Friday, 27 December 2019

देव झाकणारा देश...


आज भारतातून सूर्यग्रहण पाहण्याचा अभूतपूर्व असा वैज्ञानिक योग आला. अनेकांनी या संधीचा फायदा घेतला, पण दुर्दैवाने बहुसंख्य भारतीय अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू शकले नाहीत. सकाळी सूर्यग्रहणाच्या काळात एखादा परदेशी पाहुणा पत्रकार भारतात असता तर त्याने वैज्ञानिकरीत्या सूर्यग्रहण पाहणार्‍या एक टक्का डोळस भारतीयांवर लिहिले असते की, अंधश्रद्धा पाळणार्‍या बहुसंख्य भारतीयांबद्दल लिहिताना ‘देव झाकणारा देश...’ असे शीर्षक दिले असते, असा प्रश्‍न निर्माण झाला.
माणूस हा मुळात घाबरट, चंचल मनाचा, अस्थिर प्राणी आहे. त्यामुळे त्याने सर्व विश्‍व व्यापून टाकणार्‍या दैवी शक्तीच्या मूर्त स्वरुपाची निर्मिती केली आणि आपल्या आयुष्यातील सर्व बर्‍यावाईट घटना या त्या दैवी शक्तीमुळे घडतात, असे सांगून नामानिराळा झाला. आश्‍चर्य म्हणजे या चराचर व्यापून टाकणार्‍या दैवीशक्तीवरही माणसाने अमावास्या आणि ग्रहणाच्या काळात अविश्‍वास व्यक्त केला. या दैवीशक्तीची शक्ती अपार आहे हेही मान्य करण्यास माणूस तयार नाही. म्हणूनच ग्रह-तारे फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर त्याचा दैवीशक्तींवरही वाईट परिणाम होईल, असे मानून भारतीयांनी अमावास्या आणि ग्रहण आहे, असे सांगत मंदिराची कवाडेच बंद केली. देवांनाच झाकून टाकले. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना ज्याच्या इशार्‍यावर चालतात असे मानले जाते, त्या देवाला अमावास्या आणि ग्रहणापासून धोका निर्माण होतो? मग तो देव कसला आणि त्याची शक्ती कसली? देवाला सूतक लागू शकते का? जो आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवेल असे आपण मानतो तोच संकटात सापडू शकतो का? ग्रहणाच्या वेळी सूतक लागते म्हणून देव झाकून ठेवायचे आणि देवाचे दर्शन घ्यायचे नाही याचाच अर्थ आपण देवाची अपरंपार शक्ती मान्य करीत नाही. त्याच्या शक्तीबद्दल शंका घेतो आणि आपणच जर त्या शक्तीचे महात्म्य मानत नसलो तर मग आपण नेमके आस्तिक आहोत की नास्तिक आहोत?
देवाला झाकून ठेवता, गाभारे अंधारात ठेवता, मंदिराची दारे बंद करता, देवाला सूतक लागले म्हणता आणि त्याऊपर स्वतःला त्याचे भक्त म्हणवता? हा जगातील सर्वात उच्च पातळीचा विरोधाभास आहे. मंगळावर यान सोडताना शुभशकुन म्हणून आपण श्रीफळ वाढवितो त्याचाच हा पुढचा प्रकार आहे. त्याहून पुढची हद्द म्हणजे बीसीसीआयनी ट्विट करून रणजी सामने ग्रहणामुळे पुढे ढकलल्याचे जाहीर केले. श्रद्धा, सबुरी आणि विज्ञानाच्या मार्गावर पुढे जायचे आहे की अंधश्रद्धा आणि अशांततेच्या विळख्यात अडकून खितपत पडायचे आहे हे कधीतरी ठरविले पाहिजे.
ग्रहणावेळी इन्फ्रारेड व अल्ट्राव्हायोलेट किरणे प्रखरपणे बाहेर पडतात हे धांदात खोटे आहे, असे दा.कृ.सोमण म्हणतात. ते सांगतात की, सूर्यापुढे चंद्र येण्याला ग्रहण म्हणतात. त्यावेळी सूर्यात काहीच बदल होत नाही. त्याच्या किरणात काहीच बदल होत नाही. त्यामुळे एरवी दुपारच्या उन्हात चालून त्रास होतो, तितकाच त्रास होऊ शकतो. गर्भार महिलांवर काहीही दुष्परिणाम होत नाही, जेवल्याने, अन्न शिजवल्याने कोणताही अपाय होत नाही. आपण ग्रहणात फक्त सूर्याकडे बघताना काळजी घेतो. याचे कारण एरवी सूर्याच्या प्रखरतेमुळे आपण सूर्याकडे थेट बघत नाही. पण ग्रहणावेळी सूर्यावर सावली पडल्याने सूर्याकडे पाहणे सुसहय्य होते. परिणामी सूर्याकडे पाहत राहतात आणि मग डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम होऊ नये इतकीच काळजी ग्रहणात घ्यायची असते. पण आज भारतातल्या अनेक भागात अन्न शिजले नाही, सकाळचे नाश्त्याचे स्टॉल लागले नाहीत, रस्त्यावर नेहमीची गर्दी दिसली नाही. तीन चतुर्थांश भारत जणू ग्रहण संपेपर्यंत स्तब्ध झाला होता. शौचासही जायचे नाही असे मानणारे अनेक आहेत. पाणी प्यायचे नसते असेही सांगतात. म्हणजे आजारीच पडायचे आणि ग्रहणाच्या अशुभ काळामुळे आजारी पडलो असे सांगत फिरायचे. गंमत अशी आहे की, हे सर्व अंधश्रद्धेचे नियम घालणारे कोणतेही आजारपण स्वतःच्या माथी मारून घ्यायला तयार नाहीत. म्हणून हे नियम सांगणारे असेही सांगतात की, ग्रहणातील सुतकात असलेले निर्बंध हे वृद्ध, बालके, रुग्ण, गर्भार महिला यांना लागू नाहीत.
हिंदू धर्म हा बदलत्या काळानुसार नवनवीन संकल्पना स्वीकारणारा धर्म आहे आणि म्हणूनच सतत आक्रमणे होऊनही या धर्माचा पाया कधीही दुभंगला नाही. आपण हा धर्म मानत असू तर त्यातील त्रासदायक ठरणार्‍या अंधश्रद्धा उखडून फेकल्या पाहिजेत. आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन आहे. ग्रहणातील सूर्याच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन आहे. त्यात राहूने सूर्य खाल्ला आणि मग सूर्य त्याच्या तोंडातून सुटला असे म्हटले आहे. तेव्हा वैज्ञानिक ज्ञान कमी होते म्हणून हा युक्तिवाद झाला, पण आता ग्रह-तार्‍यांचे इतके ज्ञान वाढल्यावरही तोच पूर्वीचा युक्तिवाद ग्राह्य मानायचा का? उलट आपण अभिमानाने म्हटले पाहिजे की, आपल्या ऋग्वेदात ग्रहणाचे वर्णन केले आहे इतका प्राचीन आपला अभ्यास आहे. इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट यांनी ग्रहणाचा अभ्यास करून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण दिसते हे लिहून ठेवले आहे. अशा या महान आर्यभट्टाच्या कुळात आपण जन्माला आलो आहोत. त्यांचा अभ्यास पुढे न्यायचा की ग्रहणात देव झाकायचे? हा प्रश्‍न प्रत्येकाने विचारला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक सुताचा फरक असतो. या सुतावरून भविष्याचा मार्ग ठरतो.

Monday, 23 December 2019

देवेंद्रजी, जरा धीर धरा...


महाराष्ट्रात 2014 पूर्वीचा भाजपा आणि नंतरचा भाजपा हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. 2014 पूर्वी विरोधी पक्षाच्या बाकावरून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस बोलायचे तेव्हा त्यांच्या प्रत्येक मुद्यावर विश्‍वास वाटायचा. देवेंद्र फडणवीस संपूर्ण माहिती घेऊन बोलतात अशी त्यांची प्रतिमा होती. पण 2014 साली कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची यासाठी घोडदौड सुरू झाली आणि भाजपाने कमाविलेला विश्‍वास घरंगळत रसातळाला गेला. गाडीभर पुराव्यांची रद्दी झाली आणि या रद्दीच्या गठ्ठ्यावर बसून फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मुखवटेही टराटरा फाटले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस या कोणत्याच पक्षावर जनतेचा काडीचा विश्‍वास राहिलेला नाही. इथे शब्दही प्रमाण नसतो आणि कृतीही शाश्‍वत नाही हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता थोडा धीर धरला पाहिजे. त्यांनी सत्तेत असताना सर्व पक्षातील विरोधकांचा असा नायनाट केला की भलेभले थक्क झाले. पण त्यांचे शेवटचे फासे चुकीचे पडले. त्यामुळे त्यांची पुन्हा येईनची सत्ता स्वप्न तर बुडालीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची जनमानसातील व्यक्तिगत प्रतिमा डागाळली. देवेंद्र फडणवीस सत्य बोलतात असे जनमनात होते त्याला तडा गेला आहे. ती विश्‍वासार्हता परत मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आता संयम राखला पाहिजे. नाही तर रोज उठून सरकारविरुद्ध बोलणारा बडबड नेता अशी त्यांची प्रतिमा होईल आणि ही प्रतिमा झाली तर मग कितीही व्हिडिओ टाका, ट्विट करा नाही तर पोस्ट करा लोक बडबडीकडे  दुर्लक्ष करतील.
हा सल्ला देवेंद्र फडणवीस यांना देण्याचे कारण  म्हणजे भाजपाची संपूर्ण आस या व्यक्तिमत्त्वावर आधारली आहे. अजून महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे देवेंद्र जे बोलतील आणि जसे वागतील त्याचा थेट परिणाम भाजपाच्या भवितव्यावर होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे वर्तन पक्षासाठी घातक आहे. शिवसेनेने घेतलेली फारकत आणि अजित पवारांसह सत्ता स्थापनेचा फसलेला डाव या दोन्ही आघातांच्या वेदना देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक शब्दांतून घळाघळा वाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांत ठेच खाल्लेल्या सद्गृहस्थाची अगतिकता आणि त्यातून निर्माण होणारा आक्रस्ताळेपणा दिसतो आहे. देवेंद्र फडणवीसांचे वागणे व्यक्ती म्हणून अपेक्षित असेच आहे. पण ते सर्वसाधारण व्यक्ती नव्हेत तर एका पक्षाचे नेतृत्त्व करीत आहेत. कदाचित त्यांचे हे पदही धोक्यात आले असावे. त्यातून आलेल्या अस्थिरतेत त्यांची मानसिकता बदलली असावी. पण आपले वागणे पक्षाला घातक ठरू शकते हे त्यांनी वेळीच ओळखले नाही तर त्यांचे पक्षातील स्थान आणि सन्मान काही काळात संपेल हेही शंभर टक्के सत्य आहे.
नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचे वागणे हे अत्यंत बालिश होते आणि त्यांच्या मागे भाजपाला फरफटत जावे लागले. नवे सरकार सत्तेवर येऊन दोन आठवडेही झालेले नसताना फडणवीस कर्जमाफीची मागणी करताना दिसले. सर्वात दुर्दैवाचा क्षण म्हणजे अधिवेशनावेळी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाचे बॅनर भाजपाने फडकविले आणि त्या दैनिकात जे प्रसिद्ध झाले त्यावरून रणकंदन माजविले. एका दैनिकाचा दाखला देऊन सरकारला जाब विचारणे हा आततायी निर्णय फडणवीसांनी का घेतला? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने अधिवेशनात तीन दिवस केला. हा विषय अधिवेशनात का आणला? दरवर्षी होणाऱ्या आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस उपस्थित राहिले नाही, धान उत्पादकांना सरकारने 200 रुपये वाढवून दिले तर फडणवीस म्हणतात की अवकाळीने धान उत्पादन झालेले नसल्याने धान विकत घ्यायचीच नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्यांना यापूर्वीच हेक्टरी आठ हजार रुपये राज्यपालांनी जाहीर केल्यावरही अवकाळीग्रस्तांना मदत जाहीर केली नाही अशी देवेंद्र बोंब ठोकत होते. महाआघडीला ‘तिघाडी’ सरकार म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे वाजपेयींच्या 13 पक्षांच्या सरकारला काय म्हणत असतील? सत्ता स्थापन होऊन दोन आठवडेही झाले नाहीत अशा सरकारने  लगेच विदर्भासाठी योजना जाहीर होणे शक्य नाही हे जाणूनही त्यावर देवेंद्रजी टीका करीत होते.
आता सात-बारा कोरा केला नाही यावर भाजपाने मोर्चे काढावे असा त्यांचा आदेश आहे. सरकसकट सर्वांना दोन लाख दिले याचे स्वागत नाही. याचे कारण काय? तर शिवसेनेने 7/12 कोरा करणार असा शब्द दिला होता. पण या शब्दावर शिवसेनेला मते देण्याइतका महाराष्ट्राचा मतदार खुळा नाही. शिवसेना काही करील इतकीच अपेक्षा या शब्दामुळे निर्माण झाली होती. प्रचारावेळी दिलेल्या शब्दांचा खेळ करायचा तर देवेंद्रजींनी घसा खरवडून डोंबिवलीकरांना 6 हजार कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते, 2014 च्या भाजपाच्या वचननाम्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करू, 24 तास पाणी, वीज पुरवू, कुशल कामगारांचा सतत पुरवठा करू, कृषीपंपांना दर दिवशी किमान 10 तास वीजपुरवठा करू अशी बरीच आश्‍वासने होती जी हवेत विरली. प्रचारातील शब्द प्रचारापुरते असतात हे जनतेला माहीत आहे. जनता केवळ पक्षाची साधारण विचारसणी काय आहे याचा अंदाज घेऊन मतदान करते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांच्या मागे लागून आततायीपणा करीत पक्षाचे हंसे करू नये तर सध्याच्या सरकारवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर पुराव्यांसह अंकुश ठेवावा ही भाजपाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण न करता केवळ आवाज चढवून आदळआपट करीत राहिलात तर पक्षाचे नुकसान होईल आणि पक्षाचे नुकसान होऊ लागले तर मोदींची छत्रछाया जाईल. तेव्हा देवेंद्रजी जरा धीर धरायला शिका...

