Wednesday, 18 March 2020

सामान्यांच्या ठेवी बुडाल्या तेव्हा रिझर्व्ह बँक कुठे होती?


‘येस’ बँक ही श्रीमंतांची बँक आहे आणि श्रीमंतांनीच बुडविलेली बँक आहे. ज्यांना कोट्यवधी बुडले आणि बुडविले तरी आत्महत्या करावीशी वाटत नाही आणि तोंड लपवून फिरण्याचीही वेळ येत नाही अशा धेंडांनी ही बँक बुडविली. तरीही रिझर्व्ह बँकेने ही बँक वाचवायला कमालीची धावाधाव केली. सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी छाती फुगवून सांगितले की, रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने वेगाने काम करून रेकॉर्ड वेळेत येस बँक जीवित केली आहे. आमचा सवाल आहे की, ज्या बँकांमध्ये सामान्य माणसांची खाती होती अशा रूपी बँक, पेण अर्बन बँक, पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँक, पतसंस्था सहकारी बँका मोडीत गेल्या तेव्हा रिझर्व्ह बँक आणि सरकारने या आर्थिक संस्था वाचविण्यासाठी वेगाने पावले का उचलली नाहीत? स्टेट बँक एक आठवड्यात येस बँकेत 700 कोटी रुपये टाकून कर्जबुडव्यांचा तोटा भरू शकते तर ही सरकारी स्टेट बँक सामान्यांच्या ठेवी वाचविण्यासाठी छोट्या बँकांना आधार का देत नाही? सर्व मदत ही कायम श्रीमंतांनाच का मिळते? उद्योगपती आणि कारखानदारांसाठीच सरकारी यंत्रणा धावाधाव कशी करते?
‘येस’ बँकेचे सीईओ राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या उद्योगात कोट्यवधी पैसे गुंतवणुकीची लाच भरत दहा मोठ्या उद्योगसमुहांनी मिळून 30 हजार कोंटीची कर्ज घेऊन ती बुडविली. हे सर्व घडत असताना रिझर्व्ह बँकेने दुर्लक्ष करून कर्जबुडव्यांना मदत केली आणि कर्ज बुडवून झाल्यावर सरकारी स्टेट बँकेला 49 टक्के गुंतवणूक करून ही बँक वाचवायला लावली. सरकारी स्टेट बँक एका खासगी बँकेला जिवंत करण्यासाठी इतकी लगबग करते हे अनाकलनीय आहे. आताही पुनर्जीवित झालेल्या येस बँकेत स्टेट बँकेची 49 टक्केच गुंतवणूक आहे म्हणजे तितकाच अधिकार आहे. उर्वरित गुंतवणूक पुन्हा खासगी बँकांची आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा घोटाळा होऊच शकतो. तेव्हाही या धनिकांना वाचवायला सरकार धावेलच.
येस बँकेचे 12 हजार 808 कोटी रुपये अनिल अंबानीच्या दहा कंपन्यांनी बुडविले. म्हणजे अनिल अंबानी त्याच्या एकेका कंपनीच्या नावे कर्ज काढत गेला आणि बुडवत गेला. त्यानंतर सुभाष चंद्रा यांच्या एस्सेल समूहाने 8415 कोटी
बुडविले. इथेही एस्सेल समुहाच्या अंतर्गत 16 कंपन्या कर्ज काढत राहिल्या, बँक त्यांना कर्ज देत गेली आणि त्यांनी कर्ज बुडविले. दिवाण हौसिंग (डीएचएफएल), आयएल ॲण्ड एफएस, इंडिया बुल्स, खैतान कॉक्स ॲण्ड किंग्ज हे सर्व कर्जबुडवे आहेत. या कंपन्यांचेच सूटबुटातील उद्योगपती तोऱ्यात फिरत असतात. याच उद्योगपतींच्या यशोगाथा आपल्या कानीकपाळी मारल्या जातात. मोठमोठ्या समारंभात अर्थमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके दिली जातात. या धनदांडग्यांनी कर्ज बुडविली तर धंदा बसला हे कारण सांगतात, आर्थिक मंदीचे