Monday, 24 September 2018

‘सर्जिकल स्ट्राईक’चा वाढदिवस साजरा करणे ही बुद्धीची दिवाळखोरी!



      भाजपा हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे अशी जनतेला आशा वाटली आणि केंद्रात भाजपाची सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर भाजपा सरकारने भलत्याच विषयात रस घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे 2014 नंतर 2019 सालच्या निवडणुकीसाठी भाजपाला विकासाचा मुद्दा सोडून प्रचारावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. भाजपाने विकासाचा मुद्दा तर गुंडाळलाच, पण कोणत्या मुद्यांचा प्रचार करावा याचा विवेकही पक्षाकडून हरवत चालला आहे. प्रमोद महाजनांच्या ‘इंडिया शायनिंग’च्या प्रचाराने भाजपाची सत्ता गेली, यातून कोणताही बोध न घेता सफाईपासून सर्जिकल स्ट्राईकपर्यंत नको तो ढोल वाजविण्याचा निर्णय अमित शहा यांनी घेतला आहे. पण हा ढोल वाजणार नाही तर निश्चितपणे फाटणार आहे.


       भाजपाने सत्तेसाठी प्रचाराचा धुमाकूळ घालायचा हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. जे घडले नाही किंवा जे नेहमी घडते ते आम्ही केले असा वायफळ प्रचार सुरू झाला की जनतेला सत्याची जाणीव होते. इतकेच नव्हे तर असा गैरप्रचार करणारा पक्ष सत्तेसाठी बिथरला आहे हेही जनतेच्या लक्षात येते. मग ही जनता दुबळ्या बिथरलेल्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे.


        भाजपाने याच आठवड्यात 29 सप्टेंबरला देशभरात ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचा अत्यंत लज्जास्पद निर्णय घेतला आहे. शनिवारी 29 सप्टेंबरला सर्व वाहिन्यांवर याच विषयाचे कार्यक्रम, वृत्त देण्याचे आदेश गेले आहेत. या दिवशी रेडिओवर भक्तीपर गाणी लावण्यास सांगितले आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेटवर भल्या मोठ्या पडद्यावर कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. इतकेच नव्हे तर या दिवसाचे थिम साँग तयार होत आहे. हा सर्व प्रचार डोळे दिपवणारा असणार हे निश्चित आहे. पण हा प्रचार मन सुन्न करणाराही आहे. पाकिस्तानवर केलेल्या गुप्त लष्करी हल्ल्याचा प्रचार करायचा असतो का? लष्करी हालचालींचे असे प्रदर्शन मांडायचे असते का? पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या सैन्याने त्यांची ठाणी उडविली याच्या चित्रफिती तयार करून त्याचे प्रक्षेपण वाहिन्यांवरून करणे योग्य आहे का? भारताच्या लष्कराने पूर्ण गुप्तता पाळून पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे असे प्रदर्शन मांडायचे ही अत्यंत विकृत मानसिकता आहे. हे प्रदर्शन मतांसाठी मांडायचे हा तर विकृतीचा कडेलोट आहे. देशाबद्दल आणि भारतीय लष्कराबद्दल अभिमान जागृत व्हावा म्हणून आम्ही हा दिवस साजरा करीत आहोत, असा भाजपाकडून युक्तीवाद होईल. पण हा अभिमान जागृत करायचा असेल तर रोज देशभक्तीपर गाणी ऐकवा. आपले जवान घरी परततात तेव्हा गावागावांत त्यांचा सन्मान करा, त्यांच्या कुटुंबांना प्रथम कुटुंबाचा मान द्या, जवानांना मिळणार्‍या सुविधा आणि शस्त्रास्त्र यात वाढ करा, एक वर्षाचे लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करा. आपला एक जवान रोज सीमेवर शहीद होतो आहे. रोज एक पार्थिव भारताच्या झेंड्यात लपेटून गावी येते आहे. हे यापुढे घडणार नाही यासाठी जे करणे गरजेचेे आहे ते करायला हवे. या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा त्याच्या प्रचारालाही मान्यता मिळेल. परंतु रोज एक वीरपत्नी टाहो फोडते, रोज एका मातेचा हंबरडा चित्त विचलित करतो अशा परिस्थितीत सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करून काय मिळविणार आहात? 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केल्याची दवंडी पिटविणार आहात. त्याआधी असे हल्ले कधीही झाले नाहीत असे म्हणणार आहात का? सैन्याच्या गुप्त कारवाया सतत सुरू असतात, गुप्त चर्चा सतत सुरू असतात. या गुप्त कारवायांतूनच शाश्वत विजय मिळतो. त्यासाठीच या कारवाया आणि चर्चा गुप्त ठेवली जाते. पण आता गुप्त कारवायांचाही इव्हेण्ट केला जाणार आहे. लष्कर प्रमुख अलीकडे पत्रकार परिषदा घेऊन किती दहशतवादी ठार केले याचे आकडे सांगू लागले आहेत. आजवर लष्कर प्रमुख फक्त स्वातंत्र्यदिनी जनतेला पडद्यावर दिसायचे. आता ते प्रत्येक हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेताना दिसतात. लष्कर प्रमुख बिपीन रावत वाहिन्यांना मुलाखती देऊन सांगतात की, आम्ही पाकिस्तानला घाबरत नाही. हा सर्व पोरखेळ थांबायला हवा. लष्कर प्रमुखांचे असे बुजगावणे करणे शोभते का?