Sunday, 22 December 2019

व्रतस्थाचा सूर्यास्त


अखंड जीवन एखादा ध्यास घेऊन जगणार्‍या व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचा अंत कधी होऊ शकत नाही. केवळ सूर्यास्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनाने व्यापलेली एक संपूर्ण पिढी सूर्योदय बनून उगवते आणि आपल्या तेजाने जग व्यापून टाकते. माझे वडील नीलकंठ यशवंत खाडीलकर हे असेच व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. आज त्यांचे शरीर इहलोकातून परलोकात गेले, पण त्यांचे विचार, त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक शब्द हा मराठी माणसाच्या मनात धगधगता निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा असाच सदैव लढत राहील. अयोग्य ते भस्म करीत राहील आणि योग्य त्याला दिशा दाखवित राहील, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्लभ असतात, पण आमचे साताजन्माचे पुण्य म्हणून ते आम्हाला वडील म्हणून लाभले आणि लढवय्या मनात मराठी माणसांत अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रेमाच्या, आपुलकीच्या स्थानावर राहिले.
पत्रकारिता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलकंठ खाडीलकर होते. चार हजार खप असताना ‘नवाकाळ’चे दुधारी शस्त्र त्यांनी हाती घेतले आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा काटेरी मुकूट मस्तकावर पेलवत हे शस्त्र केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी वापरले. कधीही आयुष्यात त्यांनी एका शब्दानेही जनतेशी प्रतारणा केली नाही. ‘ताठ कणा आणि मराठी बाणा’ हे ‘नवाकाळ’चे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कणखरतेतून घडले. पत्रकारिता ही लेखनापुरती मर्यादित न ठेवता खिळे जुळवून पाने तयार करणे, मशीन चालविणे, पेपरच्या गठ्ठ्यावर बसून पार्सल बांधणे ते ‘नवाकाळ’चे आर्थिक नियोजन करणे हे त्यांनी एक हाती करून दाखविले. इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रात अग्रलेख पहिल्या पानावर छापून त्याने जनतेच्या विचारांना दिशा देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यांचे आठ कॉलमचे धगधगते मथळे, सरकारचे डोके ताळ्यावर आणणारे अग्रलेख आणि कधीही न डगमगता, लाचार न होता, संकटांपुढे न झुकता जे चुकले त्यांच्यावर आसूड ओढायचे धाडस दाखविणारे ते एकमेव होते. राजकारणी त्यांचे शत्रू नव्हते, पण कधी मित्रही नव्हते. कारण आपण चुकलो तर मैत्री असूनही ‘भाऊ’ आपल्याला सोडणार नाहीत हे प्रत्येकाला माहीत होते. त्यांचे लेखन वाचून एक अख्खी पिढी प्रगल्भ झाली, एका पिढीला जगायची दिशा मिळाली, लढायचे धाडस मिळाले. म्हणूनच त्यांना जनतेने ‘अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब बहाल केला. यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही.


थरथरत्या हाताने खिशात मावतील अशी पुस्तके लिहिणे ही त्यांचीच कल्पना होती. त्या पुस्तकाचा प्रत्येक विषय हा जनतेला ज्ञानी करण्यासाठी होता. त्यात कधी ‘मी’ नव्हता आणि कधी ‘बात’ नव्हती. ते नेहमी म्हणायचे की, काहीही घडले तरी ‘द शो मस्ट गो ऑन!’ मला काही झाले तरी ‘नवाकाळ’चा अग्रलेख लिहिलाच गेला पाहिजे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अजोड पत्रकारिता हे मैलाचे दगड कधीच गाठता येणार नाही. पण त्यांच्या विचारांचे आणि लेखनाचे अमृत पिऊन आज माझ्या या सदैव अमर पित्याला आणि जनतेच्या अग्रलेखांच्या बादशहाला हा अग्रलेख लिहून मानाचा मुजरा करते. या सूर्याचा आज सूर्यास्त झाला, पण जनतेच्या मनातून, भावनेतून, विचारातून तो लाखो सूर्यकिरणे बनून रोज नित्यनियमाने व्रतस्थपणे आपले जीवन उजळत राहणार याची खात्री आहे.

Saturday, 30 November 2019

उद्धवजींच्या मस्तकी काटेरी मुकुट


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आजपासून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत तर एका महत्त्वपूर्ण पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे यश/अपयश हे त्यांच्या सरकारचेच राहणार नसून शिवसेनेवर त्यांचा मोठा परिणाम होणार आहे. परिणामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी आहे. एखादा मुख्यमंत्री अपयशी ठरला तर ती व्यक्ती बदलता येते. पण उद्धवजींच्या बाबतीत हा पर्यायच असू शकत नाही. कारण ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही आहेत.
उद्धव ठाकरे यांना पूर्वी राजकारणात रस नव्हता. छायाचित्रीकरण हा त्यांचा आवडता विषय होता. यात त्यांचे कौशल्य आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. ‘साहेब, बॅडमिंटन खेळत आहेत.’ हेही वाक्य त्यांना फोन करणार्‍यांनी कधी न कधी ऐकवलेच असणार आहे. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती जबाबदारी पेलली. अत्यंत टोकाची टीका सहन केली. आपले व्यक्तिमत्त्व आक्रमक नाही हे ओळखून हळूहळू शिवसेनेत बदल केला आणि त्यात धूर्तपणा आणला. एकेक चाल खेळत ते इथपर्यंत येऊन पोहचले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ इतर कुणाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत हे जाणून त्यांनी केवळ नाईलाजाने हे मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते अपयशी ठरले तर शिवसेनेचा शेवट होईल हा धोका त्यांना पत्करावा लागला आहे.
शिवसेनेने आजवर रांगडे राजकारण केले, भावनिक राजकारण केले, जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला साद घालून पक्षाची एकजूट आणि उत्साह कायम ठेवला. पण सरकारमध्ये बसल्यावर भावनेला साद घालून उपयोग नसतो. जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. कधी कधी या अपेक्षा अतिशय वाढतात. त्याला तारतम्यही राहत नाही. अशा वेळी निर्णय घ्यायचे आणि जनतेला ते समजावून सांगायचे हे अग्निदिव्य असते. रस्त्यावर उभे राहून घोषणा देणे वेगळे, जाहीरनाम्यात आश्‍वासने देणे वेगळे आणि प्रत्यक्ष आर्थिक आकडेवारी मांडून निर्णय घेणे हे वेगळेच असते. त्यातच देवेंद्र फडणवीसांसारखा दुखावलेला विरोधी पक्ष नेता आणि सणसणीत चपराक खाल्ल्याने संतप्त असलेला भाजपा यांनाही रोज तोंड द्यायचे आहे. शरद पवार आणि सोनियाजींचे हट्ट पुरवायचे, विरोधकांना झेलायचे, जनतेचे समाधान करायचे आणि त्याबरोबर शिवसेना वाढवून पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीला सामोरे जायचे हा प्रवास धगधगत्या निखार्‍यावर चालण्यासारखा आहे. मनात जर विश्‍वास आणि आस्था असेल तर त्यावरून चालताना पाय पोळत नाहीत. नाहीतर प्रत्येक पावलाला चटका बसतो. आजवर उद्धवजींनी अनेकदा टोकाच्या भूमिका घेतल्या आणि नंतर त्या हव्या तशा वाकवल्या किंवा तोडूनही टाकल्या. आता असे चालणार नाही. कारण केवळ भूमिका घ्यायची नसून निर्णयही घ्यायचा आहे आणि या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पक्षावरही होणार आहे. ही तारेवरची कसरत ते कशी पार पाडतात याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे.