कारण सांगतात. तो उद्योगपती चांगला आहे, पण धंदा बसला म्हणून कर्ज बुडले असे गोंजारणे सुरू असते. प्रत्यक्षात बँक अधिकाऱ्यांना लाच देऊन आवश्‍यक तितके तारण न घेता बुडविण्यासाठी घेतलेली ही कर्ज आहेत. इथे देणारा लुटारू आहे आणि घेणाराही लुटारू आहे. अशा लुटारूंना मोठे का मानायचे? सरकार आणि रिझर्व्ह बँकेने त्यांच्यासाठी का धावायचे? अशा बँकांना मरू का देत नाहीत? स्टेट बँक त्यात पैसे का ओतते?
शेतकरी हवामानामुळे खरोखर कोसळतो तेव्हा कर्जफेडीसाठी बँका इतक्या मागे लागतात की बिचारा शेवटी झाडाला गळफास घेऊन यातून मुक्त होतो. एखाद्या होतकरू तरुण/तरुणीचा धंदा चालत नाही तेव्हा काही लाखांच्या कर्जासाठी त्यांचे घर जप्त करून त्याचा लिलाव होतो, मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आई-बाप कर्ज काढतात आणि मग मुलाला नोकरी मिळाली नाही तर बाप दिवसभर ओव्हरटाईम करूनकरून खंगून जातो. या बिचाऱ्यांना कधीच कर्ज बुडवायचे नसते, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांचे कर्ज थकीत राहते. त्यांना बँका कधी सोडतच नाहीत. त्यांच्या घराबाहेर थाळीनाद करतात, त्यांची नांवे जाहीर करतात, त्यांच्या घरी एजंट पाठवतात, त्यांना धमकीचे फोन केले जातात. कर्जाचा एक हप्ता भरला नाही की त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आयुष्याची वाट लावतात आणि हे येस बँकेचे कर्जबुडवे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. एकालाही अटक झालेली नाही. एकाच्याही महालाबाहेर थाळीनाद झालेला नाही. समाजात वावरायला त्यांना लाज वाटेल असे सरकारने काही केले नाही आणि रिझर्व्ह बँकेनेही काही केले नाही. हे कर्जबुडवे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या कर्जाचे सर्व पैसे पचवून मजेत राहणार आहेत. लोकल खाली जीव देतो तो सामान्य माणूस, झाडाला लटकतो तो सामान्य माणूस, तणावाने हृद्यविकाराचा झटका येऊन मरतो तो सामान्य माणूस, तो साधासरळ असतो. त्याला कर्ज फेडायचे असते म्हणून तो जीवाला घोर लावून घेतो. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर अशांसाठी धावाधाव करीत नाही. सामान्यांनी आयुष्याची कमाई एखाद्या छोट्या बँकेत ठेवली आणि ती बँक बुडाली तर सरकार ती बँक वाचवायला जात नाही.
‘येस’ बँकेचा हा जो तमाशा सुरू आहे तो असाच वेगवेगळ्या रूपात सुरू राहणार आहे. कारण सिस्टिमच भ्रष्टाचाराने पोखरली आहे वरपासून खालपर्यंत. मग आपणही या श्रीमंत कर्जबुडव्यांसारखे बनायचे का? तर नाही. कारण हे कर्जबुडवे काळ्या धनाचे गुलाम आहेत. आपण नाही. आपण देवापुढे रोज मनोमन हात जोडतो, सद्बुद्धी मागतो. देवापुढे उभे राहण्याची ताकद आपल्या चांगल्या कर्मांमुळेच मिळते. ही ताकद आपण गमवायची नाही. त्या कर्जबुडव्यांना सरकार तारेल, रिझर्व्ह बँक तारेल, स्टेट बँक तारेल, पण खात्री ठेवा की, देवाची लाठी आवाज न करता त्यांच्यावर बरसणार आहे. आज ना उद्या त्याचे दृश्‍य परिणाम आपल्याला दिसतीलच.कुटुंबच काय, देश सोडणेही धोक्याचे आहे.

