आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्याची दानत भाजपने दाखवू नये हे दुर्दैवी आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात ही जाहिरात छापून आठवणींना उजाळा देण्यापलीकडे शिवसेना काही करू शकली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांची आठवण येते असे म्हटले पण आज शिवसेनेचे सर्वोच्च नेते असलेले उद्धव ठाकरे यांना आमंत्रण का नाही असा जाब भाजपकडे विचारला नाही.
सरसंघचालक मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी यांनाही आमंत्रित केले, पण शिवसेनेला पूर्ण डावलले. प्रभू श्री रामाचे पूजन झाले पण त्यांची राजनीती अवलंबली नाही. बाबरी मशीद पडल्याचा खटला सुरू झाला तेव्हा भाजपचे सर्वच्या सर्व नेते दूर पळाले. बाबरी पाडण्यात आमचा हात नाही, असे प्रत्येक जण न्यायालयात सांगत राहिला. स्वतःची कातडी बचावली आणि जे कारसेवक हुतात्मा झाले त्यांना वार्यावर सोडून दिले. जय श्रीराम म्हणून प्राणाची आहुती देणारे एकटे पडले. त्या क्षणी एक व्यक्ती निडरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ही एकमेव व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! ही एकच अशी व्यक्ती होती ज्यांनी शिक्षेची परवा केली नाही, खटल्याची परवा केली नाही. ही एकच अशी व्यक्ती होती जिने निडरपणे सांगितले की, होय, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली. होय हे कार्य आम्ही केले! ही गर्जना करण्याची छाती आज व्यासपीठावर बसलेल्या एकातही तेव्हा नव्हती आणि आजही नाही. अशा शिवसेनाप्रमुखांच्या एकाही प्रतिनिधीला आज व्यासपीठाचा सन्मान दिला नाही, साधं आमंत्रण दिलं नाही. अगदी कालदेखील वाटत होतं की आमंत्रण येईल. कुणीतरी शिवसेनेचा प्रतिनिधी व्यासपीठावर असेल पण तसं घडलं नाही.
रामाने भरताला प्रेम दिले आणि भरताने रामाचा आदर राखला. हे रामायणातच घडते हे आज दुर्दैवाने म्हणावे लागेल. अयोध्येला आमंत्रित केले नाहीच पण निदान मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करायला हवे होते. तेही केले नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी वैर आहे पण ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. या नात्याने त्यांना आमंत्रण आणि सन्मान झालाच पाहिजे होता. ते शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा सन्मान हा शिवसैनिकांचा सन्मान असतो. त्यांना डावलून तुम्ही बाबरी घटनेत आहुती दिलेल्या आणि जिगरबाजपणे आघाडीवर गेलेल्या प्रत्येक शिवसैनिकांचा अपमान केला. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात हे घडावे हे दुर्दैवी आहे. मंदिराचा कळस चढेपर्यंत तरी संबंधितांना प्रभू रामाची खरी ओळख होऊन सुबुद्धी येऊ दे.