Wednesday, 27 November 2019

अजित पवार अस्तनीतील निखारा


महाराष्ट्रात विविध काळात जेव्हा जेव्हा सत्तानाट्य घडले तेव्हा तेव्हा ते केवळ एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेपोटी घडले याला इतिहास साक्ष आहे. महत्त्वाकांक्षा कधीही वाईट नसते, पण महत्त्वाकांक्षेच्या जोडीला संयम आणि सुजाणपणा नसेल तर ती महत्त्वाकांक्षा अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे चटके देत राहते. महाराष्ट्रात अजित पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अजित पवार उत्तम वक्ते आहेत, त्यांचा वेगळा करिष्मा आहे. ते सभा गाजवू शकतात, प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे ऐकायला तुफान गर्दी उसळते. एखाद्या पक्षाची लोकप्रियता वाढवायला पक्षाचा विस्तार करायला अशा नेत्याची अत्यंत गरज असते. त्यामुळेच पक्षात त्यांना कायम मानाचे स्थान असते. योग अभ्यास रामदेवबाबांनीच सांगावा, डायलॉग शत्रुघ्न सिन्हानेच म्हणावेत, एखाद्याची चिरफाड राज ठाकरेंनीच करावी आणि रांगड्या भाषेत कुणाची टोपी उडवायची तर ते अजित पवारांचेच शब्द असावेत. हे सर्व गुणी नेते आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत, या मर्यादांमुळेच पक्षाचे नेतृत्त्व करण्यास ते योग्य नाहीत.
शरद पवार हे अजित पवारांना मुख्यमंत्री पदावरून किंवा इतर महत्त्वाच्या पदावरून का डावलत असतील त्याचे कारण गेल्या 25 दिवसांत महाराष्ट्राने पाहिले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले त्यानंतरच्या काळात त्या सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अद्याप विस्मरणात गेले नाहीत. धरणात पाणी नाही तर मुतू का? या अजित पवारांच्या एका वाक्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जितकी हानी केली तितकी इतर कशानेच झाली नसेल. आततायी, संतापी वागणे आणि परिणामांचा अंदाज न घेता बेछूट निर्णय घेणे या अजित पवारांच्या स्वभावाने पक्षाला अनेकदा अडचणीत आणले. पार्थ पवारला उमेदवारी द्यायचा हट्ट करायचा ही तर धक्कादायक घोडचूक होती. अजित पवार भविष्यात सरकारच्या उच्च पदावर जातीलही, पण ते त्यांचे कर्तृत्त्व नसेल. ते उच्चपद हे त्यांना सतत सावरणारे शरद पवार यांनी नाईलाजाने त्यांचा पुरवलेला हट्ट असेल. अजित पवार हे उत्तम नेते आहेत. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे नेतृत्त्व गुण त्यांच्यात नाहीत. वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची काकांची क्षमता त्यांच्यात नाही. आज त्यांचा पक्ष वाचवायला शरद पवार आहेत, पण भविष्यात अजित पवारांकडे धुरा गेली तर अस्तनीतील हा निखारा स्वतः जळेल आणि पक्षाचीही भरून न निघणारी हानी करील. अजित पवारांनी स्वतः चिंतन करून एक पायरी खाली उतरले तर पक्षाचे भले होईल.

Thursday, 14 November 2019

पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये


आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’ कडक शब्दांत निषेध करीत आहे. पत्रकार हे आपले गुलाम आहेत हे समजण्याचा माज नेत्यांनी करू नये. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नसल्याने शेतकर्‍यांपासून सर्वच हवालदिल आहेत, अशा स्थितीत सत्ता स्थापनेची प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करीत आहेत. हे काम करताना ऊन असो, पाऊस असो, पोटात सकाळपासून एक कण अन्‍नाचा नाही तरी पत्रकार माहिती मिळविण्यासाठी  धावाधाव करीत आहेत. गेले 21 दिवस जीवाचे रान करीत आहेत आणि आज त्यांना फसविण्यासाठी अजित पवार चेहर्‍यावर संताप आणून बाहेर येत बैठक रद्द झाल्याचे सांगतात. अजित पवार उद्या येतील असे शरद पवार सांगतात. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्वच बैठक रद्द झाल्याचे सांगतात आणि मग लपून अज्ञातस्थळी जाऊन बैठक घेतात आणि आम्ही पत्रकारांची चेष्ट केली असे सांगतात हा काय प्रकार आहे?
पत्रकारांना फसवून, खोटे बोलत त्यांची चेष्टा करून अज्ञातस्थळी बैठक घ्यायची हे सर्व कशासाठी  केले? तुमच्या एकाही बैठकीवेळी  पत्रकारांना आत प्रवेश नसतो. तुम्ही नेते पंचतारांकित हॉटेलात बसता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वातानुकूलित सभागृहात बसता, चहा पिता, जेवता तेव्हा पत्रकार उंबरठ्याबाहेर तासन्तास तुमची बैठका संपण्याची वाट पाहत बसतो. भररस्त्यात पत्रकार उभे असतात. त्यांना बसायलाही जागा नसते, डोक्यावर पंखा नसतो, जेवायला गेलो आणि बैठक संपली तर बाईट मिळणार नाही  म्हणून भुकेल्यापोटी हे पत्रकार तिथेच उभे राहतात. हे नेते त्यांना कधी पाणी विचारत नाहीत की चहा देत नाहीत की स्टूल देत नाहीत. बैठकीत खरे काय चालले हे पत्रकारांना कळतही नाही. मग पत्रकारांचे हंसे करून, नाटके करून अज्ञातस्थळी बैठक घेतली कशाला? शेवटी तुम्ही बैठकीतून बाहेर येऊन जे सांगता आणि जितके सांगता तितकेच आम्ही दाखवितो. तरीही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिनय करून, खोटे बोलून पत्रकारांची चेष्टा केली. या नेत्यांच्या दिवसभर बैठका चालतात, पण अंगावरच्या पांढर्‍या झब्ब्याला सुरकुती पडत नाही इतकी सर्व सोय असते आणि या बैठकीतून जे निष्पन्‍न होणार आहे त्याचा मलिदाही या नेत्यांनाच मिळणार आहे. तरीही पत्रकारांवर माज करायचा. त्यांनाच लाथाडायचे. त्यांना फसवायचे. त्यांची चेष्टा करायची हे शोभते का? तुम्ही नेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाता त्याच्या बातम्या दिल्या गेल्या नाहीत तर तुम्ही शेतकर्‍यांकडे फिरकणारही नाही हे सत्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा नेत्यांनो, जरा जपून आणि जितेंद्र आव्हाडजी, चेष्टा कुणाची आणि कधी करायची याचे भान नेत्यांना राखायला सांगा. आम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी आहोत, पत्रकार आहोत, तुमचे गुलाम नाही!

Friday, 1 November 2019

आरेतील वृक्षतोडी बाबत वृक्षतज्ज्ञांना समितीतून हाकला

मांजर दूध प्यायलं! सर्वांनी पाहिले!
पण या वृक्षतोडीला शिवसेनाच 100 टक्के जबाबदार


प्रदुषणाने घुसमटत चाललेल्या मुंबईला ऑक्सिजन भरभरून देणारे आरे परिसरातील जवळजवळ अडीच हजार वृक्ष मेट्रोच्या कारशेडसाठी कापले जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील भाजपा आणि शिवसेनेने षडयंत्र करून ही कत्तल मंजूर केली. शिवसेना आता वृक्षतज्ज्ञांनी दीड कोटीची लाच घेतल्याचा आरोप करीत असली तरी स्वतः शिवसेनेने किती लाच घेतली या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे शिवसेनेने मांजरीप्रमाणे डोळे बंद करून दूध मटकावले, पण त्यांना जिभल्या चाटताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे.
भाजपाला आरे परिसरातच मेट्रो कारशेडसाठी जागा हवी होती आणि त्यांनी त्यासाठी शिवसेनेला पटविले हे उघड आहे. शिवसेनेचे 6 आणि उपस्थित वृक्षतज्ज्ञ (3) यांनी विरोधात मतदान केले असते तरी आरेतील झाडे वाचली असती. पण त्या दिवशी बैठकीत काय झाले? वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्त पाच वृक्षतज्ज्ञांपैकी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी डॉ. दीपक आपटे आणि मनोहर सावंत हे त्या दिवशी गैरहजर राहिले. हे दोघे का गैरहजर राहिले याची कारणे मुंबईकरांना द्यायला हवी. जे तीन वृक्षतज्ज्ञ बैठकीला उपस्थित होते त्यापैकी 15 वर्षे पॅनलवर असलेले सुभाष पाटणे, भाभा ऑटोमिक सेंटरचे डॉ. चंद्रकांत साळुंखे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तिघांनीही वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. या तिघांनाही याबाबत जाब विचारला पाहिजे आणि जर त्यांचे उत्तर अमान्य झाले तर त्यांना तात्काळ समितीतून काढले पाहिजे.
वृक्षतज्ज्ञ म्हणून नेमलेल्या सुभाष पाटणे, चंद्रकांत साळुंखे आणि शशीरेखा सुरेशकुमार यांनी मेट्रो उभारणार्‍या ‘सॅम इंडिया’ कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपये लाच घेतली असा आरोप शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. यापैकी शशीरेखा सुरेशकुमार या मिठीबाई कॉलेजात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात की, जेव्हा मतदान झाले तेव्हा प्रचंड गोंधळ सुरू होता. मला वाटले की हा विषय पुढे ढकलण्यासाठी मतदान होत आहे. एका प्रसिद्ध कॉलेजच्या प्राध्यापिकेचा गोंधळ होत असेल तर सर्व गोंधळाचेच काम आहे. यासाठी मुंबईकरांनी या प्रत्येक वृक्षतज्ज्ञाला जाब विचारला पाहिजे.
पण हे वृक्षतज्ज्ञ जितके जबाबदार आहेत. त्याहून कितीतरी अधिकी पटीने आरेच्या वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे. वृक्षप्राधिकरण समितीची बैठक साधारणपणे दर 15 दिवसांनी घेतली जाते. पण यावेळी आरेसाठी अवाजवी घाई केली गेली. 15 दिवसांनी एक बैठक घेण्याऐवजी 15 दिवसांत 3 बैठका घेण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दोन दिवसांत एक हजार पानांचा अहवाल तयार करण्यात आला. वृक्षप्राधिकरण समितीतील वृक्षतज्ज्ञ आणि भाजपावर आरोप करीत शिवसेनेचे यशवंत जाधव यांनीच ही माहिती दिली. मग इतक्या वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना झोपली होती की झोपेचे सोंग घेऊन पहुडली होती. आरेतील वृक्षतोडीला परवानगी देणारा प्रस्ताव मंजूर झालाच नसता कारण भाजपाचे या समितीत फक्त चार नगरसेवक आहेत. त्यांच्या विरोधात 5 वृक्षतज्ज्ञ, राष्ट्रवादीचा (राजकीय विरोधक) 1, काँग्रेसचे (राजकीय विरोधक) 2 आणि शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक आहेत. म्हणजे समितीत भाजपा 4 विरुद्ध विरोधक 14 असे बलाबल आहे. तरीही भाजपाने जबड्यात हात घालून सर्व दात काढले. आता शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात जाण्याची नाटकं करीत आहेत, पण लोक आता फसत नाहीत.
आरे वृक्षतोडीचा विषय निघाला त्या दिवशी 2 वृक्षतज्ज्ञ अनुपस्थित होते. त्यापैकी बीएनएचएसचे दीपक आपटे आहेत. जे सरकारविरोधात कोर्टात जाणार नाहीत कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. जे उपस्थित होते त्यांना तर जायचेच नाही. काँग्रेसवाले सत्तेत राहून शहाणे झाले आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे सभात्याग करून वाट मोकळी करून दिली आणि आता ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत रवी राजा वृक्षप्रेमाचा आव आणत आहेत. राष्ट्रवादीच्या एकाबद्दल बोलायला नको कारण हल्ली त्यांच्या नेत्यांचा संयम ढासळतो आहे.
उरली शिवसेना, त्यांचे सहापैकी सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उमेश माने हे नगरसेवक आरे बाबत मतदान होईपर्यंत बैठकीला आलेच नाहीत. वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर बैठकीत पोहोचले. त्यांची म्हणे मातोश्रीला भेटून झाडाझडती घेणार आहेत. हे अधिकृत पक्षाचे वाक्य आहे. प्रत्यक्षात या चौघांना बहुदा ही टर्म संपल्यावर पुढल्या टर्मलाही वृक्षप्राधिकरण समितीवर घेण्याचे आश्वासन दिले जाईल. उशीर करून किती मोठे काम त्यांनी ‘करून दाखविले’ आहे. एकूण काय तर आरेतील झाडे गेली, ऑक्सिजन गेले. यानंतर नैसर्गिक आपत्ती ओढावणारच आहे. जेव्हा ओढवेल तेव्हा समिती नेमली जाईल. त्या समितीत हीच माणसे असतील. खरे सत्य हे आहे की, या पक्षांना आता जनतेचा धाक राहिला नाही. कारण कुटुंब फक्त स्वतःपुरती जगू लागली आहेत.