Wednesday, 11 March 2020

सोनियाजी आणि राहुल गांधी, पक्ष चालवायचा नाही तर खुर्ची सोडा!


मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्‍चित आहे. मोदी विरोधी राज्याराज्यात लाट निर्माण होत असताना मध्यप्रदेशसारखे राज्य काँगे्रसच्या हातून निसटणे ही चांगली बाब नाही. त्यातही कमलनाथ सरकार स्वतःच्या नाकर्तेपणामुळे पडणार नाही तर काँगे्रसच्या शीर्षस्थानी असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेमुळे अडचणीत आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पक्ष चालवायचा नसेल तर त्यांनी ताबडतोब पक्ष आणि पदे सोडावी. या दोन नेत्यांमुळे आज पक्षाला अध्यक्ष नाही अशी वेळ आली आहे. हे दोन्ही नेते पक्षातील वितंडवादावर मात करू शकत नसतील तर केवळ खुर्ची उबवीत राहण्यापेक्षा पक्षाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या जाण्याने कदाचित नवे नेतृत्त्व उदयाला येईल.
आज मोदी सरकारला कंटाळलेले अनेक आहेत. राज्याराज्यांत मोदींविरुद्ध वातावरण आहे. पण पंतप्रधान बनू शकेल असे पर्यायी नेतृत्व दिसत नसल्याने भाजपाला पर्याय नाही ही स्थिती आहे आणि दुर्दैव असे की हीच स्थिती कायम राहत आहे. राजकारणाच्या चिखलात बुडालेल्या इंदिरा गांधी हत्तीवर आरूढ झाल्या आणि त्यांचे हे रूप पाहून जनतेने त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्यातही ही धमक नाही. जनतेला आणि पक्षाला कणखर नेतृत्त्वाची गरज आहे. राहुल गांधींनी लोकसभा प्रचारावेळी हा कणखरपणा दाखविला होता. त्यामुळे भाजपाची खासदार संख्या कमी झाली. त्यानंतर मात्र ते मैदान सोडून पसार झाले. आता त्यांचे अस्तित्व फक्त ट्विटरवर आहे. त्यांच्या अवतीभवतीची काँगे्रसची नखं काढली जात आहेत, पण त्याचे भान सोनियाजींना नाही आणि राहुल गांधींना नाही. ठिणगी पडताच विझवली नाही तर वणवा पेटतो आणि सर्व राख करतो हे शेंबड्या पोरालाही कळते, पण या दोन नेत्यांना पक्षाची फिकीर नाही, आपल्या जबाबदारीची जाणीव नाही आणि खुर्ची सोडण्याइतकी त्यागाची भावनाही नाही. आज केवळ या दोन नेत्यांच्या नाकर्तेपणाने ज्योतिरादित्य शिंदेसारखा उमदा नेता काँगे्रस सोडून गेला.
जे चित्र मध्यप्रदेशात आहे तेच राजस्थानात आहे. (गेहलोत विरुद्ध सचिन पायलट). तेच चित्र अगदी मुंबई काँगे्रसमध्येही आहे. मुंबईत सर्वच काँगे्रस नेते एकमेकांविरोधात उघडपणे बोलतात. इतके सर्व घडत असताना दिल्लीश्‍वर निपचित पडून आहेत. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा विरोधात लाट निर्माण केली. त्या राज्यात राजघराण्याला खूप सन्मान आहे. राजघराण्यातील ज्योतिरादित्य शिंदे दौरे करतात, गरिबाच्या घरी जातात, अफलातून भाषणे करतात, हसून सर्वांशी प्रेमाने बोलतात अशी त्यांची छबी निर्माण झाली होती. या छबीवर भाजपातील सरपंचापासून वरिष्ठ नेते प्रेमात पडले होते. त्यामुळे काँगे्रस जिंकणार असे सर्वजण आधीच सांगत होते. त्याप्रमाणे काँगे्रसचा विजय झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होतील अशीही सर्वांना खात्री होती. पण जनभावना लक्षात न घेता काँगे्रसने पैसा पाहिला आणि अतिश्रीमंत कमलनाथना मुख्यमंत्री केले. हे घडले तेव्हाच ठिणगी पडली. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी ही ठिणगी विझवलीच नाही. दोघांना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची धमकही दाखविली नाही. याआधी दोनदा मुख्यमंत्री बनलेले कमलनाथ स्वतः वयाचा विचार करून बाजूला झाले असते तरी चालले असते. पण तेही घडले नाही. ज्योतिरादित्य यांना निदान प्रदेशाध्यक्ष करा अशी सतत मागणी होत होती. त्यावरही दिल्लीने निर्णय दिला नाही. आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपात गेले ही भाजपाची पुण्याई नाही तर काँगे्रसचे पाप आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी एक उत्तम नेता गमावला. इतकेच नव्हे तर ज्योतिरादित्य शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे हे तातडीने जाहीर करण्यात काँग्रेसने रस दाखविला. यानंतर राजस्थानात गेहलोतना कंटाळून सचिन पायलटसारखे नेतृत्व भाजपाकडे वळले तर आश्‍चर्य वाटायला नको.
पंतप्रधान मोदी सत्यच म्हणाले की, जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजपाला अच्छे दिन आहेत. जनता मात्र कात्रीत अडकली आहे. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी यातून सुटकेचा मार्गच दिसत नाही. राहुल गांधी यांनी आज लियो टॉलस्टॉय या महान लेखकाचे एक वाक्य ट्विट केले आहे. ‘सर्वात मोठे योद्धे दोन आहेत - संयम आणि काळ!’ राहुल गांधींना एकच सांगायचे आहे की, संयम आणि काळ या दोन योद्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्त्व उभे असावे लागते. नुसताच संयम ठेवला तर मराठीतील म्हणीप्रमाणे काळ सोकावतो. आज काळ सोकावलाय तरीही राहुल गांधी ट्विट करीत बसलेत. दुर्दैव!