           भाजपा सरकारचे राजनैतिक अपयश या सर्वाला कारणीभूत आहे. हे अपयश लपविण्यासाठी सैन्याला दावणीला बांधून निवडणुकीसाठी प्रचार करायचा हे लांच्छनास्पद आहे. उरी भागात दहशतवाद्यांनी हल्ला करून आपले 18 पोलीस मारले. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून त्यांची ठाणी उडविली. भारताच्या जनतेला जेव्हा कळले तेव्हा जनतेला समाधान वाटले. सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही अशी शंका एकाही भारतीयाच्या मनात आली नाही. भारतीय लष्करावर जनतेचा पूर्ण भरवंसा आहे. तरीही 29 सप्टेंबरच्या या गुप्त कारवाईची चित्रफित काही वाहिन्यांपर्यंत पोहचवून त्याची ब्रेकिंग न्यूज करण्यात आली, हे दुर्दैव आहे. आमच्या जवानांच्या शरीराची विटंबना केली जात आहे. पोलिसांना घरात घुसून ठार मारले जात आहे, रोज सीमेवर दहशतवादी हल्ले होऊन भारतमातेचे सुपुत्र शहीद होत आहेत. ही वृत्तंं ऐकून आमची मने हेलावून जातात. डोळ्यात अश्रू तरळतात. हे रोज घडत असले तरी लष्कर याला चोख प्रत्युत्तर देईल असा प्रत्येक भारतीयाला विश्वास आहे. पण लष्कराला केंद्राचे सरकार पुरेसे बळ देते आहे का? हा प्रश्न मनात येतो. ही शंका पुसून काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकच्या चित्रफिती दाखविण्याची गरज नाही. केंद्र सरकारने लष्कराला सक्षम केले की त्याचे परिणाम दिसतीलच. सीमेवरचा दहशतवाद कमी झाला हे जनतेला जाणवेल तेव्हाच जनता सरकारचे गोडवे गाईल. तोच खरा प्रचार ठरेल. मात्र हे न करता सर्जिकल स्ट्राईकचा वाढदिवस साजरा करायचा आणि तिकडे सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांशी चर्चेचे नियोजन करायचे हे स्वत:चे हसे करून घेण्यासारखे आहे.

Monday, 27 August 2018

मंगळागौरीचा इव्हेंट कधी झाला?