Tuesday, 15 October 2019

गणेश मिरवणुकीत जायचे आणि रस्त्यावर उकिरडा करायचा कचरा फेकायचा, थुंकायचे! हीच आपली ‘हिंदू संस्कृती’ का?


भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे. आपण घाण करायची आणि दुसर्‍याला ती घाण साफ करायला लावायची. त्यातही जो ती घाण साफ करतो त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी नसते आणि सहानुभूतीही नसते. मनातील घाण साफ करून स्वतःचे मन आणि शरीर सुदृढ ठेवणार्‍या बुवाबाजांना आपण भरभरून दान देऊन पुण्य विकत घेण्याचा भ्रष्टाचार तर करतोच, पण त्या बुवाबाजांच्या पायावर डोकेही ठेवतो. परंतु जे आपली घरं, आपले संडास, आपले रस्ते साफ ठेवून आपल्याला प्रदुषणापासून, रोगराईपासून वाचवितात त्यांच्याकडे आपले लक्षही नसते. काल आपल्या ‘लाडक्या बाप्पाला’ आपण मिरवणुकीने विसर्जनासाठी नेले आणि जाताना रस्त्यांवर उकिरड्याचे अक्षरशः ढीग करून ठेवले. रस्त्यांवर खड्डे इतके की चालता येत नाही हे वाक्य सर्वांच्या मुखी असते. गणेशविसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी समुद्रकिनारी मूर्तींची जी अवस्था दिसते ती पाहवत नाही हे वाक्यही दरवर्षी ऐकू येते. पण रस्त्यांवर आपण विसर्जनाच्या दिवशी किती प्रचंड कचरा करून ठेवला आहे हे वाक्य कुणी बोलतच नाही. कारण आपण घाण करायची आणि दुसर्‍याने साफ करायची ही आपली सवय आहे.
हिंदू संस्कृतीबद्दल अलीकडे खूप जास्त चर्चा सुरू आहे. मग कचरा करणे, घाण फेकणे, थुंकणे ही आपली संस्कृती आहे का? विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत नाचायचे, पुढल्या वर्षी लवकर या म्हणायचे ही आपली संस्कृती आहे असे म्हणतात. मग हे सर्व करताना आपण प्लास्टिकच्या ग्लासातून पाणी प्यायलो आणि ग्लास रस्त्यावर फेकून दिले, कागदी कपातून चहा प्यायलो आणि कप रस्त्यावर फेकून दिले, लेज खाऊन पाकिटे रस्त्यावर, चिवडा खाल्ला पाकिटे रस्त्यावर, आईस्क्रिमचे कप रस्त्यावर, इडली चटणी ज्या कागदी प्लेटमध्ये खाल्ली ती न गुंडाळता तशीच रस्त्यावर फेकून दिली. ज्या रस्त्यांनी मिरवणुका गेल्या त्या रस्त्यांवर अक्षरशः हा कचरा भरला होता. रस्त्यावरून चालणे शक्य नव्हते. समुद्रकिनारी आलेल्या मूर्ती दुसर्‍या दिवशी पाहवत नाही तसे हे समुद्रकिनार्‍याकडे जाणारे रस्ते पाहवत नव्हते.
पीओपीच्या मूर्ती आणू नका, कारण त्या विरघळत नाहीत आणि त्या मूर्तींमुळे नदी, विहिरी, समुद्र प्रदूषित होतात हे अनेक वेळा सांगून झाले. तरी शाडुची मूर्ती आणत नाहीत कारण ती महाग असते. थोडी सजावट कमी करा, थोडी मिठाई कमी करा म्हणजे परवडेल असे सांगितले तर आपल्यालाच दूषणे देतात. मूर्तीची नंतर काय अवस्था होते हे माहीत असूनही सजावट, मिठाई, बँड यासाठी पैसे वाचवायला पीओपीचीच मूर्ती आणतात. आता तर कृत्रिम तलावांचे थोतांड निघाले आहे. आम्ही प्रदूषण करीत नाही तर कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतो असे नाक वर करून म्हणतात. पण या कृत्रिम तलावात रसायन टाकून मूर्ती विरघळवतात आणि ते पाणी पुन्हा नदीत आणि समुद्रातच फेकतात. मग प्रदूषण कमी कसे झाले? परंतु दृष्टीआड काहीही चालले तर आपला त्याच्याशी संबंध नसतो.
कचर्‍याचेही तसेच आहे. सफाई कामगार दुसर्‍या दिवशी कष्ट करून रस्ते चार-चार वेळा साफ करतात आणि आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून रस्त्यावर पाऊल ठेवतो तोपर्यंत रस्ते स्वच्छ केलेले असतात. त्यामुळे आपण कचरा करतो आहोत याचे आपल्याला काहीच वाटत नाही, आपले घर फक्त आपले ही आपली मानसिकता आहे. त्यामुळे घरात आपण फरशीवर कचरा टाकत नाही. घरातल्या फरशीवर थुंकतही नाही. पण घराबाहेर पडलो की आपले काहीच नसते. तेव्हा आपण जे वागतो त्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की, घराबाहेरचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर शेवटी परिणाम होतोच. घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण खिशातले पैसे खर्च करतो त्याचप्रमाणे रस्ते बांधायला, रस्त्यावरील खड्डे बुजवायला, रस्त्यावरील कचरा साफ करायला आपणच खिशातले पैसे खर्च करतो. आपण कर भरतो त्यातून हा खर्च होतो. मग आपण घर आपले मानतो तसा रस्ता आपला का मानत नाही?
गंमत म्हणजे आपण आपल्या देशात अगदी बेफिकिरीने उकिरडा करतो, पण दुसर्‍यांच्या देशात जातो तेव्हा त्यांचे रस्ते मात्र साफ ठेवतो. परदेशातून कुणीही परतले की एक वाक्य ठरलेले असते. इतकी स्वच्छता होती आणि रस्त्यांवर एक खड्डाही नव्हता हे कौतुक प्रत्येक जण करतो. पण परदेशात आणि आपल्या देशात काय फरक आहे हा विचार कुणी करीत नाही. परदेशातील नागरिक आकाशातून धरणीवर आलेले नाहीत. ती आपल्यासारखी माणसे आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त विचारांचा फरक आहे. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालये, उद्याने, पार्किंग अशा सुविधा आपल्यासाठी आहेत आणि आपण त्याची निगा राखली पाहिजे ही शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवली आहे. त्यामुळे परदेशी लोक कायदे कडकपणे पाळतात. आपल्याकडे कायदे मोडेल तो हिरो अशी मानसिकता असल्याने प्रत्येक कायदा मोडण्याकडे कल असतो. ही आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ती कोणत्याही वयात बदलता येते. आपण परदेशात गेलो की, रस्त्यावर कचरा टाकत नाही. कचराकुंडी शोधतो किंवा एका पिशवीत कचरा गोळा करून जिथे कचराकुंडी दिसते तिथे नेऊन टाकतो. हे करायला फार कष्ट पडत नाही. पण आपण जो एकत्रितपणे सार्वजनिक उकिरडा करून ठेवतो तो साफ करायला फार कष्ट पडतात.
आपण हा बदल घडविला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपुरता बदल केला तरी मार्ग स्वच्छ होईल. मनातील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला तर अवतीभोवतीही ऊर्जा निर्माण होते. हिंदू संस्कृती ही इतकी वर्षे टिकली कारण काळानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे. या संस्कृतीनुसार जे सण आपण पाळतो तेही आदर्श ठरावेत ही
तळमळ ठेवू या.