Sunday, 1 March 2020

धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण मान्य तर धर्माच्या आधारे नागरिकत्वही स्वीकारा


महाराष्ट्रात मुस्लीम धर्मियांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला जाईल अथवा तसा कायदा केला जाईल, असे अल्पसंख्यांक मंत्री राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अधिवेशनात जाहीर केले. भारताच्या घटनेनुसार या देशात धर्म हा घरापुरता व्यक्तिगत श्रद्धेचा विषय असावा, असे स्पष्ट संकेत आहेत. तरीही धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर ‘धर्मनिरपेक्ष भारत’ हा देशाचा पायाच डळमळीत होईल आणि हे सर्वच देशवासियांसाठी जितके धोक्याचे आहे तितकेच मुस्लिमांसाठीही आहे. कारण जर धर्माचा आधार स्वीकारला तर तो सर्वच बाबतीत लागू होईल. शिक्षणात धर्माच्या आधारे जर आरक्षण स्वीकारणार असाल तर मुस्लिमांना नागरिकत्व कायद्यात (सीएए) केलेली धर्माबाबतची सुधारणाही मान्य करावी लागेल.
सीएए कायद्यात परराष्ट्रातील पीडित मुस्लिमांना भारतात आश्रय न देण्याचा एकतर्फी, अन्यायी, भेदाभेद करणारा निर्णय घेतल्याचे म्हणत दिल्लीत शाहीनबागपासून मुंबईत नागपाडापर्यंत आंदोलने सुरू आहेत. ही सर्व आंदोलने बंद करावी लागतील. कारण जर धर्माच्या आधारावर मुस्लीम समाज आरक्षणाचा फायदा घेणार असेल तर याचा अर्थ असा की, या धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारावर निर्णय घेण्यास मुस्लिमांनी परवानगी दिली आहे. अशी परवानगी एकदा दिली की, ती सर्वकाळ आणि सर्वक्षेत्रात लागू होणार आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने आरक्षण घेणार असाल तर धर्माच्या नावाने नागरिकत्व ही संकल्पनाही स्वीकारावी लागेल. पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र आणि भारत हे हिंदू राष्ट्र बनूनच याचा शेवट होईल. भारतासाठी आणि भारतातील मुस्लीम बांधवांसाठी ही अधोगतीकडे जाणारी वाटचाल आहे. धर्माच्या नावाने आणि धर्माच्या बंधनात राहून निर्णय घेणारी राष्ट्रे प्रगती करीत नाहीत. याला इतिहास साक्ष आहे. राष्ट्राचे निर्णय हे विज्ञान आणि अर्थकारणावरच असायला हवे आणि राष्ट्राचे नागरिक म्हणून जगताना सहजीवन, संयम आणि समर्पणाचा मार्ग आपापल्या श्रद्धेनुसार असायला हवा ज्याला आपण धर्म म्हणतो. या दोन्हीत गफलत केली तर अधोगती निश्‍चित आहे. नेपाळसारख्या पारंपरिक हिंदू राष्ट्रानेही लोकशाही स्वीकारली. त्या छोट्या देशाचा अनुभव प्रदीर्घ आहे. ‘नेपाळ’चा अभ्यास न करता आपण ‘पाकिस्तान’च्या मार्गाने जाणार असू तर त्याहून मोठे दुर्दैव नाही. या देशात जोपर्यंत धर्माच्या नावाने निर्णय होत नाहीत तोपर्यंत या देशातील अल्पसंख्य धर्मिय सुखरुप आहेत. मुस्लीम, ख्रिश्‍चन, पारशी, शीख या सर्वांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. एकदा धर्माचा आधार मान्य करून निर्णय घेतला की, धर्मनिरपेक्ष भारतात राहण्याचे संरक्षण कायमचे हटेल आणि धर्माच्या आधारे भविष्यात जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील.
मुस्लिमांना शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आतूर आहे. कारण सर्व ओबीसी मतांवर या पक्षाने लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार सांभाळताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय सर्वप्रथम घेऊन इंदू मिलला भेट दिली तेव्हाच राष्ट्रवादीची पुढील दिशा स्पष्ट झाली. काँग्रेस पक्षाला तर वंचित आघाडी आणि एमआयएम, समाजवादी पक्षाकडे गेलेली मुस्लीम मते स्वतःकडे खेचण्याची ही सुवर्णसंधी दिसते आहे. राजकीय पक्ष त्यांचे राजकारण करीत असतात. पण मुस्लीम बांधवांनी विचार करायला हवा. धर्माच्या नावावर निर्णय होऊ लागले आणि त्याचा स्वीकार केलात की, मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष भारताचे संरक्षण गेले. मग हिंदू धर्माचा भगवा आणि हिंदुराष्ट्र या दोन्हीचा मार्ग सुकर होतो. त्यातून जे घडेल ते पाहत बसण्यावाचून मुस्लीम बांधवांच्या हाती काहीच राहणार नाही. शिक्षणात आरक्षण हे आर्थिक दुर्बलांसाठी असू शकते. त्यात आर्थिक दुर्बल मुस्लीम बांधवांच्या मुलांना निश्‍चित फायदा होईल. त्यामुळे आर्थिक निकषांवरील आरक्षणाची मागणी करणे हाच सुज्ञपणा ठरेल.