     पूर्वीच्या काळात लहान वयात विवाह होत असत. आषाढाचा पावसाचा मास सरला की श्रावणाच्या ऊन पावसाच्या खेळासह पूजा, मंत्रपठण आणि बालवयातील नवरीला काही वेळ नाच, गाण्यात रमता यावे म्हणून मंगळागौर जागरण सरू झाले असावे. फुगडी, झिम्मा, पिंगा यासर्वांची लहानपणी गंमत वाटते. वयात येणाऱ्या मुलींना या प्रकारच्या नाचगाण्यातून चांगला व्यायामही होत होता. जेवणानंतर तुळशीचे पानही खाल्ले जायचे. आरोग्य आणि विरंगुळा यासाठी सुरू केलेले हे प्रकार पाळले जावेत म्हणून त्याला पूजा अर्चेचीही गुंफण दिली गेली.


      दुर्दैवाने या दोन्हीचे एकत्रित महत्व समजून न घेता केवळ पूजाअर्चा, भोजन करायचे आणि मग मंगळागौरीची नृत्य करायला पैसे देऊन महिलांचे विविध ग्रुप बोलवायचे हा प्रकार सुरू आहे. ज्या घरातील नववधूची मंगळागौर असते ती तरूणी आणि घरातील महिला केवळ अधूनमधून नाच गाण्यात सहभागी होतात, बहुतांश वेळ त्या आलेल्या ग्रुपचा नाच बघत बसतात. आजकाल तर स्पर्धाही लावणे सुरू झाले आहे. सर्व वाहिन्यांवर मंगळागौर सुरू असते. अत्यंत पोक्त वयाच्या स्त्रिया मंगळागैर खेळतात. पण हे खेळ लहान मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी होते, त्यांच्या मनोरंजनासाठी होते हे आपण विसरलो आहोत. आता बालवयात विवाह होत नाहीत. तरीही या मुलींना हे खेळ शिकवले पाहिजेत. घागर फुंकणे, फुगडी घालणे हे व्यायामाचे प्रकार या मुलींना उपयुक्त आहेत. मंगळागौर या विचारानेच पुढे गेली पाहिजे. सुपारी देऊन बॅँड बोलवतात तसा मंगळागौर ग्रुप बोलवायचा आणि त्यांचा खेळ बघत बसायचे हे घडत राहिले तर मूळ उद्देश संपेल. घरच्या महिलांनी, मैत्रिणींसह धम्माल करीत हा खेळ खेळण्यातच आनंद आहे. मंगळागौरीचे इव्हेंट मॅनेजमेंट करू नका.x

Wednesday, 15 August 2018

विकत घेऊ का दर्शन?



     मला आठवतय मी वारीत चालत गेले आणि विठुरायाला गर्दीमुळे पाहू शकले नाही. कळसाचे दर्शन घेऊन परतले. पण मंदिरात जाता आले नाही म्हणून तो दिवस माझ्या कायम लक्षात राहिला. कळसाच्या दर्शनाने मी समाधानी होते पण मंदिरात शिरताच येत नाही असे प्रथमच झालं.