Monday, 7 October 2019

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या

किल्ल्यांवर हॉटेल, लग्नाच्या पार्टीच्या वृत्ताने तुटक्या तलवारी झळकल्या
राष्ट्रवादीने अर्धवट माहितीवर भावना भडकवल्या आणि खा. संभाजीराजेंना धाप लागली


महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि लग्नसमारंभाला फडणवीस सरकारने परवानगी दिली आहे असा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच टाकला आणि या अर्धवट माहितीवर महाराष्ट्रात काही तासांत भावना भडकल्या. फडणवीस सरकारने कोणत्या 25 किल्ल्यांवर या उद्योगांना संमती दिली आहे हे डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तर माहीत नव्हतेच, पण भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनाही माहीत नव्हते. पण सर्वचजण नसा ताणून बोलू लागले आणि किल्ल्यांवरील प्रेमाचा कडेलोट झाला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किल्ल्यांवर हॉटेल आणि लग्न समारंभ आम्ही होऊ देणार नाही. या किल्ल्यांवर सरकारने संग्रहालये बांधावी. परदेशातील किल्ल्यांवर अशी संग्रहालये आपण नेहमी बघतो. पण राज्यात सत्तेवर असताना राष्ट्रवादीने किल्ल्यांकडे बघितलेही नाही. कदाचित किल्ल्यांचा 7/12 होणार नाही हे लक्षात आल्याने किल्ल्यांची हेळसांड झाली असावी. आज मात्र विरोधी पक्षाची भूमिका वठवीत सुप्रिया सुळे सातत्याने बोलत होत्या. त्यात भर म्हणून कोणतीही पूर्व माहिती न घेता माधव भंडारी आले आणि आपल्या फुगलेल्या आवाजात नेहमीच्या बेफिकिरीने म्हणाले की, कोणते किल्ले आहेत ते माहीत नाही, पण जो निर्णय झाला तो खूप आधी व्हायला पाहिजे होता. म्हणजे एक नेता माहिती न घेता बोलतो आणि दुसरा नेता जनतेच्या भावनांना किंमत न देता बोलतो आणि हे सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखविण्यासाठी ही बेताल बडबड करतात. दुर्दैवाने छत्रपतींच्या नखाचीही त्यांना सर नाही. सर्वात वाईट म्हणजे ज्यांनी मालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला असावा असे आपल्याला वाटते ते डॉ. अमोल कोल्हे हे गंगेत न्हाऊन कोरडेच राहिले आहेत हे आज उघड झाले. छत्रपतींप्रमाणे कपडे आणि मिशी ठेवून संयम येत नाही. आपण कोणत्या कारणासाठी तलवार उपसत आहोत, याची माहिती न घेता, शासन निर्णय न वाचता त्यांनी सरळ व्हिडिओ करून भावना भडकवल्या. जनतेला फसवून केलेले राजकारण यशस्वी होत नाही हा धडा त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रवासातून घेतला नाही आणि हा धडा राष्ट्रवादीत राहून त्यांना कधी मिळणारही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आगपाखड, माधव भंडारींची दर्पोक्ती झाल्यावर सदैव बाबासाहेब पुरंदरेंच्या पायाशी बसलेले राज ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे व्हिडिओ निवडणूक प्रचारावेळीच लागतात. एरवी त्यांची तलवार कायम म्यानच असते. काँग्रेसबद्दल फारसे बोलावे असे त्यांच्याच नेत्यांना वाटत नाही. बाळासाहेब थोरातांना फक्त शिर्डी दिसते, त्यांना अख्खा महाराष्ट्र कधी दिसेल असे वाटत नाही. नेत्यांच्या वक्तव्यांनी पाणी गरम होऊन बुडबुडे आले. त्यानंतर काही तासांत सर्व शांतही झाले असते. पण गडकिल्ल्यांचे वृत्त व्हायरल झाल्याने गडकिल्ल्यांवर खरे प्रेम करणारे प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर आग ओकू लागले.
निवडणुकीच्या तोंडावर इतकी मते आपल्या विरुद्ध जातील हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजे खडबडून जागे झाले. त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गदागदा हलविले. सकाळपासून वातावरण पेटत चालले होते तेव्हा खासदार, मंत्री आणि पुरातत्व खाते आपापल्या खुर्चीत पेंगत होते. कुणीही कसलाही खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. चार तासांनी केवळ वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर खुलासा केला की, फडणवीस सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मुनगंटीवारांच्या खुलाशाने वादळ शमले नाही. कारण त्यांनी जेव्हापासून 33 कोटी झाडे लावल्याचा दावा सुरू केला आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावरचा विश्वासच उडाला आहे. मुनगंटीवार दावा करतात की, वाघांची संख्या वाढली आहे तेव्हा जनतेला त्यांच्या फोटो मागचा भुसा भरलेला वाघच अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे मुनगंटीवार ‘ज’ चा ‘मा’ करतात अशी जनतेची ठाम भावना झाली आहे. म्हणजे झाडे आणि वाघ जगविण्याच्या ऐवजी मारली असे प्रत्येक जाहिरातीत वाचले जात आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशाने गडप्रेमींचा संताप थांबत नाही हे पाहून खासदार छत्रपती संभाजीराजेंना घाम फुटला. त्यांनी शेवटी दुपारनंतर शासन निर्णय वाचला आणि जयकुमार रावलना खुलासा करायला लावला की, ‘वर्ग 1’ श्रेणीतील 51 किल्ल्यांवर हॉटेल वा लग्न समारंभाची कोणतीही परवानगी सरकारने दिलेली नाही. ‘वर्ग 2’ श्रेणीतील असंरक्षित किल्ल्यांचा ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास केला जाणार आहे. हे किल्ले लग्न सोहळा वा इतर समारंभांसाठी दिले जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जयकुमार रावल यांनी सकाळीच हा खुलासा दिला असता तर दिवसभराचा अज्ञानाचा गोंधळ झालाच नसता. जयकुमार रावल यांच्या खुलाशाने मूळ वृत्तच चुकीचे होते हे उघड झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात व्हॉटसअपवर निर्णयाची प्रत फिरू लागली. यात वर्ग2 श्रेणीतील स्थळांवरील मोकळी जागा अथवा विकसित जागा खासगी लोकांना 30 ते 60 वर्षे भाडेकराराने देण्यात येतील असे म्हटले आहे. त्यामुळे जयकुमार रावलांच्या खुलाशाने विषय थांबणार नाही. हे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या लक्षात आले. मग त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी मतांचे महत्त्व ओळखून फोन उचलला आणि कोणत्याही किल्ल्यावर खासगी समारंभ होणार नाही असे जाहीर केले. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ही बाब तातडीने प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केली आणि कपाळावरचा घाम पुसला. पण शेवटचा घामाचा थेंब पुसत असताना जयकुमार रावल म्हणाले की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर यापूर्वीच हेरिटेज हॉटेलचे बांधकाम सुरू झाले आहे. या वाक्याचा खरे तर धमाका व्हायला हवा होता. पण तेव्हा निवडणुका नसल्याने आपण गप्प बसलो होतो हे लक्षात आल्यावर सर्वच पक्षाचे नेते थंड झाले आणि हा विषय संपला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे केवळ नाव घेऊन त्यांचे गुण येत नाहीत हे आजच्या घटनेतून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना दिसले. दिल्लीतील लाल किल्ला केंद्र सरकारने भाडेकराराने एका खासगी कंपनीला दिला ही घटना अनेकांना आठवली. त्यामुळे आपण कुणावर आणि कशासाठी जीव ओवाळून टाकायचा याचा विचार क्षणभर थांबून मावळ्यांनी करायला हवा. ती वेळ आली आहे.

Wednesday, 17 July 2019

अरविंद केजरीवालांचा प्रवास ‘परिवर्तन’ ते मुख्यमंत्रिपद




दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दोघेही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलनाने वेग पकडला तेव्हा अरविंद केजरीवाल अधिकच झोतात आले. अरविंद केजरीवाल हे प्रथम डिसेंबर 2013 ते फेब्रुवारी 2014 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठा विजय मिळवून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी 70 पैकी 67 जागा जिंकण्यासाठी इतिहास घडविला. पुढील वर्षी पुन्हा दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार कायम वादात राहिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीकडे एका बाजूनी टीका होत असताना त्यांनी सुधारलेल्या पालिका शाळा आणि मोहल्ला क्‍लिनिक सारख्या योजनांमुळे त्यांचे कौतुकही होत असते.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सिवानी शहरात झाला. वडील गोविंद राम केजरीवाल हे इलेक्ट्रीक इंजिनिअर होते. सोनिपत, गाझियाबाद, हिस्सार, दिल्ली अशा शहार हे कुटुंब फिरत राहिले. अरविंद केजरीवाल अभ्यासात हुशार होते. खडकपूरच्या आयआयटीत प्रवेश घेऊन ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि जमशेदपूरला टाटा स्टील कंपनीत नोकरीलाही लागले. पण तेव्हापासून अस्वस्थपणा हा त्यांच्या स्वभावात होताच. चांगल्या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यात उत्तीर्ण होऊन ते आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्याच काळात त्यांची सुनिताशी भेट झाली. तीही ‘इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस’ उत्तीर्ण होऊन नोकरीला लागली. 1994 साली दोघांचा विवाह झाला. त्यांना हर्षिता आणि पुलकित ही दोन मुलं आहेत. पुढे दोघांनी सरकारी नोकरी सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले.

आयकर खात्यात असतानाच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सुंदरनगर भागात ‘परिवर्तन’ चळवळ सुरू केली. आयकर, वीज बिल, रेशनकार्ड, सरकारी योजना यात सामान्यांना येणार्‍या समस्यांची सोडवणूक ‘परिवर्तन’ च्या माध्यमातून सुरू झाली. पाच वर्षानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी ‘कबीर’ नावाच्या एनजीओची स्थापना केली ज्यामुळे त्यांना निधी मिळू लागला. दरम्यान ‘परिवर्तन’ मार्फत अनेक सरकारी खात्यांत धडाधड आरटीआय टाकून माहिती मिळविण्यास सुरुवात झाली. यातून सरकारी योजनांतील गैरकारभार उघड होऊ लागला. रेशन दुकानांतील भ्रष्टाचार पाण्याच्या खाजगीकरणाचे कारस्थान, खाजगी शाळांची दादागिरी अशा गौप्यस्फोटांमुळे परिवर्तनचे नांव सर्वदूर पोहचले. पण परिवर्तनचे कार्यक्षेत्र सुंदरनगरपर्यंतच सिमित होते. 2006 साली अरविंदकेजरीवालना त्यांच्या समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम हे भागभांडवल म्हणून देत केजरीवाल यांनी ‘पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली.केजरीवाल, मनिष सिसोदिया, अभिनंदन सिक्री, प्रशांत भूषण, किरण बेदी हे त्याचे संस्थापक होते. या संस्थेने परिवर्तन आणि कबीरचे काम आणखी मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॉमनवेल्थ खेळातील नियोजनात झालेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. शेवटी 2011 साली हेच सर्वजण अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपचे सदस्य बनले. पुढे आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

Wednesday, 10 July 2019

योगी आदित्यनाथांचे गणित विषयात ग्रॅज्युएशन


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अनेकांना कुतुहल आहे. भगव्या वेषातील योगी असे व्यक्तिमत्त्व असलेला माणूस राजकारणात येतो आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो याचे बहुतेकांना आश्चर्य वाटते. पण योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास बघितला तर तरुण काळापासून मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड राहिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील पंचूर गावी झाला. हे गाव आता उत्तराखंडात समाविष्ट आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा अजय मोहन बिश्त हे त्यांचे नांव होते. त्यांचे वडील फॉरेस्ट रेंजर पदावर सरकारी नोकरीत होते. चार भाऊ आणि तीन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. पण इतके मोठे कुटुंब असूनही अजय बिश्तने उत्तम शिक्षण घेतले. उत्तराखंडात असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा महाविद्यालयातून त्यांनी चक्क गणित विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले. पण नोकरी, कुटुंब या सामान्य जीवनात त्यांना रस वाटत नव्हता. ते जेमतेम 18 वर्षांचे होते. तेव्हा अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आंदोलन सुरू झाले आणि अजय बिश्तने कुटुंबाला रामराम ठोकून आंदोलनात उडी घेतली. हा नवा प्रवास सुरू असतानाच गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. महंत अवैद्यनाथ हेही या शिष्यामुळे प्रभावित झाले. ते अजय बिश्तच्या आईवडिलांना भेटले आणि त्यांच्या मुलाला शिष्य म्हणून घेऊन जाण्याची परवानगी दिली. आईवडिलांनी आनंदाने परवानगी दिली. अजय बिश्त हे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. याच महंत अवैद्यनाथ यांनी अजय बिश्त यांचे नांव योगी आदित्यनाथ ठेवले. तेव्हा योगी 21 वर्षांचे होते.


गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ हे अध्यात्मिक गुरू असले तरी राजकारणात पूर्ण सक्रीय होते. महंत अवैद्यनाथ हे हिंदु महासभेचे नेते होते. 1991 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. ते स्वतः लोकसभेवर निवडून आले होते. पण राजकारणात असूनही हिंदू महासभा आणि भाजपा या दोन प्रवाहात स्वतःला पूर्ण झोकून न देता त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान राखले होते. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा योगी आदित्यनाथ सांभाळत असत.
1994 साली महंत अवैद्यनाथ निवृत्त झाले आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आपले वारस नेमले. त्यानंतर गुरुच्या पावलावर पाऊल टाकत 1998 साली योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणूक लढले आणि निवडून आले. 26 व्या वर्षी ते खासदार झाले होते. ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 अशी प्रत्येक लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली. लोकसभेत त्यांची 77 टक्के उपस्थिती असायची. आज ते उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विषयी रोज नवीन वाद निर्माण होतो. सध्याचे ते सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री आहेत.

Friday, 5 July 2019

आ. नितेश राणे, तुमची मस्ती, दादागिरी महाराष्ट्रात नको अधिकारी चुकतो! पण त्याला खांबाला बांधून चिखलाची आंघोळ घालता?

मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले, अशी ओरड ठोकत काँगे्रसचे आमदार (नारायण राणे पुत्र) नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकरना फरफटत गडनदीच्या पुलावर नेले. तिथे त्यांना खांबाला बांधले आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली! नितेश राणेंनी दोन महिन्यांनी येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी फडफड सुरू केली आहे. त्यासाठी मोठे नाट्य उभे करीत त्यांनी शासकीय अधिकार्‍याला अत्यंत हीन प्रकारची वागणूक दिली. अधिकारी चुकत असतील, पण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. इथे चढ्या आवाजात जाब विचारण्याची मर्यादा पाळतात. एखाद्या असहाय अधिकार्‍याला अशा तर्‍हेने मस्ती दाखवत, दादागिरी करीत वागवणे महाराष्ट्रात शोभत नाही आणि महाराष्ट्रात स्वीकारलेही जाणार नाही. आमदार नितेश राणेंनी, असहाय
अधिकार्‍यापुढे ताकद दाखविली. पण केेंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींपुढे नितेश राणेंच्या मुखातून शब्द निघणार नाही. या चिखलफेकीनंतर रात्री आमदार नितेश राणे यांना गुंडा गर्दी आणि मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. कणकवली पोलिसांनी ही अटक केली.
आज सकाळी 11 वाजता हे चिखलकांड घडले. यामध्ये आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आघाडीवर होते. आज सकाळी रस्त्यातील खड्डे आणि चिखल दाखविण्याच्या बहाण्याने उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांनी कणकवलीला बोलविले. त्यानंतर त्यांना खड्डे दाखवत चालत चालत जानवलीच्या गडनदीवरील पुलावर नेण्यात आले.
यावेळी नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे व 50 ते 60 स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही होते. हे कार्यकर्ते उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्‍काबुक्‍कीही करत होते. गडनदीच्या पुलावर येताच आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोरच प्रकाश शेडेकर यांना खडसावयाला सुरुवात केली. सामान्य जनता दर दिवशी जो चिखल मारा सहन करते तो तुम्ही पण अनुभवा, असे नितेश राणे यांनी शब्द उच्चारताच चिखलाची बादली भरून तयार असलेल्या कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावरून अंगावर चिखल ओतला. त्यानंतर अगोदरच दोर घेऊन तयार असलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधले आणि त्यांच्या अंगावर लागोपाठ चिखलाच्या बादल्या ओतून त्यांना चिखलाने आंघोळ घातली. गेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे असे शेडेकर गयावया करून सांगत होते, तरीही त्यांच्यावर
हल्ले सुरू राहिले. नितेश राणे यांच्या या दादागिरीमुळे बांधकाम विभागातील सर्व कर्मचारी भेदरले आहेत. यापूर्वीही नितेश राणे यांनी अनेक अधिकार्‍यांना असेच धमकावले आहे. पोलीस अधिकार्‍यांनाही दम भरला आहे. या सर्व घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांमध्ये व कामगारांमध्ये राणे यांच्याबद्दल संताप आहे, पण सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याने अधिकारी तक्रार करीत नाहीत. मात्र उप अभियंता प्रकाश शेडेकर यांनी चिखल फेकीनंतर केलेली याचना आणि गयावया पाहता आपल्याला कोणी वाली नाही, हेच त्यांना कळून चुकले आहे, असे स्पष्ट दिसत होते.
दरमान, अभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक- मारहाणप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर सहा जणांची नावे शेडेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर नितेश राणे हे कणकवली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेदरम्यान पोलीस ठाण्यासमोर राणे समर्थकांनी गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी नितेश राणेंना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कणकवली महामार्गावर आज दुपारी शेडेकर यांना झालेल्या मारहाणीनंतर ते पोलीस बंदोबस्तात कुडाळ येथे आपल्या निवासस्थानी आले. तेथून कपडे बदलल्यावर कुडाळ पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत कुडाळ पोलिसात प्रकाश शेडेकर ( 52) यांनी फिर्याद दिली की, त्यांनी मला गडनदीच्या पुलावर थांबायला सांगितले होते.त्याप्रमाणे ते थांबले असताना 10: 40 वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवलीच्या दिशेकडून पुलावर चालत आले. त्यावेळी त्यांचे सोबत पत्रकार, नागरिक, कार्यकर्ते असे 40 ते 50 लोक होते. यावेळी त्यांनी त्यांना काहीही बोलायला न देता तु पीलर बांधायची घाई का केली? गटार कोण बांधणार तु का मी, तु का एवढा निगर गठ्ठ झालेला आहेस का? तुला दाखवू काय कसे असत चिखलातून जाणे, तुला चिखलातच लोळवतो, सर्व्हीस रोड अजुन का नाही बांधलास? गोव्यात कसा बांधलास, माती कशी उडते अंगावर दाखवू का तुला असे राणे हे बोलू लागले आणि यावेळी माझ्या मागून दोन व्यक्ती येत त्यांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या चिखल बादल्या घेवून बादल्यातून आपल्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. तसेच त्यावेळी मी पळून जावू नये म्हणून राणे यांनी माझा हात पकडून ठेवला. यावेळी चिखल ओतणार्‍या दोघापैकी मिलिंद मेस्त्री (रा. कलमठ) यांना त्यांनी ओळखले. त्यानंतर आम. राणे यांनी आपल्याला ढकलुन पुलाच्या कडेस नेले व त्यांच्या कार्यकर्त्यांना याला बांधा रे असे म्हणून मला बांधून ठेवण्याची चिथावणी दिली. तसेच तुला चिखलात नेवून टाकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत यांनी महामार्गावर बांधलेली पांढरी पट्टी तोडून काढत त्या पट्टीने मला बांधून ठेवले आणि त्यानंतर हाताला धरून ढकलत चालत नेले आणि अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घरासमोरील साचलेल्या पाण्यातुन चालत नेले. यावेळी तेथे उभे असताना नगरसेविका मेघा गांगण यांनी पाठीवर हाताच्या थापटाने धक्काबुक्की केली. यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी गर्दीतून आपल्याला बाजूला नेले. झालेल्या मानहानीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून आपण कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती फिर्यादीत शेडेकर यांनी दिली. दरम्यान, अटकेनंतर नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
नारायण राणेंचा माफीनामा
पण मुलाला वाचविण्याचा प्रयत्न
कणकवलीच्या गडनदीच्या पुलाला बांधून उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेकीबद्दल त्यांचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र त्यांनी नितेश राणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, अभियंत्यांवर चिखलफेक नितेश राणेंनी नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी केली.

Wednesday, 3 July 2019

बर्माच्या रंगून शहरात जन्म गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी


गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा जोर वाढल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना बाजूला सारून राजकोटचे भाजपा नेते विजय रुपानी यांनी 22 डिसेंबर 2017 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बर्माच्या रंगून शहरात (आता म्यानमारचे यांगॉन शहर) जन्मलेले 62 वर्षांचे रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. अभाविपचे कार्यकर्ते, जनसंघ, आणीबाणी काळात कैद, महापौर, आमदार, खासदार अशी त्यांची प्रदीर्घ वाटचाल असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपाशी कायम एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना मिळाले.
विजय रुपानींचा जन्म जैन बनिया कुटुंबात झाला. त्यांचे आईवडील मायाबेन आणि रमणीकलाल रुपानी यांची रसिकलाल अ‍ॅण्ड सन्स नावाची कंपनी आहे. उसाचा रस, बर्फाचा गोळा बनविणार्‍या यंत्रापासून विविध प्रकारचे पाईप कंपनी बनविते. त्यांना सात अपत्य होती. विजय रुपानी सर्वात धाकटे आहेत. म्यानमारमध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतर 1960 साली हे कुटुंब गुजरातच्या राजकोट शहरात स्थायिक झाले. विजय रुपानी यांची पत्नी अंजली रुपानी याही भाजपात सक्रीय आहेत. त्यांना दोन मुलगे ऋषभ, पुजित व कन्या राधिका आहे. पुजितचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या नावाने राजकोट शहरात ट्रस्ट चालविला जातो.


विजय रुपानी यांच्यावर 2011 साली शेअरच्या किंमती आणि स्टॉक्समध्ये गैरप्रकारे उलाढाल केल्याचा आरोप आहे. सेबीने त्यांच्यावर दंडही लादला होता. मात्र नंतर हा दंड रद्द करून फेरसुनावणीचा आदेश देण्यात आला. 2017 साली
सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल आहे. राजकोटच्या श्री छोटू नगर गृहनिर्माण सोसायटीत राहणार्‍या मानसिंह भाई या वॉचमनला सोसायटीतून हद्दपार करण्याच्या बदल्यात विजय रुपानींच्या पुजित धर्मादाय ट्रस्टला सोसायटीची जागा देण्याचा सौदा होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी मानसिंह भाई यांचा स्थानिक पालिकेकडून प्रचंड छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून या कुटुंबाने 2013 साली पालिकेसमोर स्वतःला जाळून घेतले. यात कुटुंबातील 7 जणांपैकी मधुरा आणि गौरीबेन या दोनच महिला जिवीत राहिल्या. भरत, गिरीश, आशा, रेखा, बासमती यांचे निधन झाले. या कुटुंबातील एकमेव जिवित पुरुष महेंद्रभाई सध्या न्यायालयात लढा देत आहेत.