Thursday, 23 January 2020

साईबाबांच्या या मूठभर वारसदारांना’ आता गप्प करा

श्री साईबाबांचे जन्मस्थळ, प्रकटस्थळ, कर्मस्थळ असे जे वाद सुरू आहेत, त्यामुळे खरा साईभक्त दुखावला गेला आहे. हे वाद ऐकून श्री साईबाबा जिथे असतील तिथे नक्कीच दुःखी होऊन अश्रू ढाळत असतील. संपूर्ण आयुष्य आचरणातून, वाणीतून समाजाला जो संदेश दिला तो संदेशच विस्मरणात गेला आहे, हे पाहून साईंना काय वाटले असेल? श्रद्धा, सबुरी, वैराग्य आणि सेवा ही साईंची शिकवण विसरून मूठभरांनी वादंग निर्माण केला आहे. या मूठभरांना चूप करून त्यांच्या पायरीवर त्यांना आणण्याचे काम आता साईभक्तांनी करणे आवश्यक आहे. साईबाबांवर 100कोटींची बोली लावणार्‍यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. श्री साईबाबांच्या विचारांची आणखी अवहेलना होऊ न देता महाराष्ट्रातील साईभक्तांनी एकत्र येऊन हा ‘वारसाहक्काचा’ तमाशा ताबडतोब थांबवावा. हे आताच केले नाही तर हा वादंग वाढत जाईल आणि या झुंडशाहीत श्री साईबाबा आपल्या अंतःकरणातून कायमचे हरपून जातील.
श्री साईबाबांनी शिर्डीला समाधी घेतली, म्हणून शिर्डीला लाखो भक्त येतात. हा इतिहास इथेच थांबला पाहिजे. कारण समाधीचे सत्य आपल्यासमोर आहे. पण श्री साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी कोण होते, कुठे होते हे स्वतःच साईबाबांनी कधी सांगितले नाही आणि ते सांगण्यास तयारही नव्हते. ‘सबका मालिक एक’ म्हटल्यावर हे प्रश्‍नच उपस्थित होत नाहीत. नदीचे मूळ आणि संताचे कूळ विचारू नये ही म्हण आहे. याचे कारण संताच्या कुळापेक्षा त्यांचा संदेश महत्त्वाचा आहे असे मानले गेले आहे. असे असूनही पाथरीकरांनी दावा केला आहे की, श्री साईबाबांचा जन्म पाथरीत झाला. मग पैठण जिल्ह्यातील धूपखेडा गावकर्‍यांनी म्हटले की, साई प्रथम धूपखेड्यात प्रकटले म्हणून ही त्यांची प्रकटभूमी आहे. तिसर्‍या दिवशी बीडच्या काहींनी सांगितले की, साई बीडमध्ये नोकरी करीत होते. त्यामुळे ही त्यांची कर्मभूमी घोषित करून विकासासाठी 100 कोटी द्या. इतके अगाध संशोधन झाल्यावर श्री साईबाबा हे हिंदू होते की मुसलमान आणि हिंदू असतील तर ब्राह्मण होते का याचेही दावे सुरू होतील आणि यावरही न संपणारा वाद सुरू होईल. त्यामुळेच हे थांबले पाहिजे. सरकारला मतांची चिंता असते. त्यामुळे सरकार यात पडणार नाही. विरोधकांना नेमकी कुणाची बाजू घ्यायची हे कळत नसल्याने ते गप्प आहेत. पण आणखी काळ गप्प राहिले तर हा वाद नको त्या वळणावर जाईल आणि ‘सबका मालिक एक’ म्हणणारे श्री साई यांची अक्षरशः वाटणी करतील.
हा सर्व प्रकार मुळात शिर्डीचे वाढलेले महत्त्व आणि 100 कोटी व मान्यतेतून भविष्यात येऊ शकणार्‍या आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनातून निर्माण होऊन वाढत चालला आहे. पाथरीकरांना जर पाथरी हे जन्मगाव वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या आर्थिक नियोजनातून त्याचा प्रचार व प्रसार करावा. पाथरीला आजही अनेक भक्‍त येतात. पण त्यांची संख्या शिर्डीच्या तुलनेने कमी आहे. ही संख्या वाढून भक्‍तांनी पाथरीला यावे, असे वाटत असेल तर पाथरी हे जन्मगाव आहे, असे सरकारने शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. सरकारने पाथरीकरांना 100 कोटींचा निधी दिला आहे, त्यांतून पाथरी हे जन्मगाव आहे, हे जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचवता येईल. त्यासाठी वाद कशाला घालायचा? पाथरीकरांना अधिकृत घोषणा हवी असेल तर संशोधनासाठी समिती नेमावी लागेल. या समितीने पाथरीकरांच्या बाजूने निर्णय दिला तरी खुद्द श्री साईबाबांच्या इच्छेचे काय? त्यांना आपला जन्म, कुटुंब आणि धर्म याबद्दल कधीच काही सांगायचे नव्हते.
श्री साईबाबा हे देवाचे सगुण रूप होते. पण ते खरे तर निर्गुण, निराकार होते. ते सांगायचे की, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेला असेल तर भाकर द्या, नंग्याला कापड द्या, निराधाराला घराच्या ओसरीत आश्रय द्या. ते मानवधर्म शिकवीत राहिले. मुसलमान आला तर ते कुराण वाचायला सांगायचे आणि हिंदू आला तर गीता वाचायला सांगायचे. अनेकांनी त्यांच्याकडे आग्रह केला की, तुमचा वारस घोषित करा, पण त्यांनी कधी कुणाला दीक्षाही दिली नाही. वारस नाही आणि आश्रमही नाही. ते आयुष्यभर वैरागी राहिले. तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम असे कुणी विचारले तर ते म्हणायचे की, तू माझ्यासह इतका काळ राहिलास, पण अजूनही साई म्हणजे हे शरीर असेच तुला वाटते.
सत्य हे आहे की, श्री साईबाबांची शिकवण आपल्या जीवनात अंगिकृत करण्यास आपण कमी पडतो. म्हणूनच मग आपली भक्‍ती सिद्ध करण्यासाठी आपण भौतिक दावे करीत राहतो. जन्मस्थळ, समाधीस्थळ, कर्मस्थळ, पदयात्रा, नववर्षाला दर्शन, काकडआरती, दान, सोन्याचा मुकुट हे सर्व त्या वैराग्याने कधीच त्याग करीत ‘सबका मालिक एक’ म्हटले आणि आपण श्री साईबाबांनी त्याग केलेल्या गोष्टीतच रममाण होऊन स्वतःला भक्‍त म्हणून घेत आहोत. श्री साईबाबांना खरोखर याचे दुःख होत असेल.

Friday, 27 December 2019

देव झाकणारा देश...