    त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाकालेश्वर ओंकारेश्वर आणि त्यानंतर महाकालेश्वर मंदिरात गेले. अत्यंत प्रसिद्ध अशी ही ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यामुळे गर्दीही खूप होती. आम्ही गर्दी टाळून दर्शन घेण्याचे नेहमीचे उपाय केले. प्रत्येकी २५० रू. देऊन व्हिआयपी पास घेतला आणि थेट गाभाऱ्यात पोहोचलो. मग आम्हाला हेरून पुजाऱ्याने चरण जल देतो म्हणून सांगत शंभर रुपयांची बोली केली. शेवटी मंत्रपठण करीत करीत आमच्याकडून ५०० रूपये लुटले. दुसऱ्या देवळात पहिला पहिला सौदा पैलतीरी नेणाऱ्या नावाड्याशी झाला. नावेतून उतरलो तर दहा रूपयांची फुलांची परडी समोर आली. ती घेतरी (परतून पैसे देतान ५० रू. मागितले तेव्हा कळले की परडीत हळूच ४० रूपयांचा प्रसाद टाकला होता आणि त्याचे पैसे मागत होते.) 
      पहिल्या पायरीवर पाय ठेवताच पुजाऱ्याने कोणती पूजा करणार म्हणून सुरूवात केली. दर्शन घेऊन आम्हाला एका हॉलमध्ये नेले. तिथे ओळीत १५/२० पिंडी आणि वर अभिषेक पात्र अशी आधीपासूनच व्यवस्था सज्ज होती. अभिषेक सुरू झाला. ओंजळीत जे देत होते ते वाहत होते. एकदम रूपयेही दान द्या म्हणाले. ती नोट ओंजळीत धरली तेव्हा ती ओली होऊ नये म्हणून पुजाऱ्याने शितापीने ती बोटात धरली. अभिषेक करताना यथाशक्ती दान द्या असी मंत्रातील उच्चार कानावर आले. पण अभिषेक संपल्यावर शंभर रूपये पुढे केल्यावर पुजारी वैतागले. प्रत्येकीकडून दान मागू लागले. आणखी द्या, आणखी द्या म्हणू लागले. मी काहीच दिल नाही म्हणताना पायऱ्यांपर्यंत माझा पाठलाग केला. देवाचा हा एजंट नाराज झाल्याने कटूता आली.


त्या दिवशी मी ठरवलं की, मी पुन्हा कधीही पैसे मोजून दर्शन करणार नाही आणि अभिषेक वगैरेही करणार नाही. दोन्ही देवळांत भक्तांची गर्दी होती. पण आम्ही नोट देताच गाभाऱ्यात पोहोचलो. मागे वळून बघितले तेव्हा रांगेत तासनतास उभे राहिलेले भक्त दिसले. त्यावेळी विचार आला की, देव मला नाही तर ताटकळत दर्शनासाठी उभ्या गरीब भक्ताला भेटेले.
       जे मद्यपदेशात घडले तेच महाराष्ट्रात आहे. हे एजंट बंद केले पाहिजेत. पुढे हे घडेलही पण तूर्त मी माझ्यापासून सुरूवात केली आहे.

    ( मी हिंदू धर्माच्या विरूद्ध बोलले, इतर धर्मांच्या विरूद्ध बोलले असे कुणी म्हणेल, मी देवळात अधूनमधून जाते म्हणून तिथला अनुभव सांगितला. माझ्यावर हिंदू धर्माचे संस्कार आहेत. मग मी इतर धर्मांबद्दल का बोलू? दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्म हा बदल स्वीकारमारा आहे. सुधारणा मान्य करणारा आहे. बंदिस्त नाही. त्यामुळे मन मोकळ करता येत.)

Saturday, 11 August 2018

उद्धवजी आणि राज ठाकरे गणेश मंडळांना वाचविणार कसे?


        यंदाच्या वर्षी उच्च न्यायालयाच्या बडग्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत आली आहेत. उत्सवाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परवानगी देण्याचे पालिकेचे धोरण असले तरी अधिकृत परवानगी घ्यायला मंडळे अद्याप पुढे आलेली नाहीत. कारण परवानगी घेताना अटी पाळण्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. जर या अटी पाळल्या गेल्या नाहीत आणि कुणी तक्रार केली तर त्या मंडळाचा अध्यक्ष, सचिव, खजिनदार अशा सर्वच पदाधिकार्‍यांवर कारवाई होऊ शकते. अशी कारवाई झाली तर मंडळांची नोंदणी तर रद्द होईलच, पण पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाले तर नोकरीवर गदा येण्याचा धोका आहे. आरटीआय कार्यकर्त्यांची तक्रार, त्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय, हा निर्णय अंमल करण्याची पालिकेची जबाबदारी आणि या सर्व बाबींमुळे हतबल झालेली गणेश मंडळे अशी या वर्षीची स्थिती आहे.


