेळकरपणा आणि ओठांवर सतत हसू असतं. रशियाचे हुकूमशहा पुतिन हे विरोधकांचा आवाज घोटतात हेही तो एका पत्रकाराची दोन प्रश्नांची मुलाखत घेऊन त्यातून आपल्या डोक्यात विचार घालतो तेव्हा त्या कौशल्याची दाद आपसुकच दिली जाते.
सायमनची आणखी एक गोष्ट मला आवडते.हा शाळेत एकदम ढ होता. ग्रॅज्युएट होणं शक्यच नव्हतं त्याला म्हणून मग मॉलमध्ये , दागिन्यांच्या दुकानात अशा वाटेल त्या नोकऱ्या केल्या आणि करता करता इंग्लंडच्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पोष्ट्या बनला, म्हणजे त्यांचे टपाल त्यांच्या कार्यालयात पोचवायचा. ओळख वाढल्यावर हळूहळू कार्यालयात बसून टपाल वाटू लागला. मग जे वाचायचा त्याची माहिती शोधू लागला. हळूहळू त्या वर्तमानपत्रात लिहू लागला आणि शेवटी चक्क वार्ताहर झाला. आता तो बीबीसीचा स्टार आहे. त्याची स्टोरी मी सांगत नाही. काधीतरी त्याच्याच उडनखटोला- मस्तीभऱ्या अंदाजात मला ती ऐकायला आवडेल.
तर सायमन रीव्ह, बिलेटेड हॅप्पी बर्थडे! असाच फिरत राहा आणि आम्हालाही फिरवत राहा.