आज भारतातून सूर्यग्रहण पाहण्याचा अभूतपूर्व असा वैज्ञानिक योग आला. अनेकांनी या संधीचा फायदा घेतला, पण दुर्दैवाने बहुसंख्य भारतीय अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू शकले नाहीत. सकाळी सूर्यग्रहणाच्या काळात एखादा परदेशी पाहुणा पत्रकार भारतात असता तर त्याने वैज्ञानिकरीत्या सूर्यग्रहण पाहणार्‍या एक टक्का डोळस भारतीयांवर लिहिले असते की, अंधश्रद्धा पाळणार्‍या बहुसंख्य भारतीयांबद्दल लिहिताना ‘देव झाकणारा देश...’ असे शीर्षक दिले असते, असा प्रश्‍न निर्माण झाला.
माणूस हा मुळात घाबरट, चंचल मनाचा, अस्थिर प्राणी आहे. त्यामुळे त्याने सर्व विश्‍व व्यापून टाकणार्‍या दैवी शक्तीच्या मूर्त स्वरुपाची निर्मिती केली आणि आपल्या आयुष्यातील सर्व बर्‍यावाईट घटना या त्या दैवी शक्तीमुळे घडतात, असे सांगून नामानिराळा झाला. आश्‍चर्य म्हणजे या चराचर व्यापून टाकणार्‍या दैवीशक्तीवरही माणसाने अमावास्या आणि ग्रहणाच्या काळात अविश्‍वास व्यक्त केला. या दैवीशक्तीची शक्ती अपार आहे हेही मान्य करण्यास माणूस तयार नाही. म्हणूनच ग्रह-तारे फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर त्याचा दैवीशक्तींवरही वाईट परिणाम होईल, असे मानून भारतीयांनी अमावास्या आणि ग्रहण आहे, असे सांगत मंदिराची कवाडेच बंद केली. देवांनाच झाकून टाकले. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना ज्याच्या इशार्‍यावर चालतात असे मानले जाते, त्या देवाला अमावास्या आणि ग्रहणापासून धोका निर्माण होतो? मग तो देव कसला आणि त्याची शक्ती कसली? देवाला सूतक लागू शकते का? जो आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवेल असे आपण मानतो तोच संकटात सापडू शकतो का? ग्रहणाच्या वेळी सूतक लागते म्हणून देव झाकून ठेवायचे आणि देवाचे दर्शन घ्यायचे नाही याचाच अर्थ आपण देवाची अपरंपार शक्ती मान्य करीत नाही. त्याच्या शक्तीबद्दल शंका घेतो आणि आपणच जर त्या शक्तीचे महात्म्य मानत नसलो तर मग आपण नेमके आस्तिक आहोत की नास्तिक आहोत?
देवाला झाकून ठेवता, गाभारे अंधारात ठेवता, मंदिराची दारे बंद करता, देवाला सूतक लागले म्हणता आणि त्याऊपर स्वतःला त्याचे भक्त म्हणवता? हा जगातील सर्वात उच्च पातळीचा विरोधाभास आहे. मंगळावर यान सोडताना शुभशकुन म्हणून आपण श्रीफळ वाढवितो त्याचाच हा पुढचा प्रकार आहे. त्याहून पुढची हद्द म्हणजे बीसीसीआयनी ट्विट करून रणजी सामने ग्रहणामुळे पुढे ढकलल्याचे जाहीर केले. श्रद्धा, सबुरी आणि विज्ञानाच्या मार्गावर पुढे जायचे आहे की अंधश्रद्धा आणि अशांततेच्या विळख्यात अडकून खितपत पडायचे आहे हे कधीतरी ठरविले पाहिजे.
ग्रहणावेळी इन्फ्रारेड व अल्ट्राव्हायोलेट किरणे प्रखरपणे बाहेर पडतात हे धांदात खोटे आहे, असे दा.कृ.सोमण म्हणतात. ते सांगतात की, सूर्यापुढे चंद्र येण्याला ग्रहण म्हणतात. त्यावेळी सूर्यात काहीच बदल होत नाही. त्याच्या किरणात काहीच बदल होत नाही. त्यामुळे एरवी दुपारच्या उन्हात चालून त्रास होतो, तितकाच त्रास होऊ शकतो. गर्भार महिलांवर काहीही दुष्परिणाम होत नाही, जेवल्याने, अन्न शिजवल्याने कोणताही अपाय होत नाही. आपण ग्रहणात फक्त सूर्याकडे बघताना काळजी घेतो. याचे कारण एरवी सूर्याच्या प्रखरतेमुळे आपण सूर्याकडे थेट बघत नाही. पण ग्रहणावेळी सूर्यावर सावली पडल्याने सूर्याकडे पाहणे सुसहय्य होते. परिणामी सूर्याकडे पाहत राहतात आणि मग डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम होऊ नये इतकीच काळजी ग्रहणात घ्यायची असते. पण आज भारतातल्या अनेक भागात अन्न शिजले नाही, सकाळचे नाश्त्याचे स्टॉल लागले नाहीत, रस्त्यावर नेहमीची गर्दी दिसली नाही. तीन चतुर्थांश भारत जणू ग्रहण संपेपर्यंत स्तब्ध झाला होता. शौचासही जायचे नाही असे मानणारे अनेक आहेत. पाणी प्यायचे नसते असेही सांगतात. म्हणजे आजारीच पडायचे आणि ग्रहणाच्या अशुभ काळामुळे आजारी पडलो असे सांगत फिरायचे. गंमत अशी आहे की, हे सर्व अंधश्रद्धेचे नियम घालणारे कोणतेही आजारपण स्वतःच्या माथी मारून घ्यायला तयार नाहीत. म्हणून हे नियम सांगणारे असेही सांगतात की, ग्रहणातील सुतकात असलेले निर्बंध हे वृद्ध, बालके, रुग्ण, गर्भार महिला यांना लागू नाहीत.
हिंदू धर्म हा बदलत्या काळानुसार नवनवीन संकल्पना स्वीकारणारा धर्म आहे आणि म्हणूनच सतत आक्रमणे होऊनही या धर्माचा पाया कधीही दुभंगला नाही. आपण हा धर्म मानत असू तर त्यातील त्रासदायक ठरणार्‍या अंधश्रद्धा उखडून फेकल्या पाहिजेत. आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन आहे. ग्रहणातील सूर्याच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन आहे. त्यात राहूने सूर्य खाल्ला आणि मग सूर्य त्याच्या तोंडातून सुटला असे म्हटले आहे. तेव्हा वैज्ञानिक ज्ञान कमी होते म्हणून हा युक्तिवाद झाला, पण आता ग्रह-तार्‍यांचे इतके ज्ञान वाढल्यावरही तोच पूर्वीचा युक्तिवाद ग्राह्य मानायचा का? उलट आपण अभिमानाने म्हटले पाहिजे की, आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन केले आहे इतका प्राचीन आपला अभ्यास आहे. इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट यांनी ग्रहणाचा अभ्यास करून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण दिसते हे लिहून ठेवले आहे. अशा या महान आर्यभट्टाच्या कुळात आपण जन्माला आलो आहोत. त्यांचा अभ्यास पुढे न्यायचा की ग्रहणात देव झाकायचे? हा प्रश्‍न प्रत्येकाने विचारला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक सुताचा फरक असतो. या सुतावरून भविष्याचा मार्ग ठरतो.