             या सर्व प्रकाराने चिंतेत पडलेली गणेश मंडळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे गेली, काही मंडळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे गेली. त्यानंतर राज ठाकरेंनी खेतवाडीतील गणेश मंडळांना भेट दिली तर उद्धवजींनी बिर्ला सभागॄहात बैठक घेतली. दोघाही नेत्यांनी दुर्दैवाने या समस्येवर मार्ग न काढता सरळ घोषणा केली की, नेहमीप्रमाणे धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करा. या घोषणेने पाच मिनिटे सर्वांचे रक्त जोशाने उसळलेच असणार आहे, पण पुढे काय? नेत्यांच्या सांगण्यावरून परवानगी न घेता किंवा अटी न पाळता मंडप उभारले तर दबावामुळे कदाचित गणेशोत्सव पार पडेल, परंतु त्यानंतर मंडळांवर आणि पदाधिकार्‍यांवर खटले होतील, गुन्हे दाखल होतील त्याला तोंड कसे द्यायचे? मंडळाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. पदाधिकार्‍यांना न्यायालयात हेलपाटे घालावे लागतील. त्यात त्यांची नोकरी धोक्यात येईल. वकिलावर भरमसाठ खर्च होईल. त्यावेळी काय करणार? नेते आज आहेत, तेव्हा असतील याची खात्री देता येईल का? आजवर जी आंदोलने झाली तिथे कार्यकर्तेच कायम अडकले. त्यांना वाचवायला कुणी येत नाही. इथेही तेच घडण्याची शक्यता आहे.


          या सर्व बाबींमुळेच ऑनलाईन परवानगी प्रक्रिया सुरू झाल्यावरही मूठभर मंडळांनीच परवानगीसाठी अर्ज केले आहेत. इतर मंडळे अडचणीत येणार आहेत. काही मंडळांनी नव्या अध्यक्षांकडे पदभार सोपविण्याची अधिकृत बैठक घेतलेली नाही. काहींनी बॅलेन्स शीट सादर केलेली नाहीत. काही मंडळे वर्गणी आणि देणग्या घेऊन मंडपात जाण्यासाठी तिकीटही लावतात. ती मंडळे हिशेब कसा दाखवणार, हा प्रश्न आहे. काही मंडळांचे तरुण पदाधिकारी कागदपत्रे तयार करणे, हिशेब देणे हे सोपस्कार पाळण्यास कंटाळा करतात. ही मंडळे परवानगी मागण्यासाठी अर्ज लिहिताना कोणती माहिती देणार आहेत? उच्च न्यायालयाने अट घातली आहे की, मंडप उभारताना पादचार्‍यांना जाण्यासाठी आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा पाहिजे. ज्यांनी 23 आणि 24 फूट उंच गणेशमूर्ती बसविण्याचे ठरवले आहे, त्यांना मंडपही मोठा उभारावा लागतो. अशी मंडळे रस्ता मोकळा सोडण्याबाबत हमीपत्र देऊ शकत नाहीत. त्यात अग्निशमन दलाने तर 24 अटी टाकून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी हमीपत्र मागितली आहेत. असे हमीपत्र आपल्या सहीने देण्याचा धोका कोण पत्करणार आहे? या सर्व अडचणींवर उपाय काय?


            आपल्याच सणांवेळी नियम लावतात, याचा सर्वांनाच राग आहे, परंतु उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो सर्व धर्मातील सणांसाठी लागू आहे, मात्र मुस्लिमांच्या सणांवेळी रस्त्यांवर स्टॉल लावण्यापासून सर्व नियम धाब्यावर बसविले जातात तेव्हा कुणी काही बोलत नाहीत. आपले मराठी नेते तेव्हा गप्पच असतात. पालिका आणि पोलीस नोटीस पाठवतात, पण आपल्याला या नोटिशींच्या परिणामांची चिंता वाटते तशी त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांचे सण जोरात होतात. आपल्यासमोर मात्र अडचणींचा डोंगर उभा राहतो.