Wednesday, 26 June 2019

रावली जगन, कावली जगन आंध्रचे नवे मुख्यमंत्री


आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर रेड्डी या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्याने दणदणीत विजय मिळवित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2014 ते 2019 ही पाच वर्षे विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या या नेत्याने चंद्राबाबू नायडू यांचा पार धुव्वा उडवून दिला.
येदुगिरी संदिन्ती जगनमोहन रेड्डी अर्थात वायएसआर रेड्डी हे केवळ 46 वर्षांचे आहेत. पत्नी भारथी आणि दोन कन्या असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी हे काँग्रेसमध्ये होते. अत्यंत लोकप्रिय होते. 2004 आणि 2009 अशा दोन वेळा ते मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यासाठी निवडणुकीवेळी प्रचार करीतच जगनमोहन रेड्डींचा राजकारणात प्रवेश झाला. दुर्दैवाने 2009 साली वडील राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले. त्यांची जागा त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. पण काँग्रसने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारले. 2010 साली जगमोहन रेड्डी यांनी ‘सहानुभूती दौरा’ आयोजित केला. त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाचा धक्का बसल्याने काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हा दौरा होता. पण खरे तर हा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना हा दौरा काढण्यास मनाई केली.


या सर्वाचा अपेक्षित परिणाम होऊन जगनमोहन रेड्डींनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि 2011 साली स्वतःचा वायएसआर काँग्रेस पक्ष काढला. या पक्षाने पहिल्याच संधीत सर्व पोटनिवडणुका जिंकल्या. जगनमोहन रेड्डीचा ताकद वाढत असतानाच सीबीआयने संपत्तीच्या भ्रष्टाचाराबाबत धाडी टाकल्या आणि जगमोहन रेड्डींना अटक करून न्यायालयीन कोठडीत टाकले. याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल अपील फेटाळण्यात आले. जगनमोहन रेड्डी जेलमध्ये असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात झळकू लागल्या. त्यांची प्रतिमा मलीन झाली.
अशा या विपरित परिस्थितीत त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या विभाजनाच्या मुद्याने साथ दिली. तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करीत जगनमोहन रेड्डींनी कारागृहात बेमुदत उपोषण सुरू केली. त्यांची आई आमदार विजयाम्मा यांनी कारागृहाबाहेर उपोषण सुरू केले. अखेर जगनमोहन रेड्डींना कारागृहात सोडण्यात आले. पण या सर्वाचा चांगला परिणाम झाला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसचा दणकून पराभव झाला. यानंतर मात्र जगनमोहन रेड्डींनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली. त्यांनी 2017 साली तीन हजार किलोमीटरची संकल्प यात्रा काढून जवळजवळ प्रत्येक विधानसभा मतदारसंघ गाठला. ‘रावली जगन, कावली जगन’ (जगन यायला हवा, आम्हाला जगत हवा) ही घोषणा दुमदुमू लागली आणि पुन्हा जगनमोहन रेड्डी लोकप्रिय ठरू लागले. त्यांच्या या पदयात्रेचा परिणाम होऊन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तेलगू देसम आणि चंद्राबाबू नायडूंना चितपट केले.

Sunday, 23 June 2019

नर्सरीचीच फी दीड लाख करून ठेवलीय पालक ओव्हरटाईम करतायत! मुलांवर ‘संस्कार’ कधी करायचे?


कोणत्याही देशात किंवा कोणत्याही राज्यात सुदृढ नागरिक असावा असे वाटत असेल तर त्यासाठी उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य गरजेचे आहे! याकरिता सरकारने दर्जेदार आणि प्रत्येकाला परवडेल अशी सेवा देणारी यंत्रणा उभारली पाहिजे! सुखी आणि संस्कारी जीवनासाठी ही अत्यंत प्राथमिक गरज आहे! सरकार डावे असो किंवा उजवे असो, शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना प्राधान्यच द्यावे लागेल. अगदी हिंदुत्त्ववादासाठी समर्पित सरकार असले तरी हिंदुत्त्ववादाच्या मूळ संकल्पनांचे संस्कार जर बालपणीपासूनच्या शिक्षणातून मिळाले नाहीत तर मोठेपणी ‘जय श्रीराम’ चा नारा का देतोय हे न समजणारी पिढी तयार होईल. त्यामुळे मोठेपणी जसा नागरिक अपेक्षित आहे तसा नागरिक घडविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य याकडे अत्यंत गांभीर्याने बघितले पाहिजे. दुर्दैवाने गेली वीस वर्षे याच दोन क्षेत्रांकडे चुकीच्या पद्धतीने लक्ष दिले जात आहे. ही दोन क्षेत्रे म्हणजे नागरिक घडविण्याची साधने आहेत. या दृष्टीने न पाहता ही दोन क्षेत्रे नागरिकांना लुबाडण्याची यंत्रणा आहेत अशा दृष्टीने वापरली जात आहेत.
सर्वांना परवडणार्‍या आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार्‍या पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या तोपर्यंत सर्व आलबेल होते. पण खासगी शाळांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यावर हळूहळू सरकारी शाळांची वाताहात केली. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने घडले. एक पिढी शिकून दुसर्‍या पिढीला प्रवेश देण्याची वेळ आली तोवर सरकारी शाळांचा सत्यानाश करण्यात आला. त्याचवेळी चकाचक दिसणार्‍या खासगी शाळा प्रचंड वेगाने फोफावत गेल्या. हे कारस्थान कुणाच्या लक्षात येण्यापूर्वीच अगदी शांतपणे घडवून आणले. शिक्षकांना भलत्या कामांना जुंपायचे, मोडलेली बाकडी दुरुस्त करायची नाहीत, इमारतींना रंग द्यायचा नाही, वेळेवर वह्या-पुस्तके पुरवायची नाहीत, मध्यान्ह भोजनातून दूध वगळून पावडरी आणि चिक्क्या द्यायच्या, निकृष्ट शिक्षण साहित्य द्यायचे, शिक्षक भरती करायची नाही असे करत करत सरकारी शाळांना अवकळा आणली. त्याचवेळी खासगी शाळा वाटेल तिथे उघडण्याची परवानगी दिली. त्यांना भरभरून सुविधा देत नेत्यांनी स्वतःच्या मुलांना तिथे प्रवेश मिळवून घेतले. ही अधोगती एवढ्यावर थांबली नाही. आपल्या राज्याने दहावी बोर्डाची पूर्ण वाट लावून टाकली आहे. एसएससी बोर्डात मूल शिकते हे समाजात कमीपणाचे लक्षण बनविले आहे. पूर्वी ज्यांच्या फिरत्या नोकर्‍या असायच्या त्यांना सीबीएसई शाळेत मुलांना घालावे लागायचे. आज जो उठतो त्याला आपल्या मुलाला आयसीएसई आणि सीबीएसई शाळेत टाकायचे आहे. एसएससी बोर्ड का नको याचे उत्तर अर्धे पालक देऊ शकत नाहीत. त्यांना एकीकडे सरकारी शाळेची काळीकुट्ट इमारत दिसते आणि दुसरीकडे चकाचक स्विमिंगपूलवाली शाळा दिसते. शिक्षण तिथे आणि इथे सारखेच आहे हे समजावणार कोण? त्यात आता एसएससी बोर्डाचे अंतर्गत मार्क बंद करून गुणांची टक्केवारी इतकी कमी करून ठेवली आहे की कितीही तुकड्या वाढवल्या तरी सीबीएसई आणि आयसीएसईच्या मुलांनाच कॉलेज प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. इतकेही कमी म्हणून गणिताची पद्धत अचानक बदलतात, आयसीएसईचे प्रथम पाच विषयांचे मार्क ग्राहय धरणार जाहीर करतात. दरवर्षी अकरावी प्रवेशावेळी यांचा सर्व्हर डाऊन होतो. हे काय चाललय तरी काय? एकही निर्णय परिपूर्ण विचार करून विद्यार्थी व पालकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून नंतर घेता येत नाही का? शिक्षणाची चेष्टा करून ठेवली आहे. कुणालाही विश्वासात न घेता धडाधड निर्णय घेतले जातात. त्या निर्णयांना विरोध झाला की सरळ निर्णयच बदलतात. कोणताही पूर्वविचार नसतो, कोणताही ठामपणा नसतो. ही स्थिती आणखी बिघडत जाऊन दहावी बोर्ड येत्या काही वर्षात पूर्ण बंद होईल हे निश्चित आहे.
त्यानंतर जे घडणार आहे त्याची झलक आत्ताच दिसत आहे. एसटीला नावे ठेवत खासगी बसने जाणारे प्रवासी उत्सवाच्या ऐन काळात खासगी बसेसनी भाडी वाढवली की ओरड करतात. एसएससी बोर्ड बंद झाले की हेच होणार आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळा आताच परवडत नाहीत. नंतर या शाळा सांगतील ती फी आणि देतील ते शिक्षण घ्यायचे अशी वेळ येईल. आताच मुलांना शिक्षण देताना आईवडिलांना धाप लागते. नर्सरीत प्रवेशाला दीड लाख रुपये मागतात. कुठून आणायची ही रक्कम? आई नोकरी करते, वडील नोकरी करतात. ओव्हरटाईम करतात, ओला उबर चालवितात. विम्याचे काम करतात. दिवस एकेक पैसा जोडण्यात जातो. या अशा स्थितीत मुलांच्या संगोपनासाठी वेळ काढणार कुठून? मुलांवर संस्कार करणार कसे? मुलं पाळणाघरात वाढतात, शेजार्‍यांकडे राहतात नाहीतर बिच्चारी एकटीच घरी बसतात. अशा मुलांची मानसिक काळजी घेतली जात नाही. या सर्व गोष्टींची जबाबदारी कोण घेणार आहे? मूल बिघडलं मूल नैराश्यात गेलं की आईबाबांकडे बोट दाखवतात. पण ते बिच्चारे काही स्वतःच्या चैनीसाठी घराबाहेर नसतात. मुलांच्या फीची तरतूद करण्यासाठी नोकरीत, उद्योगात धक्के खात असतात. पूर्वी स्वतःचे घर असावे म्हणून कर्ज काढणारी ही पिढी होती. ते घराचे स्वप्न कधीच भंगले आहे. आता नर्सरीत मुलाला प्रवेश मिळावा यासाठी कर्ज काढावे लागते आणि ते जन्मभर फेडत राहावे लागते. इतके करून जेव्हा ते मूल मोठे होते आणि म्हणते की, आई, मी लहान असताना तू मला वेळ दिला नाहीस तेव्हा आईला रडू कोसळते. ही सर्व जीवघेणी धावपळ करून आरोग्य बिघडल्यावर सरकारी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. बहुतेक सरकारी रुग्णालयांतून जे बरे होऊन बाहेर पडतात ते केवळ देव त्यांच्या पाठीशी असतो म्हणून वाचलेले असतात.
महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ, सुशिक्षित, आनंदी प्रेमळ असावा. त्याने स्वच्छता राखावी, देशाला वंदन करावे, आईवडिलांचा सांभाळ करावा असे वाटत असेल तर मोठेपणी त्यांच्यावर जबरदस्ती करून हे संस्कार होणार नाहीत. हे संस्कार आईच्या कुशीत आणि बाबांच्या पाठीवर बसून घोडाघोडा खेळतानाच होतात. त्यासाठी आईबाबा घरी राहू शकतील, इतके शिक्षण व आरोग्य सेवा स्वस्त आणि दर्जेदार केली पाहिजे. भुतानसारख्या देशाने हे करून दाखविले आहे. भुतानच्या राजाने अगदी ठरवून आपल्या मुलाला सरकारी शाळेत घातले. त्याबरोबर मंत्र्यांनी आणि प्रतिष्ठितांनीही आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवले. परिणामी पूर्ण सरकारी यंत्रणेचे लक्ष सरकारी शाळांवर केंद्रित होऊन त्या शाळांच्या सुविधा आणि दर्जा धडाधड सुधारला. आज भुतानमध्ये अशी परिस्थिती आहे की, कमी मार्क ज्यांना मिळतात ते खाजगी शाळांत नाईलाजाने जातात. जो विद्यार्थी सरकारी शाळेत आहे, तो हुशार समजला जातो.
महाराष्ट्राच्या शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचे आधीच्या आणि आताच्या सरकारने वाटोळे केले आहे. हा अग्रलेख कोणत्याही विशिष्ट सरकारच्या विरोधात नाही. हा अग्रलेख आईबाबांना समर्पित आहे.