Monday, 23 December 2019

देवेंद्रजी, जरा धीर धरा...


महाराष्ट्रात 2014 पूर्वीचा भाजपा आणि नंतरचा भाजपा हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. 2014 पूर्वी विरोधी पक्षाच्या बाकावरून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस बोलायचे तेव्हा त्यांच्या प्रत्येक मुद्यावर विश्‍वास वाटायचा. देवेंद्र फडणवीस संपूर्ण माहिती घेऊन बोलतात अशी त्यांची प्रतिमा होती. पण 2014 साली कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची यासाठी घोडदौड सुरू झाली आणि भाजपाने कमाविलेला विश्‍वास घरंगळत रसातळाला गेला. गाडीभर पुराव्यांची रद्दी झाली आणि या रद्दीच्या गठ्ठ्यावर बसून फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मुखवटेही टराटरा फाटले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस या कोणत्याच पक्षावर जनतेचा काडीचा विश्‍वास राहिलेला नाही. इथे शब्दही प्रमाण नसतो आणि कृतीही शाश्‍वत नाही हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता थोडा धीर धरला पाहिजे. त्यांनी सत्तेत असताना सर्व पक्षातील विरोधकांचा असा नायनाट केला की भलेभले थक्क झाले. पण त्यांचे शेवटचे फासे चुकीचे पडले. त्यामुळे त्यांची पुन्हा येईनची सत्ता स्वप्न तर बुडालीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची जनमानसातील व्यक्तिगत प्रतिमा डागाळली. देवेंद्र फडणवीस सत्य बोलतात असे जनमनात होते त्याला तडा गेला आहे. ती विश्‍वासार्हता परत मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आता संयम राखला पाहिजे. नाही तर रोज उठून सरकारविरुद्ध बोलणारा बडबड नेता अशी त्यांची प्रतिमा होईल आणि ही प्रतिमा झाली तर मग कितीही व्हिडिओ टाका, ट्विट करा नाही तर पोस्ट करा लोक बडबडीकडे  दुर्लक्ष करतील.
हा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना देण्याचे कारण  म्हणजे भाजपाची संपूर्ण आस या व्यक्तिमत्त्वावर आधारली आहे. अजून महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे देवेंद्र जे बोलतील आणि जसे वागतील त्याचा थेट परिणाम भाजपाच्या भवितव्यावर होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे वर्तन पक्षासाठी घातक आहे. शिवसेनेने घेतलेली फारकत आणि अजित पवारांसह सत्ता स्थापनेचा फसलेला डाव या दोन्ही आघातांच्या वेदना देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक शब्दांतून घळाघळा वाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांत ठेच खाल्लेल्या सद्गृहस्थाची अगतिकता आणि त्यातून निर्माण होणारा आक्रस्ताळेपणा दिसतो आहे. देवेंद्र फडणवीसांचे वागणे व्यक्ती म्हणून अपेक्षित असेच आहे. पण ते सर्वसाधारण व्यक्ती नव्हेत तर एका पक्षाचे नेतृत्त्व करीत आहेत. कदाचित त्यांचे हे पदही धोक्यात आले असावे. त्यातून आलेल्या अस्थिरतेत त्यांची मानसिकता बदलली असावी. पण आपले वागणे पक्षाला घातक ठरू शकते हे त्यांनी वेळीच ओळखले नाही तर त्यांचे पक्षातील स्थान आणि सन्मान काही काळात संपेल हेही शंभर टक्के सत्य आहे.
नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचे वागणे हे अत्यंत बालिश होते आणि त्यांच्या मागे भाजपाला फरफटत जावे लागले. नवे सरकार सत्तेवर येऊन दोन आठवडेही झालेले नसताना फडणवीस कर्जमाफीची मागणी करताना दिसले. सर्वात दुर्दैवाचा क्षण म्हणजे अधिवेशनावेळी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाचे बॅनर भाजपाने फडकविले आणि त्या दैनिकात जे प्रसिद्ध झाले त्यावरून रणकंदन माजविले. एका दैनिकाचा दाखला देऊन सरकारला जाब विचारणे हा आततायी निर्णय फडणवीसांनी का घेतला? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने अधिवेशनात तीन दिवस केला. हा विषय अधिवेशनात का आणला? दरवर्षी होणाऱ्या आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस उपस्थित राहिले नाही, धान उत्पादकांना सरकारने 200 रुपये वाढवून दिले तर फडणवीस म्हणतात की अवकाळीने धान उत्पादन झालेले नसल्याने धान विकत घ्यायचीच नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्यांना यापूर्वीच हेक्टरी आठ हजार रुपये राज्यपालांनी जाहीर केल्यावरही अवकाळीग्रस्तांना मदत जाहीर केली नाही अशी देवेंद्र बोंब ठोकत होते. महाआघडीला ‘तिघाडी’ सरकार म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे वाजपेयींच्या 13 पक्षांच्या सरकारला काय म्हणत असतील? सत्ता स्थापन होऊन दोन आठवडेही झाले नाहीत अशा सरकारने  लगेच विदर्भासाठी योजना जाहीर होणे शक्य नाही हे जाणूनही त्यावर देवेंद्रजी टीका करीत होते.
आता सात-बारा कोरा केला नाही यावर भाजपाने मोर्चे काढावे असा त्यांचा आदेश आहे. सरकसकट सर्वांना दोन लाख दिले याचे स्वागत नाही. याचे कारण काय? तर शिवसेनेने 7/12 कोरा करणार असा शब्द दिला होता. पण या शब्दावर शिवसेनेला मते देण्याइतका महाराष्ट्राचा मतदार खुळा नाही. शिवसेना काही करील इतकीच अपेक्षा या शब्दामुळे निर्माण झाली होती. प्रचारावेळी दिलेल्या शब्दांचा खेळ करायचा तर देवेंद्रजींनी घसा खरवडून डोंबिवलीकरांना 6 हजार कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते, 2014 च्या भाजपाच्या वचननाम्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करू, 24 तास पाणी, वीज पुरवू, कुशल कामगारांचा सतत पुरवठा करू, कृषीपंपांना दर दिवशी किमान 10 तास वीजपुरवठा करू अशी बरीच आश्‍वासने होती जी हवेत विरली. प्रचारातील शब्द प्रचारापुरते असतात हे जनतेला माहीत आहे. जनता केवळ पक्षाची साधारण विचारसणी काय आहे याचा अंदाज घेऊन मतदान करते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांच्या मागे लागून आततायीपणा करीत पक्षाचे हंसे करू नये तर सध्याच्या सरकारवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर पुराव्यांसह अंकुश ठेवावा ही भाजपाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण न करता केवळ आवाज चढवून आदळआपट करीत राहिलात तर पक्षाचे नुकसान होईल आणि पक्षाचे नुकसान होऊ लागले तर मोदींची छत्रछाया जाईल. तेव्हा देवेंद्रजी जरा धीर धरायला शिका...