        या वर्षी यातून मार्ग काढायचा तर नेत्यांना बाजूला ठेवायला हवे. त्यानंतर पोलीस व पालिका अधिकारी, आरटीआय कार्यकर्ते, समन्वय समिती आणि गणेश मंडळ कार्यकर्ते यांची विभाग पातळीवर बैठक घेऊन सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. पुढील वर्षी मूर्तीची उंची 18 फूट ही मर्यादा पाळली तर मंडपामुळे रस्ते अडणार नाहीत. मूर्तीच्या उंचीची ही हमी दिली तर आजचे प्रश्न सुटतील. शिवाय मंडळांना कागदपत्र पूर्ण करण्यास मदत झाली तर तीही समस्या पुढील वर्षी असणार नाही. आजच्या घडीला न्यायालय, पोलीस, पालिका, मंडळे आणि आरटीआय कार्यकर्ते या सर्वांचेच म्हणणे त्यांच्या परीने योग्य आहे. त्यामुळे कुणाचाच युक्तिवाद बाजूला सारता येणार नाही. या वर्षी जर प्रत्येकाने सामंजस्य दाखवीत एक पाऊल मागे घेतले आणि पुढील वर्षीचे नियम आताच निश्चित केले तर पुढील वर्षी विघ्न न येता आदर्श गणेशोत्सव साजरा होऊ शकेल.

Saturday, 4 August 2018

आंधळे भक्त आणि पैसेखाऊ गुलाम

     सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा विजयी झाला. आमच्या चांगल्या कामामुळे आम्ही विजयी झालो हा भाजपाचा दावा आहे आणि मतदारांना पैसे वाटून भाजपा जिंकली हा विरोधकांचा आरोप आहे. विजयी झालेले सत्ताधारी आणि आरोप करणारे विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. विरोधक सत्तेत होतेे तेव्हा जे करीत होते तेच सत्ताधारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकमेकांवरील आरोपांवर क्षणभरही विचार करून वेळ घालवता कामा नये.

      आजचा प्रश्न असा आहे की, जे मतदान होत आहे ते विचारपूर्वक होत आहे का? विचार करून मतदान करणारा वर्ग जेमतेम एक टक्का असेल. उर्वरित 99 टक्क्यांपैकी बहुसंख्य हे त्या त्या पक्षाचे गुलाम भक्त असल्याने त्यांच्या पक्षाला डोळे मिटून मतदान करतात, आणखी एक मोठा मतदारांचा वर्ग सरळ सरळ पैसे घेऊन मतदान करतो, एक वर्ग जाहिरातींना भुलून मतदान करतो. अशा तर्‍हेने जर आपण मतदान करीत असू तर मग ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी पुढची 5 वर्षे कामेच केली नाहीत म्हणून ओरडत कशाला बसायचे? समाजासाठी काम केले की नाही या विषयावर मतदानच होणार नसेल तर खासदार, आमदार, नगरसेवक कामे कशाला करीत बसतील? भाजपाने नोटबंदीपासून कामगारांचे हक्क हिरावून घेण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या तरी मी भाजपा भक्त म्हणून मिरवत भाजपालाच मत देणार, शिवसेना सत्तेचे लोणी खात घोषणा देत बसलीय तरी मी सैनिक म्हणून सेनेलाच मत देणार, मनसेने पाच वर्षे झोप काढली तरी राज ठाकरे चांगले बोलतात म्हणून त्यांना मत देणार, काँग्रेसमुळे भ्रष्टाचार वाढला तरी आमचं पूर्वीपासून काँग्रेसलाच मत म्हणून हातावर शिक्का मारणार, राष्ट्रवादीने घोटाळ्यावर घोटाळे केले तरी जाणता राजा आहे म्हणून त्यांना मत द्यायचं, हा काय प्रकार आहे? ही गुलामी का? हे पक्ष तुमच्या घरचं रेशन भरतात का? मत कुणाला देऊ समजत नसेल तर उमेदवार कोण आहे, कसा आहे याची माहिती घेऊन मतदान करता येते. पण आपण हे करणार नाही. आपण अरुण भाटियांना हरविले, अविनाश धर्माधिकारींना घरी बसवले, मेधा पाटकरांचे डिपॉझिट जप्त होईल इतकी कमी मते त्यांना दिली. चांगली माणसे राजकारणात येऊ बघत होती त्यांना आपण इतकी वाईट वागणूक दिली की ते कायमचे राजकारण सोडून गेले. ही सर्व माणसं त्या त्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे फार नुकसान झाले नाही. आपले नुकसान मात्र फार मोठे झाले आहे.