Wednesday, 19 June 2019

आसामचे मुख्यमंत्री सरबानानंद


आसाम राज्यात तरुण गोगोई यांचे काँग्रेसचे सरकार पाडून 2016 साली भाजपाच्या तरुण तडफदार सरबानानंद सोनोवाल या नेत्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फास्ट कार, मोटारसायकल स्वारी, मासेमारी आणि पांढरा रंग या चार गोष्टींवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या 57 वर्षांच्या मुख्यमंत्र्याने शपथग्रहण करताच त्यांचा विवाह कधी होणार याची चर्चा रंगू लागली. आसामच्या एका प्रख्यात ज्योतिषाने जाहीर केले की, सरबानानंद यांचा 2020 साली विवाह होणार आहे.
सरबानानंद सोनोवाल यांचा जन्म आसामचाच आहे. एका गरीब कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. फुटबॉलची हौस भागावी म्हणून टांगा नावाच्या फळाचा फुटबॉल बनवून खेळण्यात या गरीब मुलाचे बालपण गेले. पुढे ग्रॅज्युएट आणि वकिलीच्या अभ्यासासाठी गुवाहाटी विद्यापीठात दाखल झाल्यावर विद्यार्थी राजकारणाशी ओळख झाली आणि सरबानानंद आसाम गण परिषदेचे कार्यकर्ते झाले. यशाची शिखरे पार करीत 2001 साली आमदार झाले. मात्र नंतर बांगलादेशी घुसखोरांना आसाम राज्यातून हाकलून देण्याच्या भुमिकेवरून त्यांनी 2011 साली भाजपात प्रवेश केला. त्यांना लगेच खासदारकी आणि केंद्रात क्रीडा मंत्रिपद लाभले. आसाममध्ये भाजपाचा प्रचार व प्रसार सुरू झाला. पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा पाठीशी उभे राहिले. 2016 साली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर स्वच्छ प्रतिमेचे सरबानानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले. त्यांचे तडफदार व्यक्तीमत्त्व विजयी झाले आणि आसाम राज्यातील 18 वर्षांचे काँग्रेसचे तरुण गोगोई सरकार पडले.
सरबानानंद सोनोवाल हे आदिवासी जातीचे असल्याने भाजपाचा आदिवासी नेताविरुद्ध काँग्रेसचे ब्राम्हण नेते असाही वाद रंगला. पण प्रामुख्याने बांगलादेशींना घुसखोर ठरवून त्यांना आसाम राज्यातून हाकलण्याचा कायदा लागू करणे या मुद्यावरच भाजपाने ही निवडणूक जिंकली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले सोनोवाल जनतेला भावले. त्यांना पांढरा रंग आवडतो. त्यांचे घर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे आहे याचाही प्रचार झाला. 57 वर्षांचे भाजपाचे सोनोवाल विरुद्ध 84 वर्षांचे काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्यातील लढतीत आसामच्या जनतेने तरुण नव्या चेहऱ्याला कौल दिला.

Wednesday, 12 June 2019

पक्ष बदलाचा विक्रम करणारे*पेमा खंडू! अरुणाचल मुख्यमंत्री


पेमा खंडू यांनी 2016च्या जुलै महिन्यात अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा ते 37 वर्षांचे होते. या तरुण वयात ते मुख्यमंत्री झाले त्याचबरोबर सर्वात कमी काळात सर्वाधिक वेळा पक्ष बदलण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर असावा. सध्या ते भाजपात आहेत, पण त्यांचा इतिहास पाहता पुढे काय होईल सांगता येणार नाही.
अरुणाचल प्रदेशातील भाजपाच्या 67 उमेदवारांपैकी 60 उमेदवार करोडपती होते तर काँग्रेसच्या 46 उमेदवारांपैकी 30 उमेदवार करोडपती होते. पेमा खंडू यांची 163 कोटींची संपत्ती आहे, त्यांच्या नंतर काँग्रेसचे लोंबो ताएंग हे 148 कोटींचे मालक आहेत तर तिसर्‍या क्रमांकावर 109 कोटीची संपत्ती असणारे भाजपाचे त्सेरींग ताशी (तवांग) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे अरुणाचलची श्रीमंती ही थक्क करणारीच आहे.


पेमा खंडू यांचे वडील दोरजी खंडू हे अरुणाचल प्रदेशात लोकप्रिय होते. त्यांचा कामाचा धडाका मोठा होता. लष्करात सात वर्षे सेवा देऊन ते राजकारणात आले. सहकारी सोसायटीचे चेअरमन ते 2007 साली अरुणाचलचे काँग्रेसचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास होता. 2009 ला ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. दुर्दैवाने 30 एप्रिल 2011 या दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना चार पत्नी, पाच पुत्र आणि दोन कन्या आहेत. पेमा खंडू हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
दोरजी खंडू यांच्या निधनानंतर पेमा खंडू यांना राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपद दिले. त्याआधीपासून ते काँग्रेस पक्षात सक्रीय होते. 2010 साली तवांग जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर वडिलांच्या मतदारसंघात ते सतत विजयी राहिले. 17 जुलै 2016 या दिवशी काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तेव्हा राज्यातील राजकीय वातावरण स्फोटक होते. 17 जुलै 2016 या दिवशी काँग्रेस पक्षात असलेले पेमा खंडू यांनी दोन महिन्यात काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि 43 आमदारांसह त्यांनी ‘पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’ या पक्षात प्रवेश केला. भाजपाच्या पाठिंब्याने हा पक्ष सत्तेवर आला आणि पेमा खंडू हेच मुख्यमंत्री राहिले. पण तीन महिन्यांत (डिसेंबरमध्ये) त्यांनाच पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमधून निलंबित केले. तकाम पारीओ नवे मुख्यमंत्री बनणार होते. पेमा खंडू यांनी प्रचंड राजकारण करून पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्षही फोडला आणि या पक्षाच्या 43 पैकी 33 आमदारांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या पेमा खंडू हे भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आहेत.
आतापर्यंतच्या 39 वर्षांच्या काळात ते इतके राजकारण खेळले. त्याचवेळी त्यांचा विवाह होऊन दोन मुलगे आणि एक कन्या अशी त्यांना तीन अपत्यही आहेत. ते बौद्ध आहेत. दिल्ली विद्यापीठाचे ग्रॅज्युएट आहेत.

Thursday, 6 June 2019

सिक्कीमचे मुख्यमंत्री गोले रोलु पिकनिकची कमाल


सिक्कीमला विशेष राज्याचा दर्जा आहे. केंद्र सारकारकडून या राज्याला भरपूर निधी दिला जोतो. आनंदी माणसं सिक्कीमध्ये अधिक आहे. असा निष्कर्ष अनेक सर्व्हेनी काढला आहे. या राज्यावर गेली २४ वर्षे सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता होती. पण २००९ नंतर प्रेम सिंग तमांग या आमदाराने डेमोक्रेटिक पक्षात बंडखोरी करून सिक्कीम क्रांतिकारी पक्ष काढला आणि यावेळी त्यांच्या पक्षाने बाजी मारली. प्रेम सिंग तमांग या ५१ वर्षाच्या नेत्याने २७ मे २०१९ या दिवशी सिक्कीमचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

प्रेम सिंग तमांग हे त्यांचे अधिकृत नाव असेल तरी सिक्कीममध्ये सर्वजण त्यांना पी.एस गोले या प्रसिद्ध नावाने ओळखतात. सिक्कीम राज्यात आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे ‘रोलु पिकनिक!’ दरवर्षी सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाचे कार्यकर्ते रोलु या गावी जमतात. तिथे मौजमजा करीत सहलीचा आनंद लुटतात. अर्थात त्यातही राजकीय गप्पा होतातच. २००९ साली अशीच रोलु पिकनिक होती त्याला आमदार पी. सी. गोले उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांच्या या कृत्यामुळे ते बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. ६ सप्टेंबर २०१३ या दिवशी पी. एस. गोले यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतिकारी पक्ष स्थापन झाला आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून हा पक्ष सत्तेवर आला आहे. पवन कुमार चामलिंग यांची २४ वर्षांची सत्ता त्यांनी उलथवून टाकली. पी. एस. गोले. १९९४ पासून चुखुंग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहे. तेव्हापासून सातत्याने त्यांना मंत्रीपद मिळाले. २०१३ साली त्यांनी क्रांतीकारी पक्ष स्थापन केल्यावर २०१४ च्या निवडणुकीत फारसे यश लाभले नाही. २०१६ मध्ये त्यांनी मंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यांच्यावर खटला चालला आणि आणि ते दोषी ठरले. त्यांची आमदारकी रद्द झाली. पुढील दोन वर्षे ते कारागृहात होते. तरीही त्यांची लोकप्रियता कायम राहिली. १० ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना तुरूंगातून मुक्त केले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या क्रांतीकारी पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकल्या. पी. एस गोले यांना शिक्षा झाल्याने ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकणार नाहीत असे काहींचे मत होते. पण कायदाने त्यांना मुख्यमंत्री बनण्यास आडकाठी नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...