Sunday, 22 December 2019

व्रतस्थाचा सूर्यास्त


अखंड जीवन एखादा ध्यास घेऊन जगणार्‍या व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचा अंत कधी होऊ शकत नाही. केवळ सूर्यास्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनाने व्यापलेली एक संपूर्ण पिढी सूर्योदय बनून उगवते आणि आपल्या तेजाने जग व्यापून टाकते. माझे वडील नीलकंठ यशवंत खाडीलकर हे असेच व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. आज त्यांचे शरीर इहलोकातून परलोकात गेले, पण त्यांचे विचार, त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक शब्द हा मराठी माणसाच्या मनात धगधगता निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा असाच सदैव लढत राहील. अयोग्य ते भस्म करीत राहील आणि योग्य त्याला दिशा दाखवित राहील, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्लभ असतात, पण आमचे साताजन्माचे पुण्य म्हणून ते आम्हाला वडील म्हणून लाभले आणि लढवय्या मनात मराठी माणसांत अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रेमाच्या, आपुलकीच्या स्थानावर राहिले.
पत्रकारिता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलकंठ खाडीलकर होते. चार हजार खप असताना ‘नवाकाळ’चे दुधारी शस्त्र त्यांनी हाती घेतले आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा काटेरी मुकूट मस्तकावर पेलवत हे शस्त्र केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी वापरले. कधीही आयुष्यात त्यांनी एका शब्दानेही जनतेशी प्रतारणा केली नाही. ‘ताठ कणा आणि मराठी बाणा’ हे ‘नवाकाळ’चे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कणखरतेतून घडले. पत्रकारिता ही लेखनापुरती मर्यादित न ठेवता खिळे जुळवून पाने तयार करणे, मशीन चालविणे, पेपरच्या गठ्ठ्यावर बसून पार्सल बांधणे ते ‘नवाकाळ’चे आर्थिक नियोजन करणे हे त्यांनी एक हाती करून दाखविले. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रात अग्रलेख पहिल्या पानावर छापून त्याने जनतेच्या विचारांना दिशा देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यांचे आठ कॉलमचे धगधगते मथळे, सरकारचे डोके ताळ्यावर आणणारे अग्रलेख आणि कधीही न डगमगता, लाचार न होता, संकटांपुढे न झुकता जे चुकले त्यांच्यावर आसूड ओढायचे धाडस दाखविणारे ते एकमेव होते. राजकारणी त्यांचे शत्रू नव्हते, पण कधी मित्रही नव्हते. कारण आपण चुकलो तर मैत्री असूनही ‘भाऊ’ आपल्याला सोडणार नाहीत हे प्रत्येकाला माहीत होते. त्यांचे लेखन वाचून एक अख्खी पिढी प्रगल्भ झाली, एका पिढीला जगायची दिशा मिळाली, लढायचे धाडस मिळाले. म्हणूनच त्यांना जनतेने ‘अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब बहाल केला. यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही.


थरथरत्या हाताने खिशात मावतील अशी पुस्तके लिहिणे ही त्यांचीच कल्पना होती. त्या पुस्तकाचा प्रत्येक विषय हा जनतेला ज्ञानी करण्यासाठी होता. त्यात कधी ‘मी’ नव्हता आणि कधी ‘बात’ नव्हती. ते नेहमी म्हणायचे की, काहीही घडले तरी ‘द शो मस्ट गो ऑन!’ मला काही झाले तरी ‘नवाकाळ’चा अग्रलेख लिहिलाच गेला पाहिजे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अजोड पत्रकारिता हे मैलाचे दगड कधीच गाठता येणार नाही. पण त्यांच्या विचारांचे आणि लेखनाचे अमृत पिऊन आज माझ्या या सदैव अमर पित्याला आणि जनतेच्या अग्रलेखांच्या बादशहाला हा अग्रलेख लिहून मानाचा मुजरा करते. या सूर्याचा आज सूर्यास्त झाला, पण जनतेच्या मनातून, भावनेतून, विचारातून तो लाखो सूर्यकिरणे बनून रोज नित्यनियमाने व्रतस्थपणे आपले जीवन उजळत राहणार याची खात्री आहे.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...