      प्रत्येक निवडणुकीत भक्ताच्या झुंडी डोळ्याला झापडं लावून मतदान करतात तसे पैशाच्या महापुरात भिजूनही मतदान होते. पैसे घेऊन मतदान करणार असाल आणि भक्त म्हणून मतदान करणार असाल तर ज्याला निवडून देता त्याला कोणत्या तोंडाने जाब विचारणार? पूर्वी गरीब पैसे घेऊन मतदान करायचे, आता शिकलेली, दोन्ही वेळेस भरपेट जेवणारी कुटुंबही पैसे घेतात. आम्ही नाही त्यातले म्हणणारे सोसायटीची टाकी आणि टाईल्स फुकट लावून घेण्यासाठी पुढे असतात. हे कमी होते म्हणून अनेक चर्चशी संबंधित लोक पैसे मागतात, काही गणेश मंडळं तर थेट प्रत्येक पक्षाला भेटून बोली लावतात. (आम्ही इथेच स्पष्ट करतो की, काही गणेश मंडळं आणि चर्चचे कार्यकर्ते प्रामाणिक असतात. हे यासाठी स्पष्ट करतोय की बोचणारे वास्तव सांगितले की, त्यातील एक मुद्दा शोधून असा बाऊ करायचा की बाकी मुद्दे डब्यात जावे असा उपद्व्याप करण्याची अनेकांची मानसिकता असते), तरुण मित्र मंडळं गल्लोगल्लीत झाली आहेत त्यापैकीही अनेक मंडळं टी शर्ट मागतात, कॅरम मागतात, जीमचं सामान मागतात, आमच्याकडे 200 मतं आहेत, दोन हजार मतं आहेत अशी बोली लागते. पूर्वी गुलामांना भर बाजारात विकत घेतले जायचे. मोठा लढा उभारून तो प्रकार थांबविण्यात आला. पण आता या नवीन गुलामांचे काय करायचे? आपण पैसे घेऊन मतं देणार तर जिंकलेला त्या पैशाची वसुली करण्यासाठी काहीही करील हे उघडच आहे. म्हणजे आपण आपल्या पायावर दगड मारायचा आणि बोंब मारत सुटायचे हेच घडते आहे. भारतात लोकशाही मेली नाही. आपण आपल्या संकुचित स्वार्थासाठी लोकशाही मारली. काही महान बुद्धीमंत म्हणतात की, भारतात हुकूमशाही हवी. हा खुळचट युक्तीवाद आहे. आजवर जगात कुठेही हुकूमशाही जनहिताची झाली नाही. एका माणसाच्या हाती अमर्याद सत्ता दिली तर तो बिघडणारच हा मानवी स्वभाव आहे. हिटलर, मुसोलिनी यासारख्यांनी देश बरबाद केले. जनतेचे हित जपणारे चांगले सरकार यावे असे वाटत असेल तर अंध भक्तीचा टिळा लावायचे सोडा आणि स्वत:चे खिसे भरण्याचे बंद करा. हे घडेल त्या निवडणुकीला चांगली माणसं खुर्चीवर असतील आणि ही चांगली माणसं समाज घडवतील. जोपर्यंत आपण हे करीत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या फक्त गप्पा ऐकत राहायचे. या तमाशाच्या नादी आपण लागलो आहोत, उगाच कलावंतीणीला दोष द्यायचा नाही.


x

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...